शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या (पीएसएससीआयव्हीई) बॅगलेस डेज मार्गदर्शक तत्त्वांचा सचिव संजय कुमार यांनी घेतला आढावा

Posted On: 09 JUL 2024 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2024

 

शिक्षण मंत्रालया अंतर्गत एनसीईआरटी चा विभाग असणाऱ्या पीएसएससीआयव्हीई अर्थात पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेद्वारे शाळांमध्ये बॅगलेस डेजकरिता (दप्तराविना शाळा) विकसित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा 28 जून 2024 रोजी सचिव (शालेय शिक्षण आणि साक्षरता) संजय कुमार यांनी घेतला. एनसीईआरटी, सीबीएसई, एनव्हीएस आणि केव्हीएस चे सहभागी या बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्थानिक पर्यावरणाविषयी जागरुक करणे, पाण्याची शुद्धता तपासण्यास शिकवणे, स्थानिक वनस्पती आणि प्राणी ओळखणे आणि स्थानिक स्मारकांना भेट देणे यासह विविध सूचनांवर यावेळी विचारमंथन झाले. या पुनरावलोकनाच्या आधारे, पीएसएससीआयव्हीई मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक ते बदल करून त्यास अंतिम स्वरूप देईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या परिच्छेद 4.26 नुसार, इयत्ता 6 ते 8 मधील सर्व विद्यार्थ्यांनी 10 दिवसांच्या बॅगलेस कालावधीत सहभागी होण्याची शिफारस करण्यात आली आहे. या वेळी, विद्यार्थी स्थानिक कौशल्य तज्ञांसोबत प्रशिक्षण पूर्ण करतील आणि पारंपरिक शालेय अभ्यासक्रमाच्या चाकोरीबाहेर अन्य उपक्रमांत सहभागी होतील. विद्यार्थ्यांना त्यांची शाळा ज्या विशाल परिसंस्थेमध्ये अंतर्भूत आहे त्याबद्दल जाणीव विकसित करण्यात मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

  

या शिफारशींच्या आधारे, पीएसएससीआयव्हीईने बॅगलेस डेजची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळांमधील शिक्षण अधिक आल्हाददायक, अनुभवात्मक आणि तणावमुक्त करण्यासाठी या मार्गदर्शक तत्वांची मांडणी करण्यात आली आहे. 

कला, प्रश्नमंजुषा, क्रीडा आणि कौशल्य-आधारित शिक्षण यासारख्या विविध उपक्रमांच्या समावेशाद्वारे बॅगलेस डेजला वर्षभर प्रोत्साहन दिले जाईल. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांना भेटी, स्थानिक कौशल्य गरजा ध्यानात घेऊन स्थानिक कलाकार आणि कारागीर यांच्याशी संवाद आणि त्यांच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील किंवा राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी याद्वारे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील उपक्रमांची वेळोवेळी माहिती मिळेल.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2031870) Visitor Counter : 62