वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल इटलीत रेद्जो कालाब्रिया इथे होणार असलेल्या जी-7 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत आऊटरीच सत्रात होणार सहभागी


आपल्या इटली भेटीत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल जी-7 देशांचे व्यापार मंत्री तसेच इतर सहभागी देशांच्या व्यापार मंत्र्यांसोबत करणार द्विपक्षीय बैठका

Posted On: 13 JUL 2024 4:00PM by PIB Mumbai

 

इटलीत रेद्जो कालाब्रिया इथे जी-7 देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक होणार आहे. येत्या 16 आणि 17 जुलै 2024 रोजी ही बैठक होईल. देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे या बैठकीच्या आऊटरीच सत्रात सहभागी होणार आहेत.  आहेत. या बैठकांतील चर्चांमधून ते जागतिक व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीसंबंधी भारताची वचनबद्धता अधिक दृढ करतील.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या या भेटीतून भारतात असलेल्या व्यापार आणि गुंतवणुकीच्या अगणित संधी जगासमोर मांडण्याच्या भारताच्या धोरणात्मक प्रयत्नांना अधोरेखित होणार आहेत, यासोबतच या भेटीमधून भारताची कायद्याचे मजबूत राज्य असलेले लोकशाही राष्ट्र अशी प्रतिमाही ठळकपणे मांडली जाणार आहे.

इटलीला पोहोचण्याआधी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे 14 आणि 15 जुलै 2024 असे दोन दिवस स्वित्झर्लंडला भेट देणार आहेत. या भेटीत ते  स्वित्झर्लंडच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन चर्चा करणार आहे. या भेटींमध्ये होणाऱ्या चर्चेत प्रामुख्याने युरोपीय मुक्त व्यापार संघटनेच्या (European Free Trade Association - EFTA) व्यापार आणि आर्थिक भागीदारीविषयक कराराच्या (टीईपीए) अंमलबजावणीविषयी तसेच युरोपीय मुक्त व्यापार संघटनेमार्फत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याविषयी व्यक्त केलेल्या वचनबद्धतेला मूर्त रूप देण्यासाठी धोरणात्मक आखणी करण्याबाबतच्या मुद्यांवर भर दिला जाणार आहे. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातली द्विपक्षीय आर्थिक आणि सर्वसमावेशक भागीदारी अधिक बळकट करत, दोन्ही देशांमध्ये गहीरे आर्थिक संबंध प्रस्थापित करणे तसेच परस्परांच्या प्रगतीला चालना देणे ही या भेटीची उद्दीष्टे असणार आहेत.

रेद्जो कालाब्रिया इथे होत असलेल्या जी 7 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत आऊटरीच सत्रात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीबाबत कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याच्या मुद्यावर भारताची भूमिका स्पष्ट करतील. यासोबतच आपल्या संबोधनातून ते व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या महत्त्वाच्या सुधारणा आणि उपक्रमांबाबत उपस्थितांना विस्तृत माहितीही देतील.

आपल्या या इटलीच्या दौऱ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल जी-7 बैठकीतील आऊटरीच सत्रासोबतच, जी-7 सदस्य देशांचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच इतर सहभागी देशांच्या व्यापार मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत. व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींचा आणि शक्यतांचा शोध घेणे, द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित समस्यांची सोडवणूक करणे आणि परस्परांमधले आर्थिक सहकार्य वाढविणे हे या बैठकांचे उद्दिष्ट असणार आहे.

भारताने जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईपर्यंत घेतलेली झेप ही, भारताच्या बहुआयामी आर्थिक परिसंस्थेचा तसेच प्रगती साध्य करण्यासाठी भारतात असलेल्या अफाट क्षमतेचाच पुरावा आहे. भारताने  बाजारपेठांना अनुकूल अशा केलेल्या सुधारणा, इथले कुशल मनुष्यबळ आणि व्यापाराच्या दृष्टीने भारताचे धोरणात्मक भौगोलिक स्थान यामुळे, आपला देश जागतिक पटलावरील उद्योगजगतासाठी अनुकूल वातावरण मिळवून देणारा देश ठरला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची ही इटली भेट भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीला पुढे रेटा देणारी तसेच जागतिक पटलावर देशाचे हित साध्य करणारी ठरणार आहे.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2033019) Visitor Counter : 76