माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'द गोल्डन थ्रेड' या भारतीय चित्रपटाने पटकावला 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 चा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार
'सावर मिल्क' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार
'झिमा' या पोलंडच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशनपटाचा रौप्य शंख पुरस्कार
'6 - ए आकाश गंगा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटासाठी रौप्य शंख पुरस्कार
Posted On:
21 JUN 2024 8:07PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2024
मुंबईत आज संध्याकाळी झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) यातील उत्कृष्ट चित्रपट, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसाठी बहुप्रतिक्षित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यांनी प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही गेला आठवडाभर त्यांच्या मंत्रमुग्ध निर्मितीने भुरळ घातली आहे त्या 18 व्या मिफ्फ चित्रपट महोत्सवाची आज सांगता विविध श्रेणीतील पुरस्कारांच्या वितरणाने झाली.
निष्ठा जैन दिग्दर्शित ‘द गोल्डन थ्रेड’ या भारतीय चित्रपटाने मिफ्फ 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार पटकावला आहे.
पुरस्कार
सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार: द गोल्डन थ्रेड’
‘द गोल्डन थ्रेड’ हा चित्रपट एक मानवंदना आहे तसेच आर्थिक बदलाच्या ताकदीमुळे प्रभावित झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या अखेरच्या अवशेषांचे चित्रण आहे. नॉन-फिक्शन श्रेणीतील दक्षिण आशियातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरलेला हा चित्रपट माणसाचे यंत्राशी असलेले नाते स्पष्ट करतो मात्र त्याचवेळी भांडवलशाही माणसाला त्याच्या श्रमाइतकेच महत्त्व देते या समीकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. सर्वोत्तम पुरस्काराची घोषणा करताना, ज्युरी म्हणाले, "अद्भुत कल्पना आणि ध्वनी एक सुंदर कथा विणतात जी आपल्याला माहितीपट अजूनही इतका आकर्षक कला प्रकार का आहे याची आठवण करून देते."

पुरस्कार
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपट : सावर मिल्क (एस्टोनिया)
एस्टोनियाचा वेरा पिरोगोवा दिग्दर्शित सावर मिल्क या लघुपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपट पुरस्कार मिळाला.
सावर मिल्क आई आणि मुलामधील गुंतागुंतीचे क्लिष्ट बंध स्पष्टपणे दाखवताना अपेक्षा आणि निराशेची समृद्ध कथा सादर करतो.
प्रशस्तिपत्र, रौप्य शंख आणि 5 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सावर मिल्क या चित्रपटात आई आणि मुलामधील गुंतागुंतीचे नाते भावनाशिलतेने चित्रित केले असून, अशा नात्यांमधला कमालीच्या अपेक्षा आणि त्याबाबत होणारा भ्रमनिरास मांडणारे कथानक तरलतेने गुंफले आहे. कथानकातले बारकावे टिपत आपल्या दिग्दर्शिय कौशल्याने या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना कौटुंबिक संघर्ष आणि प्रगतीच्या जगभराला आपलीच वाटाव्या अशा कथेचा, अव्यक्त भावनांनी साकारलेला तरल प्रवास घडवून आणला आहे. आई आणि मुलामधले जगात आद्य मानले गेलेले बंधदेखील कधीकधी दुधापासून तयार झालेल्या दह्यासारखे आंबट अर्थात परस्परांसोबत खट्टू झाल्यासारखे असू शकतात हीच बाब दिग्दर्शकाने या कथेतून मांडली आहे.

पुरस्कार
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशनपट: झीमा (पोलंड)
पोलंडच्या टोमेक पोपाकुल, कासुमी ओझेकी द्वारा दिग्दर्शित झीमा या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशनपटाचा पुरस्कार पटकावला.
प्रशस्तीपत्र, रौप्य शंख आणि रोख 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
झीमा : हा एक अस्सल जातीवंत, अचंबित करणारा आणि धाडसी प्रयत्न म्हणावा असा कथात्मक ॲनिमेशनपट आहे. मच्छिमारांची वस्ती असलेले एक गाव जिथे माणूस आणि प्राणी दोघेही परस्परांचे अस्तित्व टिकवून राहण्यासाठी प्रयत्नपूर्वक धडपडत जगत असतात, आणि त्यामुळेच कदाचित तिथे हिंसा आणि परस्परांमधल्या प्रेम अशा दोहोंचा अनुभव एकाचवेळी येतो, अशी रोमांचक कथा या ॲनिमेशनपटात साकारली आहे. या ॲनिमेशनपटाला दिग्दर्शकाने एका साच्यात अत्यंत साधेपणाने साकारले आहे. या ॲनिमेशनपटात रंगांच्या ठिपक्यांच्या माध्यमातून साकारलेल्या गडद दृश्यात्मक परिणामांतून, साधलेल्या वेदना आणि खेद भावनांच्या जाणिवा म्हणजे दिग्दर्शकाच्या मंतरलेल्या मांडणीतून साकारलेला अभिव्यक्तिचा समृद्ध अनुभव आहे. एकूणात हा ॲनिमेशनपट डिस्टोपियन तरीही एका अज्ञात स्वप्नवत भूमीतील लोककथेचा अनुभव देणारा आहे.

पुरस्कार
सर्वात नाविन्यपूर्ण/प्रायोगिक चित्रपटासाठी "प्रमोद पाटी पुरस्कार" (केवळ दिग्दर्शकासाठी): द ओल्ड यंग क्रो (जपान)
जपानच्या लियाम लोपिंटो दिग्दर्शित द ओल्ड यंग क्रो या चित्रपटाने सर्वात नाविन्यपूर्ण / प्रायोगिक चित्रपटासाठी "प्रमोद पाटी पुरस्कार" जिंकला आहे. रु. 1 लाख रोख रक्कम आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
द यंग ओल्ड क्रो हा चित्रपट म्हणजे दुहेरीपणांच्या अनेकविध पैलुंबद्दल बोलणारी अत्यंत कल्पक आणि मंतरलेली कथा आहे. भाषा, संस्कृती, पिढ्या, जिवंत आणि मृत व्यक्ती वा घटक इतकेच नाही तर अगदी ॲनिमेशन आणि लाईव्ह ॲक्शन चित्रपट माध्यमांनी परिभाषित केलेल्या दोन जगांचं दर्शन आपल्याला या चित्रपटात होते. या अत्यंत सर्जनशील चित्रमयी देखाव्यात, अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसंगांमध्येही एखाद्याबद्दलची ओढ, कुटुंब, एकटेपणा आणि मृत्यू अशा भावनांच्या हिंदोळ्यांचा पट उत्कृष्टरित्या सामावून घेतलेला दिसतो.

पुरस्कार
स्पेशल ज्युरी मेन्शन (विशेष ज्युरी पुरस्कार): लवली जॅक्सन (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका)
मॅट वॉल्डेक दिग्दर्शित लव्हली जॅक्सनला स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लव्हली जॅक्सन ही भंगलेली - अपूर्ण राहिलेली स्वप्ने, क्षमाशिलता आणि आईच्या प्रेमाची रंजक कथा आहे. दुसऱ्या अर्थाने हा चित्रपट म्हणजे मानवातली उर्जा त्याला अगदी टोकाच्या अन्यायाला सामोरे जाताना, धैर्य राखण्यासाठी तसेच कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कशी कामी येते याचीही कथा आहे. एखादी व्यक्ती अगदी असह्य परिस्थितीशी दोन हात करत कसा उभारी घेऊ शकते, आणि या सगळ्यातून तीला केवळ अत्यंत विपरीत परिस्थितीचा धिरोदात्तपणे सामना करण्याचे बळ मिळत नाही, तर त्यासोबतच ती व्यक्ती इतरांसाठीही आशेचा आणि मुक्तिचा मार्ग दाखवणारी दीपस्तंभ म्हणून पुढे येते याचा प्रवासही या चित्रपटात साकारला आहे. या स्पर्धेच्या परिक्षण मंडळाला या चित्रपटातील उर्जेच्या सकारात्मक चित्रणाने तर प्रेरित केलेच, त्यासोबतच या चित्रपटातील कथात्मक मांडणीच्या विलक्षण कल्पक कौशल्यानेही परिक्षण मंडळाला भुरळ घातली.

भाग- II- राष्ट्रीय स्पर्धा पुरस्कार
सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट: 6-A आकाश गंगा
6-A आकाश गंगा या निर्मल चंदर दंडरियाल दिग्दर्शित माहितीपटाने राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपट (60 मिनिटांपेक्षा जास्त) या प्रकारात रौप्य शंख पुरस्कार जिंकला. चांदीचा शंख आणि 5 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
6-A आकाश गंगा हा एक अज्ञात नायिकेची कथा सांगणारा माहितीपट आहे. या माहितीपटातून दिग्दर्शकाने आपल्यासमोर महान संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच्या एकांतमयी आणि संरक्षित जगताचे चित्रण उभे केले आहे. या माहितीपटाच्या मांडणीमुळे तो प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी होतो. खरे तर अन्नपूर्णा देवी यांची प्रतिभा जगासमोर आली नसती, मात्र अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य, यांच्या ताफ्यातील बासरीवादक आणि त्यांचे बाहेरील जगापासून रक्षण करणारे नित्यानंद हळदीपूर या माहितीपटातून अन्नपूर्णा देवी यांच्या प्रतिभेबद्दल आपल्याला अत्यंत जिव्हाळ्याने माहिती देतात. संगिताची दैवी देणगी लाभलेल्या सुप्रसिद्ध अन्नपूर्णा देवी यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याबद्दलची मोहिनी घालणारी कथा सांगताना ते आपल्याला अगदी सहज त्यांच्या जगातच घेऊन जातात. ते आपल्याला अन्नपूर्णा देवी यांचे एक गुरु, एक स्त्री, एक पत्नी म्हणून व्यक्तिमत्व उलगडताना, त्यांच्या एक कलाकार म्हणून तसेच वैयक्तिक आयुष्यानेही कायमच घेतलेल्या आकस्मिक वळणांमुळे अंचिबित आणि हेलावून टाकणारा हा कथानुभव देतात.

पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट चित्रपट (30 मिनिटांपर्यंत): सॉल्ट
बरखा प्रशांत नाईक दिग्दर्शित सॉल्ट या माहितीपटाने राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा (30 मिनिटांपर्यंत) रौप्य शंख पुरस्कार जिंकला. चांदीचा शंख आणि तीन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सॉल्ट ही एका आई नसलेल्या, वडील आणि मुलगा यांच्या कुटुंबातील ताण तणाव आणि अव्यक्त दु:खाची, आणि त्याचवेळी एकमेकांसोबत आयुष्य काढताना, हे जगणं परस्परांच्या वेदना समजून घ्यायला कसं शिकवतं, त्या प्रवासाची अत्यंत सुंदर आणि मर्मभेदी कथा आहे. दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या मांडणीत आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यातली अस्सलता आणि निपुणतेचे दर्शन घडवत ही कथा आपल्यासमोर मांडली आहे. अवघ्या 11 मिनिटांच्या या चित्रपटात, या कथेची मुख्य पात्रे असलेली जोडी जगण्यात ज्या पद्धतीने पुढे वाटचाल करायला शिकतात, ते पाहून या चित्रपटाच्या दिग्दर्शिका बरखा, अनेक पिढ्यांमधली लैंगिकतेसारख्या नाजुक विषयाची समज आणि आकलन अत्यंत तरलतेने आणि नवा दृष्टीकोन देत उलगडण्यात यशस्वी ठरल्याची साक्ष मिळते.

पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपट: निर्जरा
गौरव पाटी दिग्दर्शित निर्जरा या चित्रपटाला राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपटाचा रौप्य शंख पुरस्कार मिळाला. चांदीचा शंख आणि तीन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निर्जरा या ॲनिमेशनपटात आपल्या आईला गमावल्या नंतर प्रचंड दुःखात असलेले दोन भाऊ, जेव्हा गंगा घाटावर निरोपाच्या विधींसाठी आलेले असताना, पुन्हा कसे एकत्र येतात, आणि आईला गमावल्याच्या एकसारख्या वेदनांना भावनिकरित्या कसे सामोरे जातात याचे सुंदर, हळुवार आणि काव्यात्मक चित्रण पाहायाला मिळते. ही अवघ्या 7 मिनिटांची कथा असली तरी लेखनाच्या पातळीवर उत्कट नाट्यमतयेचा अनुभव देणारी परीपूर्ण म्हणावी अशी कथा आहे. धाकट्या आणि मोठ्या भावामधील नात्यातील भावनिक बारकाव्यांचा शोध या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो. खरे तर भारतीय ॲनिमेशनपटांमध्ये पाहायला मिळणारा हा अपवादात्मक अनुभव आहे.

पुरस्कार:
स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार: अ कोकोनट ट्री
जॉशी बेनेडिक्ट दिग्दर्शित अ कोकोनट ट्री चित्रपटाला स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार मिळाला.
अ कोकनट ट्री या अंचबित करणाऱ्या आणि सुंदर ॲनिमेशनपटात स्थलांतर आणि हवामान बदल या गंभीर आणि तितक्याच निकडीचा प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पिवळ्या आणि काळ्या रंगांनी व्यापलेल्या या चित्रपटाच्या फ्रेम्समधून तातडीने लक्ष द्यायला हव्या या मुद्यावर घेऊन येणारी अस्सल कथा साकारते. कथात्मक मांडणीतले हे अपवादत्मक वाटावे असे यश आणि त्यातून मांडलेला संदेश अधोरेखीत करण्यासाठी परिक्षक मंडळाने या चित्रपटावर विशेष पसंतीची मोहर उमटवली आहे.

पुरस्कार:
प्रायोजित पुरस्कार
दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार: श्रीमोयी सिंग
मिफ्फ मधील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार श्रीमोयी सिंग हिला तिच्या ‘अँड, टुवर्ड्स हॅपी ॲलीज’ या चित्रपटासाठी देण्यात आला.
मानचिन्ह आणि 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून, तिला “FIPRESCI इंटरनॅशनल क्रिटिक ज्युरी अवॉर्ड” देखील मिळाला.
अँन्ड, टुवर्ड्स हॅपी ॲलेज या चित्रपटातून श्रीमोयी आपल्याला तिच्या स्त्रीवादी कवितांच्या आणि इराणच्या समृद्ध चित्रपट संस्कृतीच्या प्रेरेणेतून घडून आलेल्या इराणच्या अनोख्या प्रवासावर घेऊन जाते. तिच्या या प्रवासातून आपल्याला प्रत्येक पातळीवर बंदी आणि मर्यादा असल्याच्या वातावरणात अर्थात सेन्सॉरशीपच्या अवस्थेत, मतभिन्नता असलेल्या अभिव्यक्तिला कशा प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याचे वास्तवदर्शी चित्रण पाहायला मिळते. या चित्रपटातील भावनिक गहिरेपणा आणि त्यातल्या आशयाची सामाजिक स्थितीसोबतच्या वस्तुनिष्ठ संदर्भाने परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.

पुरस्कार
प्रायोजित पुरस्कार
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठी भारतीय माहितीपट निर्माते संघटना, आयडीपीए चा पुरस्कार: "चंचिसोआ" (अपेक्षा)ला घोषित
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठी आयडीपीए पुरस्कार चंचिसोआ (अपेक्षा) या चित्रपटाला मिळाला. "चंचिसोआ" या चित्रपटाचे दिग्दर्शन एलवाचिसा च संगमा आणि दीपंकर दास यांनी केले आहे. एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
चंचीसोआ अर्थात अपेक्षा हा गारो हिल्स प्रदेशातल्या मातृसत्ताक परंपरा जपणाऱ्या समाजातील स्वत्व, प्रेम तसेच निसर्ग आणि इथल्या कुटुंबामधले नाते यांचा वेध घेणारा सुंदर लघुपट आहे. या चित्रपटाचे सुरेख छायाचित्रण, गुंतागुंतीचे कथाकथन आणि कलाकारांचा उत्तम अभिनयाने कुटुंबातील मूळ ताणतणाव अगदी बारकाईने आणि तितक्याच प्रवाहीपणाने आपल्यासमोर मांडले आहेत. म्हणूनच या चित्रपटाची विद्यार्थ्यांची दिग्दर्शनी कामगिरी परिक्षकांना उल्लेखनीय वाटली आहे.

विशेष पुरस्कार
"इंडिया इन अमृत काल" वरील सर्वोत्कृष्ट लघुपट (15 मि. पर्यंत) - लाइफ इन लूम
"इंडिया इन अमृत काल" वरील सर्वोत्कृष्ट लघुपटाचा विशेष पुरस्कार एडमंड रॅन्सन दिग्दर्शित लाइफ इन लूम ला मिळाला. एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लाईफ इन लूम या चित्रपटाचा कथाकथनकार एडमंड हा भारतातील सात वेगवेगळ्या राज्यांतील कुशल विणकर आणि विणकर समाजाच्या अगदी जवळून संपर्कात येतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. या समाजातील कारागिरांनी शतकानुशतके या कलेचे संरक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे, आणि प्रयत्नपूर्वक हे कौशल्य एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सोपवले आहे. या पार्श्वभूमीवर आता जेव्हा भारत अमृत कालाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे, त्यालाच समांतरपणे हा चित्रपट पारंपारिक विणण्याशी जोडलेल्या या समुदायांसमोर सामाजिक - आर्थिक तसेच हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे उभी राहिलेली आव्हाने ठळकपणे आपल्यासमोर मांडतो. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी या समाजामागे पाठबळ उभे करणे गरजेचे असून, त्यामुळेच या समाजाचे आणि त्यांनी आजवर जपलेल्या विणकामाच्या कौशल्याचे भवितव्य सुरक्षित राहू शकेल ही जाणिव हा चित्रपट आपल्याला करून देतो.

पुरस्कार:
तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर (छायालेखन): बबिन दुलाल (नेपाळ)
‘धोरपाटन: नो विंटर हॉलिडेज’ या नेपाळी चित्रपटासाठी बबीन दुलाल यांना सर्वोत्कृष्ट छायालेखक पुरस्कार मिळाला. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि तीन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
धोरपाटन या चित्रपटात नेपाळच्या भौगोलिक क्षेत्रातील हिमालय पर्वतरांगांच्या प्रदेशाचे मनमोहक आणि साधेपणातील सौंदर्याचा अनुभव देणारे छायाचित्रण अनुभवायला मिळते. या चित्रपटात आयुष्यभराचे वैरी असलेल्या अशा सजीवांची हृदयस्पर्षी कथा मांडली आहे, ज्यांना कडाक्याच्या थंडीच्या परिस्थिती, जगाच्या संपर्कातून तुटलेल्या एका गावात परस्परांचे अस्तित्व टिकवून राहाणे भाग पडते. कमालीचे परिणामकारक छायाचित्रण ही या चित्रपटाची सर्वात जमेची आणि कल्पक बाजू. या चित्रपटातील छायाचित्रणाच्या माध्यमातून अगदी बारिक सारिक बारकावे टिपणाऱ्या, प्रत्येक घटकाच्या भावना व्यक्त करणाऱ्या बोलक्या आणि रचनात्मक फ्रेममधून अत्यंत असह्य हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि सातत्याने बदलणाऱ्या भौगोलिक स्थितीचे तपशीलवर आणि परिणामकारक चित्रण दिसते. या मर्मभेदी चित्रणातूनच या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या पात्रांच्या वयातील बदल, एकटेपणा आणि कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या स्त्रीत्वाचा मुख्य पैलुही अगदी ठाशिवपणे आपल्या समोर मांडला जातो.

पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट एडिटर (संपादक): विघ्नेश कुमुलाई (भारत)
विघ्नेश कुमुलाई यांना ‘करपरा’ या भारतीय चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट संपादक’ पुरस्कार मिळाला.
'करपरा'मध्ये काळ आणि अवकाशाच्या वाटचालीवर भर देणारी एक चिंतनशील चित्रपट संपादनशैली दिसून येते. संपादनाच्या या कौशल्यातून चित्रपटात ग्रामीण जगण्यातील शांत ध्यानमग्न लयीतील , चित्रपटातल्या प्रमुख पात्रांची दृश्य परस्परांसोबत अत्यंत काव्यात्मकतेने गुंफलेली दिसतात. एकूणात या चित्रपटाचे संकलन हे स्तब्धतेच्या क्षणांचा अनुभव देतांनाच, आपल्याला अनेकदा सांसारिक गोष्टींच्या गहिरेपणातही डोकावायला भाग पाडतो. या चित्रपटासाठी अगदी ठरवून नेमकेपणाने वापरलेल्या या संपादनशैलीमुळे प्रेक्षक या चित्रपटातील पात्रे आणि भोवतालाशी नकळतपणे भावनिकरित्या गुंतले जातात.

पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनर (ध्वनी संयोजक): निरज गेरा (भारत)
‘द गोल्डन थ्रेड’ या भारतीय चित्रपटासाठी निरज गेरा यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजक ‘साउंड डिझायनर’ पुरस्कार मिळाला. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि तीन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दि गोल्डन थ्रेड या चित्रपटाचे कथानक रहस्यमयी आणि यंत्रांचा आवाज आणि खडखडाटाने व्यापून टाकलेल्या अत्यंत आव्हानात्मक वातावरणात घडते. या आव्हानावर मात करण्यासाठी चित्रपटातल्या ध्वनी संयोजनाला महत्व देत, त्यासाठी समर्पित चमूला कामाला लावत, परिणामकारक ध्वनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या कथानकाकडे वळवता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे दि गोल्डन थ्रेड हा चित्रपट आहे. या चित्रपटातले ध्वनी संयोजन इतके प्रभावी आहे की, त्यामुळे अजस्त्र यंत्रे आणि मानवी श्रम शक्ती यांच्यामधील वेगाने बदलत असलेल्या परस्पर संबंधाचे अंतरंग प्रभावीपणे आपल्या समोर आणते. या ध्वनी संयोजनामुळेच चित्रपटात अचंबित करणारी उत्कंठावर्धक लयबद्धता निर्माण होते, ती कधी कामगारांच्या स्वरांमधील चढउतारांशी सुसंगतता साधते, तर कधी आपल्याला कर्कश गोंगाटाचा अंदाज वाटत असतानाच, अचानकपणे शांततेचा अनुभव देते. एका अर्थाने या प्रभावी ध्वनी संयोजनामुळेच एखाद्या अद्भूत मैफलीप्रमाणे या चित्रपटाच्या कथानकाचा प्रवास होत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना येत राहतो.

तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर : सुरज ठाकूर
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार सुरज ठाकूर यांना ‘एंटँगल्ड’ चित्रपटासाठी मिळाला आहे. स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र आणि तीन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
एनटँगल्ड या कथात्मक लघुपटात कॅमेरा अण्णा या व्यक्तीच्या निधनाचे दृश्य आपल्यासमोर मांडतो. या लघुपटातील प्रत्येक दृश्य अत्यंत कल्पकतेने चित्रित केले आहे. कॅमेऱ्याची हालचाल नेमके कधी असायला हवी आणि त्याने कधी स्थिर दृश्यांची परिणामकारकता साधायला हवी, कोणत्या गोष्टी टिपायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी दाखवण्याचा मोह सोडायला हवा याचा नेमके उदाहरण या लघुपटाच्या छायाचित्रणातून आपल्याला अनुभवायला मिळते. या लघुपटातली दृश्ये आपल्यालाही अण्णाच्या अखेरच्या प्रवासाशी आणि त्याच्या जाण्याने हतबल झालेल्या त्याच्या कुटुंबियांशी नकळतपणे जोडून घेतात. या चित्रपटातल्या दृश्यांचे हे काव्यात्मक छायाचित्रण आणि भावनांचा गहिरेपणा खऱ्या अर्थाने अपवादात्मकतेची साक्ष देणारा अनुभव आहे.

तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजक : अभिजित सरकार
अभिजित सरकार यांना ‘धारा का टेम (टाईम फॉर मिल्किंग)’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजकाचा पुरस्कार मिळाला आहे. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि तीन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
धारा का टेम या कथात्मक लघुपटातून ऐकू येणाऱ्या ध्वनींमुळे आपल्याला दूध काढण्याची झाली आहे की नाही हे ओळखू येते. या लघुपटामध्ये योजलेल्या ध्वनींमधून या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रामीण भागातल्या या कुटुंबाची दिनचर्चा आपल्यासमोर उलगडत जाते, आपल्याला थेट पंजाबसारख्या राज्यात घेऊन जाते, तिथल्या दैनंदिन जगण्याचा भाग होण्याची संधी देते, ते ही केवळ कथेसाठी योजलेले ध्वनी ! या चित्रपटातली अपवादात्मक वाटावी अशी श्रवणपार्श्वभूमी चित्रपटातल्या दृश्यांसाठी अगदी पूरक ठरते, आणि यामुळेच या चित्रपटाचा एकंदर प्रभाव आणि गहिरेपणाही अधिक वाढण्यात मदत होते.

सर्वोत्कृष्ट संकलक : इरीन धर मल्लिक
इरीन धर मल्लिक यांना ‘फ्रॉम द शॅडोज’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संकलकाचा पुरस्कार मिळाला आहे.
स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे.
तांत्रिक पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट एडिटर (संकलक): विघ्नेश कुमुलाई (भारत)
विघ्नेश कुमुलाई यांना ‘करपरा’ या भारतीय चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट संकलक’ हा पुरस्कार मिळाला.
* * *
PIB Team MIFF | JPS/Sushma/Rajshree/Bhakti/D.Rane | 59
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2027756)
Visitor Counter : 142