ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

कायदेशीर मापन पद्धती (पाकिटबंद वस्तूंसाठी नियम, 2011 [Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011] मध्ये सुधारणा कराव्यात असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या विचाराधीन


आधीच पाकिटबंद केलेल्या स्वरुपातील किरकोळ विक्रीसाठीच्या सर्व वस्तू - उत्पादनांच्या वेष्टणांवर सर्व तपशील जाहीर करणे बंधनकारक करण्याची तरतूद प्रस्तावित

या दुरुस्त्यांमुळे पाकिटबंद वस्तू - उत्पादकांचे उत्पादक /वस्तूंना वेष्टणबंद - पाकिटबंद करणारे /आयातदार यांना वस्तू - उत्पादनांची संख्या - प्रमाण कितीही असली तरी तपशील जाहीर करणे बंधनकारक असल्याची स्पष्टता येणार

औद्योगिक ग्राहक किंवा संस्थात्मक ग्राहकांसाठीच्या पाकिटबंद वस्तू - उत्पादनांसाठी हे हे नियम लागू नसणार

कायदेशीर मापन पद्धती (पाकिटबंद वस्तूंसाठी) नियम, [Legal Metrology (Packaged Commodities) Rules] सुधारणांबद्दल सर्व भागधारकांनी 29.7.2024 पर्यंत अभिप्राय द्यावा असे ग्राहक व्यवहार विभागाचे आवाहन

Posted On: 14 JUL 2024 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2024

 

ऑफलाइन क्षेत्रासह, ऑनलाइन व्यासपीठे अशा दोन्ही ठिकाणांवर बाजारपेठांचा वाढता विस्तार लक्षात घेऊन, कायदेशीर मापन पद्धती (पाकिटबंद वस्तुंसाठी) नियम, 2011 [Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011] मध्ये सुधारणा कराव्यात असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या विचाराधीन आहे. पाकिटबंद वस्तूंसंदर्भातील नियमांमध्ये एकरूपता आणता यावी हा या सुधारणांमागचा उद्देश असेल. या सुधारणांनंतरच्या नव्या तरतुदीनुसारचे सर्व सुधारित नियम औद्योगिक ग्राहक तसेच संस्थात्मक ग्राहकांसाठी असलेल्या पाकिटबंद वस्तू वगळून बाजारात विक्रीसाठी असलेल्या सर्व पाकिटबंद वस्तूंना लागू होणार आहेत.

नव्या सुधारित तरतुदींमुळे पाकिटबंद वस्तूंसाठी एक समान मानके /गरजेचे नियम स्थापित करायला मदत होईल, यासोबतच विविध ब्रँड आणि उत्पादनांमध्ये सुसंगतता निर्माण होऊन निष्पक्षता वाढू शकेल आणि या सगळ्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या संपूर्ण तपशील आणि माहितीच्या आधारे, आपल्यासाठी योग्य उत्पादनाची निवड करण्यातही मदत होणार आहे.

या नव्या प्रस्तावित सुधारणांबद्दल सर्व भागधारकांनी येत्या 29 जुलै 2024 पर्यंत, म्हणजे 15 दिवसांच्या आत आपापले अभिप्राय कळवावेत असे आवाहनही केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने केले आहे.

कायदेशीर मापन पद्धती (पाकिटबंद वस्तूंसाठी) नियम, 2011 [Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011] अंतर्गत उत्पादक /वस्तूंना वेष्टणबंद - पाकिटबंद करणारे /आयातदार या सगळ्यांची नावे आणि पत्ता, त्यांचा मूळ देश, संबंधित वस्तू - उत्पादनाचे सामान्य किंवा मूळ नाव, त्याचे निव्वळ प्रमाण, उत्पादनाचा महिना आणि वर्ष, किरकोळ दराची कमाल मर्यादा, प्रत्येक स्वतंत्र एककासाठीचा विक्री दर, संबंधित वस्तू - उत्पादन मानवी वापरासाठी अयोग्य होण्याची तसेच वापराच्या दृष्टीने सर्वोत्तम स्थितीत असण्याच्या मर्यादेची तारीख अर्थात best before/ use by date जाहीर करणे बंधनकारक आहे. आधीच पाकिटबंद करून विकल्या जाणाऱ्या वस्तू किंवा उत्पादनांच्या वापराच्या अनुषंगाने ग्राहकांचे सामान्य तसेच आरोग्यविषयक हित लक्षात ठेऊनच हे सर्व तपशील बंधनकारक केले गेले आहेत.

हे सर्व नियम खाली दिलेल्या गोष्टी वगळता आधीच पाकिटबंद करून विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू किंवा उत्पादनांसाठी लागू आहेत:

(a) 25 किलो किंवा 25 लिटरपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद वस्तू - उत्पादनांचा संच;

(b) 50 किलोपेक्षा जास्त प्रमाणाच्या पिशव्यांमधून विकल्या जाणाऱ्या सिमेंट, खते आणि शेतमाल ही उत्पादने आणि वस्तू, आणि 

(c) औद्योगिक ग्राहक किंवा संस्थात्मक ग्राहकांसाठी असलेली पाकिटबंद वस्तू - उत्पादने.

हे सर्व नियम 25 किलो किंवा 25 लिटरपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद वस्तू - उत्पादनांच्या संचांना लागू नाहीत. मात्र किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध केलेली वस्तू आणि उत्पादने ही सामान्यतः 25 किलोपेक्षा जास्त वजनाची नसतात असे या नियमांअंतर्गत गृहीत धरले गेलेले असल्याने, 50 किलोपेक्षा जास्त प्रमाणाच्या पिशव्यांमधून विकल्या जाणाऱ्या सिमेंट, खते आणि शेतमाल ही उत्पादने आणि वस्तू या नियमाला अपवाद  आहेत. मात्र त्याचवेळी प्रत्यक्ष बाजारपेठेत 25 किलोपेक्षा जास्त वजनाची पाकिटबंद वस्तू - उत्पादने देखील किरकोळ विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. खरे तर ही बाब किरकोळ विक्रीसाठी आधीच पाकिटबंद करून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तू - उत्पादनांच्या वेष्टणांवर सर्व तपशील देण्यामागच्या हेतूला अनुसरून नाही, आणि यातून नियमभंग होत असल्याचे निदर्शनाला आले आहे. 

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033147) Visitor Counter : 71