कृषी मंत्रालय

केंद्रीय मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी कृषी शास्त्रज्ञांना छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचे केले आवाहन


भारताला डाळी आणि तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण बनविण्यावर भर देण्याची गरज : शिवराज सिंह चौहान

Posted On: 22 JUN 2024 5:47PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीतील पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वैज्ञानिक समुदायाला छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करून भारतीय शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे आवाहन केले. भारतात सुमारे 86 टक्के शेतकरी छोटे- अल्पभूधारक आहेत, असे चौहान यांनी सांगितले.  केवळ एक हेक्टर क्षेत्रावर शेती करूनही शेतकरी आपली उपजीविका योग्य प्रकारे करू शकतील, असे शेतीचे मॉडेल बनवले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.

आपण सर्वजण मिळून एक असा मार्गदर्शक आराखडा बनवूया ज्याच्या आधारे केवळ भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे कल्याण होईल असे नाही, तर आपण भारताला जगाचा अन्न कोष बनवू या, जगाला अन्न पुरवू या आणि निर्यात करू या, असे उद्गार चौहान यांनी काढले.

भारताला डाळी आणि तेलबियांमध्ये स्वावलंबी बनवण्याच्या गरजेवर चौहान यांनी भर दिला.  "आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे," असे ते म्हणाले. "आपले कृषी धोरण आणि संशोधन छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील हे आपल्याला सुनिश्चित करावे लागेलअसे ते पुढे म्हणाले.

शेतीची परिस्थिती पूर्णपणे बदलण्याचा माझा आग्रह आहे, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले.  मला शेतकरी आणि विज्ञान यांची सांगड घालायची आहे. शेतकऱ्यांना विज्ञानाशी जोडायचे आहे आणि त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र खूप उपयुक्त आहे, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचा निष्कर्ष परिषदेदरम्यान काढण्यात आला.  सहभागींनी भारतीय कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि संशोधनाला चालना देण्यासाठी पाठिंब्याचे आश्वासन दिले.

परिषदेत उपस्थित शास्त्रज्ञ आणि तज्ञांनीही आपली मते मांडली तसेच भारतीय शेती स्वावलंबी आणि समृद्ध करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प केला.  त्यांनी कृषी संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या गरजेवर भर दिला तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नवीन योजना आणि कार्यक्रम सुरू करण्याबद्दल चर्चा केली.

या बैठकीत उपस्थित सर्व तज्ञ आणि शास्त्रज्ञांनी भारतीय शेतीचे भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करण्याचा संकल्प केला.  शेतकऱ्यांना मदत करणे आणि भारतीय शेतीला नवीन उंचीवर नेणे हे केवळ सरकार आणि वैज्ञानिक समुदायाचेच नाही तर संपूर्ण देशाचे कर्तव्य आहे यावर त्यांनी भर दिला.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027973) Visitor Counter : 39