कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘भारत आंतरराष्ट्रीय कौशल्य’ अंतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल आरोग्य सेवेतील 32 युवा व्यावसायिकांचा सत्कार


प्रत्येक कुशल भारतीय व्यावसायिक परिवर्तन घडवणारा आणि भारताचा राजदूत आहे - जयंत चौधरी

Posted On: 22 JUN 2024 8:30PM by PIB Mumbai

 

जर्मन भाषा प्रशिक्षणाचे B1 स्तर यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जयंत चौधरी, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE), यांनी 32 आरोग्यसेवा व्यावसायिकांचा आज सत्कार केला. भारतीय परिचारिकांना जागतिक कारकिर्दीसाठीच्या संधींसह सक्षम करणे तसेच, जर्मनीमध्ये यशस्वी कारकीर्द आणि उपजीविकेसाठी त्यांना आवश्यक भाषा कौशल्य देणे, हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.

जयंत चौधरी, जर्मनीचे राजदूत डॉ. फिलिप अकरमन, एमएसडीईचे सचिव अतुल कुमार तिवारी आणि एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेदमणी तिवारी यांनी उमेदवारांना विमानतळावर घेऊन जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवून त्यांचे मनोबल वाढविले.

भारताच्या लोकसंखेचा लाभांश खूप मोठा आहे, त्यामुळे देश आणि ग्रामीण भागाचे 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्थेत रूपांतर करण्याचा एक स्पष्ट मार्ग उपलब्ध आहे, असे चौधरी यावेळी म्हणाले. आज जगात कुशलतेची दरीही वाढत आहे; संकुचित होत चाललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेतही 2030 पर्यंत जगात अंदाजे 8.5 कोटी संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. या संधी देशातील इच्छुक युवा व्यावसायिकांनी मिळवल्या पाहिजेत जेणेकरून, अर्थव्यवस्थेचा भावी मार्ग सुकर होईल, यावरही चौधरी यांनी भर दिला.

एकट्या जर्मनीमध्ये, त्यांच्या वय वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे योग्य उमेदवारांसाठी अंदाजे 18 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध असतील, असे त्यांनी सांगितले. या पदांवर लक्ष केंद्रित करून ती पदे भरण्यासाठी योग्य दृष्टीकोन ठेवला पाहिजे आणि कौशल्य भारताच्या आंतरराष्ट्रीय उद्योगाशी मजबूत संबंधांमुळे ही उणीव भरून निघू शकते, असेही चौधरी म्हणाले.

जागतिक कौशल्य शक्तीकेंद्र होण्याच्या भारताच्या ध्येयधोरणाचा एक भाग म्हणून विविध देशांमध्ये 58,000 हून अधिक कुशल भारतीयांच्या यशस्वी नियुक्तीवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. परदेशात रोजगाराचे उद्दिष्ट असलेल्या भारतीय युवकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी MSDE आणि NSDC इंटरनॅशनलच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. यशस्वी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यातील भूमिकांसाठी प्रेरणादायी आत्मविश्वास व उत्साह वाढवण्यासाठी त्यांना वैयक्तिकरित्या त्यांच्या रोजगाराची नियुक्तीपत्रे प्रदान केली.

सर्व 32 उमेदवारांनी TELC द्वारे B1 जर्मन भाषा प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना यापुढच्या B2 प्रशिक्षणासोबत दरमहा 2300 ते 2700 युरो (अंदाजित रु. 2 लाखांहून अधिक) उत्पन्न मिळेल; आघाडीची रुग्णालये आणि रोजगार प्रदात्यांसोबत काम करता येईल. जर्मनीत B2 पूर्ण केल्यानंतर त्यांचे अंदाजित वेतनमानात रु. 3 ते 4 लाखांपर्यंत वाढ होईल.

डॉ. फिलीप ॲकरमन यांनी भारताच्या कौशल्य परिसंस्थेची प्रशंसा केली आणि अशा अनेक संधींची ही सुरुवात असेल, अशी आशा व्यक्त केली. जर्मनीमध्ये, विशेषत: आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढती कौशल्याची दरी हे एक महत्त्वाचे आव्हान आहे आणि हे रचनात्मक स्थलांतर असल्याने त्यावर उपाय शोधण्याची गरज भासू लागली. हे केवळ कौशल्याची दरीच भरून काढत नाही तर, आरोग्यसेवा उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अपेक्षित गुणवत्ता देखील प्रदान करते, असेही ते म्हणाले. भारताची शिक्षण व्यवस्था, मजबूत कौशल्य पायाभूत सुविधा आणि व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम, हे अंतर भरून काढण्यास सहाय्यभूत ठरत आहेत, असेही डॉ. ॲकरमन यांनी सांगितले. एनएसडीसी इंटरनॅशनलने अवघ्या दोन महिन्यांत जर्मनीसाठी युवा कामगारांची फळी उभी करण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

भारत आंतरराष्ट्रीय कौशल्य उपक्रमांतर्गत विज्ञान पदवी संपादन केलेल्या सर्व उमेदवारांना दोन ते तीन महिन्यांचा सर्वसमावेशक परिचारिका किंवा सामान्य परिचारक आणि प्रसूतीशास्त्र (GNM) निवासी प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात आला होता. व्यावसायिक जर्मन मूळ प्रशिक्षकांद्वारे दिला जात असलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम सहभागींना उच्च दर्जाचे भाषा शिक्षण मिळेल याची खात्री करतो. अशा प्रकारचा विकास भारताला कुशल प्रतिभेचे जागतिक केंद्र बनविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो आणि भारत कौशल्य मोहिमे अंतर्गत महत्त्वाकांक्षी धोरणांची रूपरेषा आखतो.

NSDC, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखाली, NSDC इंटरनॅशनलने त्यांच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीच्या माध्यमातून कुशल कामगारांचा एक विश्वासार्ह स्रोत म्हणून भारताचे स्थान निर्माण करण्याबाबत लक्षणीय प्रगती गाठली आहे.

NSDC इंटरनॅशनलने जर्मन भाषा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑक्सिला अकादमी या टॅक्ट ग्रुप कंपनीशी भागीदारी केली होती आणि त्यांना जर्मनीमध्ये करिअरच्या योग्य संधी शोधण्यासाठी ती सहाय्यभूत ठरली होती. हा उपक्रम भारतीय परिचारिकांसाठी आकर्षक कारकिर्दीच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबत जर्मनीतील कुशल परिचारक व्यावसायिकांची वाढती मागणी पूर्ण करण्याची समस्या सोडवण्यास मदत करतो. भारत आंतरराष्ट्रीय कौशल्य उपक्रमांतर्गत भारतीय तरुणांची कौशल्ये आणि रोजगारक्षमता वाढवण्यासाठी, जागतिक स्तरावर त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

***

S.Pophale/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2028105) Visitor Counter : 79


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil