आयुष मंत्रालय
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेकडून लाईव्ह शल्यक्रिया सादरीकरणांसह ‘ सौश्रुतम् 2024’ चे यशस्वी आयोजन
Posted On:
15 JUL 2024 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2024
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या शल्य तंत्र विभागाने सुश्रुत जयंती-2024 च्या निमित्ताने नवी दिल्लीत सौश्रुतम् शल्य संगोष्टी नावाच्या दुसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. शल्यक्रिया तंत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुश्रुत यांच्या शल्यक्रिया कौशल्याचा बहुमान करण्यासाठी दर वर्षी 15 जुलै रोजी सुश्रुत जयंती साजरी केली जाते. 13 जुलै रोजी सुरु झालेल्या या चर्चासत्राचा समारोप आज झाला.
एम्स भोपाळचे संस्थापक संचालक प्रोफेसर संदीप कुमार या चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन दिवसात गुंतागुंतीच्या 25 शल्यक्रियांचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. नामवंत शल्यविशारदांच्या कौशल्याचे निरीक्षण करण्याची आणि त्याचे अध्ययन करण्याची आगळी वेगळी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली. गेल्या एका वर्षात एआयआयएच्या शल्यक्रियांमुळे 1500 रुग्णांना लाभ मिळाला आहे.
एआयआयएच्या संचालक प्रोफेसर तनुजा नेसारी म्हणाल्या, “या विभागाच्या प्रारंभापासूनच आयुर्वेदाला जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी एआयआयए वचनबद्ध आहे. शल्य तंत्र विभागाने आयोजित केलेल्या सौश्रुतममधून आयुर्वेदाला अत्याधुनिक शल्यक्रिया तंत्रज्ञानासोबत जोडण्याची आमची वचनबद्धता दिसून येत आहे आणि होतकरू आयुर्वेद शल्यविशारदांचे आधुनिक कौशल्यांद्वारे सक्षमीकरण होत आहे आणि एकात्मिक शल्यक्रिया सरावांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या तिसऱ्या दिवशी सुश्रुत पूजन समारंभ आयोजित करण्यात आला, त्यानंतर एका प्रबंध सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
160 पेक्षा जास्त सहभागींनी स्वतःची नोंदणी केली, ज्यामध्ये देशाच्या विविध भागातील पदव्युत्तर/पीएच. डी. विद्वान, निवासी डॉक्टर, शल्यविशारद आणि अध्यापक वर्गातील सहभागींचा समावेश होता.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033451)
Visitor Counter : 111