वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या 74 व्या बैठकीत पाच प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन


नेटवर्क नियोजन गटाकडून रस्ते, रेल्वे आणि शहरी संक्रमण प्रकल्पांचे मूल्यांकन

Posted On: 10 JUL 2024 8:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2024


पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) 74 वी बैठक काल नवी दिल्ली येथे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) अतिरिक्त सचिव राजीव सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रेल्वे मंत्रालय (एमओआर), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच), आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयुए) यांच्याकडील पाच महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यामध्ये (एनएमपी) वर्णन केलेल्या एकात्मिक नियोजनाच्या तत्त्वांनुसार सुसंगत होण्यासाठी या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले.

ओदिशातील बलराम - तेंटुलोई नवीन रेल्वे मार्ग (एमसीआरएल टप्पा II)

या ग्रीनफिल्ड प्रकल्पामध्ये अंगुल जिल्ह्यात 11 कोळसा खाणींसाठी महत्त्वपूर्ण पहिल्या टप्प्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी अंदाजे 1,404 कोटी रुपये किमतीच्या  49.58 किमी रेल्वे मार्गाचे बांधकाम समाविष्ट आहे.

ओदिशातील बुधपंक - लुबुरी नवीन रेल्वे मार्ग (एमसीआरएल बाह्य कॉरिडॉर)

106 किलोमीटरच्या या ग्रीनफिल्ड रेल्वे मार्ग प्रकल्पाचा खर्च अंदाजे 3,478 कोटी रुपये असून महानदी नदीच्या खोऱ्यातून कार्यक्षम कोळसा बाहेर काढण्यास तो मदत करेल.

उत्तर प्रदेशातील लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा I-B पूर्व - पश्चिम कॉरिडॉर (चारबाग ते वसंत कुंज)

या प्रकल्पामध्ये शहराच्या वाढत्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लखनौ मेट्रो कॉरिडॉर 11.165 किलोमीटरने वाढवणे समाविष्ट आहे. सध्याचा मेट्रो मार्ग दररोज 80,000 प्रवाश्यांना (पीपीडी) सेवा पुरवत असताना, या अतिरिक्त नवीन मार्गावरून दररोज अतिरिक्त 200,000 प्रवासी वाहतूक होईल अशी अपेक्षा आहे.

गुजरातमधील NH-47 (नारोल जंक्शन ते सरखेज जंक्शन) च्या उन्नत कॉरिडॉरसह विद्यमान 6 पदरी रस्त्याचे अद्ययावतीकरण

या ब्राउनफील्ड प्रकल्पामध्ये प्रमुख महामार्ग आणि द्रुतगती मार्गांना जोडणाऱ्या अहमदाबादच्या दक्षिणेकडील भागातील वाढत्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी अंदाजे 1,295 कोटी रुपये प्रकल्प खर्चात NH-47 चा 10.63 किमी विभाग अद्ययावत करणे समाविष्ट आहे.

महाराष्ट्रातील चोकक ते सांगली (अंकली) या NH-166 च्या विभागाचे चौपदरीकरण

या प्रकल्पामध्ये NH-166 च्या 33.6 किमी विभागाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. याद्वारे मुख्य प्रदेशांमधील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर आणि सांगली दरम्यान कनेक्टिव्हीटी सुधारेल. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 864 कोटी रुपये आहे. या विकासामुळे प्रवासाचा वेळ निम्मा होईल तर अंतर सुमारे 5.4 किमी कमी होईल. याचा पर्यावरणीय गुणधर्मांवरही लक्षणीय परिणाम होईल. या रस्त्याच्या सुधारणेमुळे इंधन आणि वेळेची बचत होईल तसेच वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032241) Visitor Counter : 22