पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
तळागाळातील पायाभूत सुविधा मजबूत करत असतानाच आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे: हरदीप सिंह पुरी
Posted On:
30 JUN 2024 7:33PM by PIB Mumbai
पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धांसाठीच्या भारतीय चमूला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “ऑलिंपिक हे मानवी कर्तृत्वाचे शिखर आहे, असे ते म्हणाले. “2024 च्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सर्व यशस्वी खेळाडूंचे मी 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो!” असे त्यांनी सांगितले.
भारतीय ऑलिम्पिक संघटने तर्फे आज नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित समारंभात पुरी उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा आणि कामगार तसेच रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आणि खासदार डॉ.पी.टी. उषा देखील उपस्थित होत्या.
“एक काळ असा होता जेव्हा अशा कार्यक्रमांचे आयोजन मर्यादित अपेक्षांनी केले जात असल्याचे पुरी यांनी सांगितले. पण आता, एक राष्ट्र म्हणून नुकत्याच मिळालेल्या यशामुळे अपेक्षा खूप वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.
तेल आणि वायू सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचा संदर्भ देत हरदीप सिंह पुरी म्हणाले, “ खेळाडूंना स्पर्धांची तयारी करण्यासाठी शक्य तितक्या चांगल्या सुविधा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध तेल आणि वायू उद्योगातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा संरक्षक म्हणून येथे उपस्थित असल्याबद्दल मला आनंद होत आहे. तळागाळातील पायाभूत सुविधा मजबूत करत असतानाच आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे,” असेही ते म्हणाले.
इंडियन ऑइल कंपनीने प्रायोजित केलेले 12 खेळाडू यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मंत्र्यांनी सांगितले. याशिवाय आणखी 5 खेळाडू ओ एन जी सी द्वारे समर्थित आहेत”, असे पुरी पुढे म्हणाले. “एकट्या बीपीसीएल कंपनीने 250 हून अधिक खेळाडूंना मदत केली आहे, असेही ते म्हणाले.
जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंचे कठोर परिश्रम, समर्पण आणि अदम्य उत्साह भावनेचा भारतीयांनी उत्सव साजरा केला आहे, असे डॉ. मनसुख मांडविया यावेळी म्हणाले.
“मला विश्वास आहे की हा खेळाडूंचा चमू क्रीडा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीची वाटचाल अशीच पुढे नेत राहील, असे ते म्हणाले. मला आशा आहे की आमचे खेळाडू यावेळी आम्हाला पदक तालिकेत आणखी वरच्या स्थानावर पोहोचवतील,” असे त्यांनी सांगितले.
स्वागतपर भाषणात, डॉ. उषा म्हणाल्या की पॅरिस 2024 ऑलम्पिक मध्ये भारताच्या क्रीडापटूंना क्रीडा विज्ञान समर्थनाची कमतरता भासू नये याची खात्री करण्यासाठी त्यांनी खेळाडू म्हणून स्वतःच्या अनुभवाचा उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले.
भारत ऑलिम्पिकसाठी सुमारे 120 क्रीडापटूंचे दल पाठवणार आहे, ज्यामध्ये पुरुष भालाफेकीतील गतविजेता नीरज चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली ऍथिलिट संघ, 21 सदस्यीय नेमबाजी संघ आणि 16 सदस्यीय पुरुष हॉकी संघ यांचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), रिलायन्स फाऊंडेशन, अदानी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल हे टीम इंडियाचे प्रमुख प्रायोजक आहेत.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2029794)
Visitor Counter : 124