वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पंतप्रधान अत्यंत संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल - पीयूष गोयल
तंबाखू उत्पादक शेतकरी आणि उद्योगाच्या समस्या सोडविण्याचे मंत्र्यांनी दिले आश्वासन
पीयूष गोयल यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक मदत देण्याचा तंबाखू मंडळाला दिला सल्ला
Posted On:
30 JUN 2024 5:04PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 29.06.2024 रोजी हैदराबादमधील शमशाबाद येथील नोवोटेल येथे तंबाखू उत्पादक शेतकरी, उत्पादन निर्यातदारांसोबत बैठक घेतली. या वेळी संबोधित करताना गोयल यांनी, फ्ल्यू क्युअर्ड व्हर्जिनिया तंबाखूसाठी शेतकऱ्यांना विक्रमी उच्च किंमत मिळाल्याबद्दल तसेच आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय तंबाखूच्या विक्रमी उच्च निर्यात कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.
उपस्थितांनी या संधीबद्दल मंत्र्यांचे आभार मानले. तसेच तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना तंबाखू उत्पादनात भेडसावणाऱ्या समस्या जसे की मजुरांचा तुटवडा, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी मदतीचा अभाव, सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) खताची जास्त किंमत, अतिरिक्त तंबाखू उत्पादनासाठी दंड, तंबाखूच्या कोठारांसाठी वाढीव इंधन खर्च यांसारख्या समस्यांची माहिती दिली आणि सरकारकडून आवश्यक तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्याची मागणी केली. तंबाखू निर्यातदारांना निर्यात प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही योजनेत समाविष्ट केले जात नाही अशी माहिती देत तंबाखू व्यापाऱ्यांनी तंबाखू निर्यातदारांना निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि करमाफी (RoDTEP) योजनेत समाविष्ट करून त्यांना प्रोत्साहन देण्याची विनंती केली. सरकारी तिजोरी चे मोठे नुकसान करत असलेल्या भारतातील तंबाखूचे अनधिकृत उत्पादन आणि तंबाखू वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारला मदत करण्याची विनंती या व्यापाऱ्यांनी केली. अवैध सिगारेट विक्रीत वाढ होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पियुष गोयल यांनी तंबाखू उत्पादक शेतकरी आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेतली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पंतप्रधान अत्यंत संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सांगितले. तंबाखू उत्पादक शेतकरी आणि उद्योग यांच्या समस्यांवर पुढील उपाययोजना करून अडचणी सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तंबाखू मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पादित केलेल्या अतिरिक्त तंबाखूवरील दंड माफ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी 7 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसह बिनव्याजी कर्जाची व्यवस्था करण्याचा सल्लाही त्यांनी तंबाखू मंडळाला दिला. तंबाखू मंडळाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात वाढीव आर्थिक मदत द्यावी, असेही त्यांनी सुचवले.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2029769)
Visitor Counter : 89