इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात कृत्रिम प्रज्ञेचा जबाबदारीने विकास, योग्य ठिकाणी वापर आणि अंगिकाराला चालना देण्याच्या वचनबद्धतेने ग्लोबल इंडियाएआय शिखर परिषद 2024 चे आयोजन


कृत्रिम प्रज्ञेवरील जागतिक भागीदारीचा (GPAI) अध्यक्ष म्हणून सदस्य देश आणि तज्ञांसाठी भारत भूषवणार यजमानपद

Posted On: 01 JUL 2024 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2024  

 

देशात कृत्रिम प्रज्ञेचा जबाबदारीने विकास, योग्य ठिकाणी वापर आणि अंगिकाराला चालना देण्याच्या अविचल वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 3 आणि 4 जुलै रोजी "ग्लोबल इंडियाएआय शिखर परिषद 2024"चे नवी दिल्लीत आयोजन केले आहे. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या नैतिक आणि समावेशक वृद्धीबाबत भारताच्या बांधिलकीला अधोरेखित करत सहकार्य आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देणे हा या शिखर परिषदेचा उद्देश आहे.

ग्लोबल इंडियाएआय शिखर परिषद 2024

ही शिखर परिषद विज्ञान, उद्योग, नागरी समाज, सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय एआय तज्ञांना कृत्रिम प्रज्ञाविषयक प्रमुख समस्या आणि आव्हानांवर आपल्या दृष्टिकोनांविषयी परस्परांसोबत विचारविनिमय करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. हा कार्यक्रम जागतिक एआय हितधारकांमध्ये सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवून कृत्रिम प्रज्ञेच्या जबाबदार विकासाबाबतची भारताची वचनबद्धता अधोरेखित करत आहे. कृत्रिम प्रज्ञेचे लाभ सर्वांना उपलब्ध होतील आणि ते देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देतील हे सुनिश्चित करून, ग्लोबल इंडियाएआय शिखर परिषद 2024 च्या माध्यमातून एआय नवोन्मेषात स्वतःला जागतिक नेता म्हणून प्रस्थापित करण्याची भारताची आकांक्षा आहे.

या शिखर परिषदेतील वक्ते आणि कार्यक्रम यांची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा.

कृत्रिम प्रज्ञेवरील जागतिक भागीदारीचा (GPAI) अध्यक्ष म्हणून, सुरक्षित, संरक्षित आणि विश्वासार्ह एआयबाबतच्या या भागीदारीच्या बांधिलकीला चालना देण्यासाठी भारत सदस्य देश आणि तज्ञांसाठी  यजमानपद देखील भूषवणार आहे.

 

इंडियाएआय मिशनविषयी

संगणन उपलब्धतेचे लोकशाहीकरण, माहितीसंचाच्या दर्जात सुधारणा, स्वदेशी एआय क्षमतांचा विकास, अग्रस्थानावरील एआय प्रतिभांना आकर्षित करून, उद्योग सहकार्याच्या सुविधा देऊन, स्टार्टअप जोखीम भांडवल उपलब्ध करून देऊन, सामाजिक प्रभाव असलेले एआय प्रकल्प सुनिश्चित करून आणि नैतिक एआयला प्रोत्साहन देऊन एक सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करण्याचा इंडियाएआय मिशनचा उद्देश आहे.

हे मिशन खालील सात स्तंभांच्या माध्यमातून भारताच्या एआय परिसंस्थेच्या जबाबदार आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देते, जे ग्लोबल इंडियाएआय शिखर परिषद 2024 शिखर परिषदेचे प्रमुख केंद्रबिंदू असतील.

इंडियाएआय मिशनचे प्रमुख स्तंभ

  1. इंडिया एआय संगणन क्षमताः सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून सुमारे 10,000 जीपीयूंसह एक स्केलेबल एआय संगणन परिसंस्था निर्माण करणे. एक एआय बाजारपेठ, एआयला एक सेवा म्हणून आणि पूर्व-प्रशिक्षित मॉडेल्स उपलब्ध करून देईल आणि अत्यावश्यक एआय संसाधनांसाठी एक केंद्र म्हणून काम करेल.
  2. इंडियाएआय नवोन्मेष केंद्रः स्वदेशी बनावटीची विशाल मल्टीमोडल मॉडेल्स(एलएमएम) आणि डोमेन आधारित फाउंडेशनल मॉडेल्स यांचा विकास आणि योग्य जागी तैनाती यावर भर असेल. भारताचे वैविध्यपूर्ण उद्योग आणि क्षेत्रांची गरज भागवण्याचे काम ही मॉडेल्स करतील.
  3. इंडियाएआय डेटासेट्स प्लॅटफॉर्मः एआय नवोन्मेषाकरिता उच्च दर्जाच्या बिगर-व्यक्तिगत डेटासंचाची हाताळणी सुलभ करेल.  एक एकीकृत डेटा प्लॅटफॉर्म भारतीय स्टार्ट अप्स आणि संशोधक यांना भक्कम एआय मॉडेल्सच्या विकासात मदत करून सहजतेने उपलब्धता सुनिश्चित करेल.  
  4. इंडियाएआय ऍप्लिकेशन विकास उपक्रमः प्रमुख क्षेत्रांमधील  केंद्रीय मंत्रालये, राज्यांचे विभाग आणि इतर संस्थांच्या समस्यांचे निवारण करणाऱ्या एआय ऍप्लिकेशन्सला प्रोत्साहन दिले जाईल. हा उपक्रम व्यापक स्तरावरील सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी परिणामकारक एआय उपाययोजना तयार करण्यावर भर देईल.
  5. इंडियाएआय फ्युचर स्किल्स: विविध शैक्षणिक स्तरांवर एआय अभ्यासक्रमांमध्ये वाढ करून आणि द्वितीय आणि तृतीय स्तराच्या शहरांमध्ये डेटा आणि एआय प्रयोगशाळा स्थापन करून एआय शिक्षणातील अडथळे कमी केले जातील. यामुळे देशभरात कुशल एआय व्यावसायिकांचा सातत्याने पुरवठा करणारे एक स्थिर भांडार सुनिश्चित होईल.
  6. इंडियाएआय स्टार्टअप फायनान्सिंग: डीप-टेक एआय स्टार्टअप्सना सुलभ पद्धतीने निधीपुरवठ्याची सुविधेसह पाठबळ देणे. जोखीम भांडवल आणि अर्थसाहाय्याचे पाठबळ उपलब्ध करून तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आणि आर्थिक वृद्धीला चालना देणाऱ्या एआय स्टार्टअप्सच्या एका सक्रीय परिसंस्थेची जोपासना करण्याचा या मिशनचा उद्देश आहे.
  7. सुरक्षित आणि विश्वासार्ह एआयः जबाबदार एआय प्रकल्पांची अंमलबजावणी, स्वदेशी साधने आणि चौकटींचा विकास यांच्या माध्यमातून आणि नैतिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह एआय तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शक नियमावली स्थापन करून जबाबदार एआय विकास सुनिश्चित करणे.

 

* * *

NM/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029968) Visitor Counter : 82