आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव गणपतराव जाधव यांच्या उपस्थितीत अतिसार रोखण्यासंबंधी राष्ट्रीय मोहीम 2024 चा केला प्रारंभ

Posted On: 24 JUN 2024 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2024

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्ली येथे अतिसार रोखण्यासंबंधी राष्ट्रीय मोहीम 2024 चा प्रारंभ केला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव गणपतराव जाधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या मोहिमेचे बोधचिन्ह, भित्तिचित्रे, रेडिओ स्पॉट्स आणि दृक्श्राव्य साहित्य यासारख्या आयईसी साहित्याचे प्रकाशन करण्यात आले तसेच मुलांना ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ORS) अर्थात जल क्षार संजीवनी आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

बालपणातील अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हे राष्ट्रीय अतिसार विरोधी मोहीम 2024 चे ध्येय आहे.

“मिशन इंद्रधनुष, रोटाव्हायरस लस आणि या  अतिसार विरोधी मोहिमेमध्ये एक अनोखा संबंध आहे कारण हे सर्व माझ्या या आधीच्या आरोग्य मंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या पहिल्या उपक्रमांपैकी आहेत” असे जे पी नड्डा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. केंद्र सरकारने राबवलेल्या विविध उपक्रमांचे फलित म्हणून अतिसारामुळे होणारे बालमृत्यू कमी होण्यास मदत झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

   

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भारतातील अतिसार व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना संवेदनशील बनवण्याच्या महत्त्वावरही भर दिला. राज्यांच्या अतिसार विरोधी मोहीमेच्या तयारीबद्दल कौतुक व्यक्त करून जे पी नड्डा यांनी राज्यांना जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले.  

“केवळ सुदृढ मुलेच निरोगी राष्ट्राची निर्मिती करु शकतात” हे अधोरेखित करून अतिसार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत यावर प्रतापराव जाधव  यांनी भर दिला.  मुलांना ओआरएस आणि झिंक गोळ्या देण्याबरोबरच स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करणे आणि अतिसार प्रतिबंधक लक्ष्य निश्चित करण्याचे आवाहन जाधव यांनी अधिकाऱ्यांना केले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या मोहिमेवर आपले विचार मांडले आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या.  या अधिकाऱ्यांनी मोहिमेच्या तयारीबाबत माहिती दिली आणि आपल्या काही सर्वोत्तम पद्धती देखील सामायिक केल्या.

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028379) Visitor Counter : 38