संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख पदावरून सेवानिवृत्त

Posted On: 30 JUN 2024 1:01PM by PIB Mumbai

 

जनरल मनोज पांडे, लष्करातील आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या  सेवा कर्तव्यानंतर आज सेवानिवृत्त झाले.  त्यांचा कार्यकाळ उच्च स्तरीय   युद्ध  सज्जता, परिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देण्याबरोबरच आत्मनिर्भरता उपक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी स्मरणात राहील.

लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी उत्तर आणि पश्चिम सीमेवर सैन्य परिचालन तयारीला सर्वोच्च प्राधान्य दिले.  त्यांनी जम्मू आणि काश्मीर, पूर्व लडाख आणि ईशान्येकडील सीमा भागांना वारंवार भेटी दिल्या आणि सर्व श्रेणींची सैन्य सज्जता आणि मनोधैर्य वाढवणे याला प्राधान्य दिले.

जनरल मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराच्या सर्वांगीण परिवर्तनाची सुरुवात तंत्रज्ञानाच्या अंतर्भावावर लक्ष केंद्रित करून पाच भिन्न स्तंभांखाली केली.  या तांत्रिक उपक्रमांतर्गत परिमाणित प्रगती साधली गेली, जी भारतीय सैन्याला आधुनिक, चपळ, अनुकूल आणि तंत्रज्ञान-सक्षम भविष्यासाठी-तयार असलेल्या सैन्य दलात रूपांतरित होण्याच्या दिशेने पुढे नेत राहील.

आत्मनिर्भरताउपक्रमांतर्गत स्वदेशी शस्त्रे आणि उपकरणे यांच्या वापरावर त्यांनी भर दिल्याने भारतीय लष्कराच्या दीर्घकालीन निरंतरतेचा मार्ग मोकळा झाला आहे.  त्यांनी मानव संसाधन विकास उपक्रमांना चालना दिली असून या उपक्रमांचा लष्करातील कर्मचाऱ्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आणि माजी सैनिकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे.

लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी  द्विपक्षीय, बहुपक्षीय युद्ध सराव, चर्चासत्र आणि चर्चांना प्रोत्साहन दिले.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली, दक्षिण आशिया आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचे सर्वसमावेशक विश्लेषण करण्यासाठी चाणक्य संरक्षण  संवादाची स्थापना करण्यात आली.  याव्यतिरिक्त, त्यांनी हिंद प्रशांत लष्कर प्रमुख परिषद आयोजित करून तसेच भागीदार राष्ट्रांसह वार्षिक सरावांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढवून लष्करी मुत्सद्देगिरीला योग्य प्राधान्य दिले.         

 जनरल मनोज पांडे यांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या लष्करी प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये झाली होती.  डिसेंबर 1982 मध्ये कोर ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती.  वेगवेगळ्या कार्यान्वयन वातावरणात त्यांनी महत्त्वाच्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि आव्हानात्मक कमांड सांभाळल्या होत्या.

जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029740) Visitor Counter : 79