आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा घेतला आढावा
या योजनेअंतर्गत 34.7 कोटी आयुष्मान कार्डांची निर्मिती तर 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या उपचारासाठी 7.35 कोटींहून अधिक रूग्णालय प्रवेश.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये अडथळा आणणारी आव्हाने राज्यांच्या समन्वयाने लवकर सोडवली जातील याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
Posted On:
12 JUL 2024 6:39PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) बाबत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत आढाव घेतला.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांसमोर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती गौर मुखर्जी यांनी योजनांची ठळक वैशिष्ट्ये, योजनांची सद्यस्थिती आणि योजना अंमलबजावणीच्या विविध पैलूंबद्दल तपशीलवार सादरीकरण केले. या योजनेने 34.7 कोटी आयुष्मान कार्ड्सची निर्मिती तर 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या 7.35 कोटी रूग्णालय प्रवेशाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पॅनेलमधील रुग्णालयांचे जाळे मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या प्रभावी सहभागासाठीची एक योजना सादर केली.
सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (AB PM-JAY) द्वारे समाजातील सर्वात गरजू आणि असुरक्षित घटकांना लाभ मिळवून देण्याची पंतप्रधानांची
दूरदृष्टी अधोरेखित करताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या दूरदर्शी योजनांचा लाभ समाजातील सर्वात गरजू आणि असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या) प्रभावी अंमलबजावणीत अडथळा आणणारी कोणतीही समस्या आणि समोर येणारी आव्हाने राज्यांच्या समन्वयाने लवकर सोडवली जाईल याची खात्री आपण करणे आवश्यक आहे.”, असे नड्डा यांनी सांगितले. अशा समस्या सखोलपणे समजून घेण्यासाठी आणि एकजुटीने त्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने राज्यांशी नियमितपणे संपर्क आणि समन्वयक साधण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.
विशेषतः शहरी भागात आणि महानगरात पात्र लाभार्थ्यांची आयुष्मान कार्ड निर्मिती मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी, बॉटम-अप पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. जेणेकरून आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी लाभार्थ्यांचे सहजपणे सत्यापन करता येईल, असे मार्ग किंवा यंत्रणा आपण तयार करू शकू, असे नड्डा म्हणाले. "नोंदणी प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आपण आपल्या प्रणाली लवचिक आणि जलद ठेवूया", असा त्यांनी सल्ला दिला.
लाभार्थ्यांच्या अनुभवातून शिकणे महत्त्वाचे आहे असे नमूद करून नड्डा यांनी सांगितले की, स्मार्ट तंत्रज्ञान साधनांचा उपयोग लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचा आणि उपचारांचा अनुभव गोळा करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे आपल्याला आरोग्य सेवांचे वितरण सुधारण्यास मदत होईल, हे त्यांनी अधोरेखित केले.
फसवणूक शोध आणि प्रतिबंध याबाबत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे करण्यात येत असलेल्या उपायांची माहिती देखील केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली. या उपाययोजनांमुळे योजनेची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज (NHCX) चा देखील आढावा घेतला. एनएचसीएक्स हे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (IRDAI) च्या सहकार्याने विकसित केले आहे. रुग्णालयांनी विमा कंपनीकडे सादर केलेल्या दाव्यांचे कागद विरहित सेटलमेंट एनएचसीएक्स सक्षम करेल. यामुळे भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणाला (IRDAI) रिअल टाइममध्ये दावा परताव्यांची सद्यस्थिती डॅशबोर्ड वर पहायला मिळू शकेल. 99% विमा बाजार व्यापणाऱ्या 33 विमा कंपन्या एनएचसीएक्स व्यासपीठावर एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची स्थिती मोबाईलद्वारे देखील पाहता येणार आहे.
***
S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032905)
Visitor Counter : 91