इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दोन दिवसीय जागतिक इंडिया एआय शिखर परिषद 2024 चा समारोप

Posted On: 04 JUL 2024 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

जागतिक इंडिया एआय शिखर परिषदेचा आज नवी दिल्ली इथे भारत मंडपममध्ये यशस्वी समारोप झाला. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाविषयी 12 सत्रांचे या दोन दिवसीय परिषदेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जगातील एआय तज्ञ, धोरणकर्ते, एआयचे वापरकर्ते, उद्योग व स्टार्टअप आणि शैक्षणिक क्षेत्रातील जवळपास 2,000 लोक सहभागी झाले. एआयबाबत उत्सुक असलेल्या सुमारे 9,000 जणांनी परिषदेतील सत्रांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली. परिषदेतील इतर सत्रे निवडक शिष्टमंडळ आणि एआयसाठी असलेल्या जागतिक भागीदारी अर्थात जीपीएआयच्या तज्ञांपुरती मर्यादित ठेवून भरवण्यात आली होती. खुल्या सत्रांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग होता.

शिखर परिषदेतील चर्चेअंती समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

  1. परिषदेसाठी अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने नोंदणी झाली. एआय तज्ञ, वापरकर्ते आदी 2,000 लोक प्रत्यक्षात तर 10,000 पेक्षा अधिक व्यक्ती दूरदृश्य माध्यमातून सत्रांमध्ये सहभागी झाल्या.
  2. प्रत्येक सत्रात विषयाच्या विविध पैलूंवर सखोल व विचारप्रवर्तक चर्चा झाली; त्यामध्ये अंमलबजावणीतील महत्त्वाची आव्हाने, उपलब्ध असलेले पाश्चात्त्य साचे, एआयच्या विकासाची भारताला देशांतर्गत मागणीनुसार असलेली गरज आणि जागतिक पातळीवर या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची आकांक्षा आदी मुद्द्यांचा समावेश होता.
  3. एआयचा सरकारकडून लोकशाही पद्धतीने वापर आणि सर्वांसाठी एआयची उपलब्धता या भूमिकेतून भारताने जागतिक पातळीवर एआयबाबत चर्चेला प्रोत्साहन दिले.
  4. इंडिया एआय मिशनचे आधारस्तंभ ठरतील असे विषय सत्रांच्या माध्यमातून परिषदेत मांडून भारताने कृतीशील आखणी आणि समावेशी, भक्कम एआय व्यवस्था उभारणे व जागतिक पातळीवर एआय नवोन्मेषासाठी नेतृत्व करण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचे दर्शन घडवले.
  5. परिषदेच्या माध्यमातून एआयसंदर्भात भूमिका मांडण्यासाठी आणि ग्लोबल नॉर्थ व ग्लोबल साऊथ यांच्यातील दरी कमी करण्यासाठी भारताने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची दखल घेऊन त्याबद्दल ग्लोबल साऊथमधील राष्ट्रांनी भारताची प्रशंसा केली.
  6. जागतिक भागीदारीसाठी एआय संदर्भात सहयोगासाठी समन्वयाने  जीपीएआयचे सदस्य, एआय तज्ञ आणि उद्योगजगताच्या प्रतिनिधींना जागतिक पातळीवरील एआयबाबत दरी सांधण्यासाठी गरजेच्या व्यवस्था ओळखण्यासाठी एकत्र येणे शक्य झाले.
  7. ओईसीडी – ओसीडीई आणि जीपीएआय यांनी एआयसाठी नव्या एकात्मिक भागिदारीची नवी दिल्लीत घोषणा केली.
  8. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक भागीदारीसाठी भविष्यात आवश्यक बाबींवर जीपीएआयच्या सदस्यांनी सहमती दर्शवली.

इंडिया एआय आणि जीपीएआय विषयक अधिक माहितीसाठी पाहा https://indiaai.gov.in/

  

  

  

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030859) Visitor Counter : 21