मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

जागतिक पशुजन्य रोग दिनाच्या निमित्ताने जनजागृती उपक्रम : प्राण्यांना जडणारे सर्वच आजार हे पशुजन्य आजार नाहीत

Posted On: 07 JUL 2024 1:29PM by PIB Mumbai

 

जागतिक पशुजन्य रोग दिनाचे औचित्य साधून पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने जागतिक पशुजन्य रोग दिनाच्या पूर्वसंध्येला एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सचिव या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

पशुजन्य रोग हे सामान्यतः संसर्गजन्य आजार असतात. यात  रेबीज, अँथ्रॅक्स, इन्फ्लूएंझा (एच 1 एन 1 आणि एच 5 एन 1), निपाह, कोविड - 19, ब्रुसेलोसिस आणि क्षयरोग यांसारख्या आजार आणि रोगांचा समावेश होतो. हे आजार प्राणी आणि मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात. हे आजार सुक्ष्म जीवतंतू, विषाणू, परजीवी आणि बुरशी या आणि अशा रोगांना कारणीभूत ठरू शकणाऱ्या विविध घटकांमुळे उद्भवू शकतात.

असे असले तरी देखील प्राण्यांना होणारे सर्वच आजार हे पशुजन्य रोग या वर्गवारीत येत नाहीत. प्राण्यांना जडणाऱ्या आजारांपैकी अनेक रोग हे पशुधनावर परिणाम करणारे असले तरी त्यांमुळे मानवी आरोग्याला मात्र  धोका निर्माण होत नाही. अशा प्रकारचे बिगर - पशुजन्य (non-zoonotic) वर्गवारीत येणारे रोग हे विशिष्ट प्रजातींमध्ये आढळतात, आणि ते मानवाला संक्रमित करू शकत नाहीत.

पशुजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी तसेच त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण, योग्य स्वच्छता, सुयोग्य पशुपालन पद्धतींचा अवलंब आणि रोग प्रसारकांवर नियंत्रण हेच सर्वोत्तम उपाय आहेत. यादृष्टीने मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याला परस्परांशी जोडण्याच्या तत्वावर भर असलेल्या, एकात्मिक आरोग्याचा दृष्टीकोन बाळगत एकत्रित प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पशुजन्य रोगांच्या समस्येवर काम करण्याच्यादृष्टीने पशुवैद्यक, वैद्यकीय व्यावसायिक आणि पर्यावरण शास्त्रज्ञ यांच्यामधील परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारी अत्यंत गरजेची आहे.

पशुजन्य रोगांविषयी जनजागृती केल्यामुळे या आजारांच्या लक्षणावरून ते वेळेत ओळखायला तसेच या आजारांना प्रतिबंध करण्यासह, त्यांवर  नियंत्रण मिळवायला मोठी मदत होऊ शकेल, आणि पर्यायाने सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणाचे उद्दिष्टही साध्य होऊ शकेल. नागरिकांमध्ये पशुजन्य आणि बिगर पशुजन्य रोगांमधील फरकाबद्दलच्या माहितीविषयी जागृती केल्याने, या आजारांबद्दलची लोकांमधील अनावश्यक भीती कमी होण्याला मदत होईल आणि त्यासोबतच लोकांमध्ये प्राण्यांचे आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेविषयी जाणिवा निर्माण करण्यालाही चालना मिळू शकेल.

दुसरीकडे पशुजन्य रोगांमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो ही  वस्तुस्थिती असली, तरी त्याचवेळी पशुधनाला जडणाऱ्या अनेक आजारांपैकी अनेक आजार हे पशुजन्य रोगांच्या वर्गवारीत येत नाहीत ही बाब समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा फरक समजून घेणे आणि त्याचबरोबरीने रोग व्यवस्थापनांच्या सुयोग्य पद्धतींवर दिला, तर आपण प्राणी आणि मानव दोघांच्याही आरोग्यविषयक हिताची सुनिश्चिती करू शकतो, आणि त्याद्वारे आपल्या सर्वांसाठी सुरक्षित आणि अधिक संरक्षित पर्यावरणाच्या निर्मिती प्रक्रियेतही योगदान देऊ शकतो.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031428) Visitor Counter : 63