विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 28 जून 2024 रोजी होणार भुवन पंचायत आणि राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन डेटाबेस या दोन पोर्टलचे उद्घाटन

Posted On: 27 JUN 2024 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्या (28 जून) नवी दिल्लीत दोन जिओ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. या वेळी जलशक्ती, खाण, गृह मंत्रालय तसेच अवकाश विभागाचे सचिव उपस्थित राहतील.

केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या आणि विभागांच्या आवश्यकतेनुसार भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)  देशामध्ये सुशासन, शाश्वत विकास आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी भूस्थानिक डेटाबेस, भौगोलिक पोर्टल आणि निर्णय समर्थन प्रणाली विकसित करत आहे.

इस्रोने अलीकडेच दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील भू-स्थानिक डेटाबेसच्या अद्ययावत आवृत्त्या तयार केल्या आहेत (1) भुवन पंचायत (आवृत्ती 4.0) मध्ये पंचायती राज मंत्रालयासाठी विकेंद्रित नियोजन केले आहे आणि (2) आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेटाबेस (एनडेम आवृत्ती 5.0) गृह मंत्रालयाला आपत्ती व्यवस्थापनात सहाय्य करणार आहे.

या दोन्ही जिओपोर्टलचे अनावरण नवी दिल्लीत लोधी मार्गावरच्या पृथ्वी भवनात तिसऱ्या मजल्यावरच्या अर्णव सभागृहात 28 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता जितेंद्र सिंह यांच्या हस्ते होईल.

भुवन पंचायत जिओपोर्टलची सध्याची आवृत्ती (4.0) म्हणजे ऑनलाइन भू-स्थानिक डेटा आणि सेवा प्रसार मंच (https://bhuvanpanchayat.nrsc.gov.in/) आहे. प्रशासन आणि संशोधन उपक्रमांमध्ये अवकाश-आधारित माहितीचं एकत्रीकरण आणि वापर यासाठी ही आवृत्ती पाठबळ देते. ग्रामपंचायत स्तरापर्यंत स्थानिक नियोजनाचा समावेश त्यात आहे.

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेटाबेसमुळे (एनडेम) संपूर्ण देशात सर्वसमावेशक, एकसमान, रचनात्मक, बहु आयामी, मोठ्या प्रमाणातील भू-स्थानिक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपत्ती/आणीबाणीच्या स्थितीत परिस्थितीजन्य मूल्यांकन आणि प्रभावी निर्णय घेणे शक्य होईल. देशात नैसर्गिक आपत्तींची जोखीम प्रभावीपणे कमी करण्यासाठी सर्व टप्प्यांतील चाचपणीसह आपत्ती पूर्वानुमान संस्थांकडे उपलब्ध असलेल्या आपत्ती समर्थन प्रणालींसाठी लागणारी साधने आणि सेवांना एकत्र करून अंतराळविषयक माहिती पुरवण्यासाठी एनडेम राष्ट्रीय स्तरावरील भू-पोर्टल म्हणून कार्य करेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने आपत्कालीन प्रतिसादासाठी स्थापन केलेल्या एकात्मिक नियंत्रण कक्षाला (आयसीआर-ईआर) आपत्तीतून सावरण्यासाठी काय करायला लागेल याची माहिती देणारे माध्यम म्हणूनही एनडेम कार्य करेल.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029154) Visitor Counter : 68