माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मिफ 2024 मध्ये जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन


बर्लिनेल शॉर्ट्स आणि ऑस्कर पॅकेज अंतर्गत जागतिक दर्जाच्या आशयघन कलाकृतींचा आस्वाद, विशेष प्रदर्शनांमुळे प्रेक्षक आनंदले

Posted On: 20 JUN 2024 10:00PM by PIB Mumbai

मुंबई, 20 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप अगदी उद्यावर येऊन ठेपला असताना, देशासह जगभरातले चित्रपट दर्दी या अतिशय अविस्मरणीय अशा अनुभवांचा ठेवा घेऊ शकले. यावर्षी या महोत्सवात सादर झालेल्या जगभरातील माहितीपट, लघु कथा आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या अपवादात्मक श्रेणीने प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला. यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखे म्हणजे  बर्लिनेल शॉर्ट्स आणि ऑस्कर फिल्म्स पॅकेज, ज्यातील see समीक्षकांनी वाखाणलेल्या निवडक चोखंदळ कलाकृतींनी मंत्रमुग्ध केले.

बर्लिनेल शॉर्ट्स अर्थात बर्लिनेल येथील लघुपटांसाठीची अधिकृत स्पर्धा तिच्या वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण अशा सिनेमॅटिक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी, यामध्ये लघुपट निर्मितीचा आवाका दाखवण्यासाठी सुमारे 25 चित्रपट निवडले जातात. मिफ 2024 साठी, गेल्या पाच वर्षांतील बारा उल्लेखनीय चित्रपट तीन विभागांमध्ये संकलित करण्यात आले होते, ज्यामध्ये सिल्व्हर बेअर आणि गोल्डन बेअर विजेत्या चित्रपटांचा समावेश होता. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बर्लिनेल शॉर्ट्स स्पर्धेच्या प्रमुख आणि मिफ  मधील राष्ट्रीय स्पर्धा ज्युरीच्या सदस्य ॲना हेंकेल-डोनर्समार्क यांनी या नितांत सुंदर पॅकेजची रचना केली होती. 

या पॅकेजमधील चित्रपट - 'हॉलआउट', 'जॉन-जा-उई जिब', 'मारुंगका तजलातजुनू', 'कावासो', 'लेस चेनिलेस', 'सोजर्न टू शांग्री-ला', 'अ काइंड ऑफ अ टेस्टामेंट', ' हाऊ टू डिसॅपियर', 'मन्हा दे डोमिन्गो', 'आवर्स' आणि 'टेरा मेटर' यांचे  समीक्षकांनी कौतुक केले.  या पॅकेजमधील भारतीय चित्रपट, एकता मित्तल यांच्या ‘गुमनाम दिन’ (मिसिंग डेज) चे देखील खूप कौतुक झाले. या चित्रपटात स्थलांतरित कामगारांच्या जीवनाचा वेध घेतला आहे.

बर्लिनेल पॅकेज फिल्म्स मध्ये दाखवलेल्या लघुपटांनी ओळख चोरी, गोपनीयतेवर अतिक्रमण , पर्यावरणाशी निगडित आव्हाने, युद्धविरोधी भावना, आंतरिक शांतता, सलोखा, व्हॉयरिझम, उपचार, टेक जंक आणि सक्तीचे स्थलांतर  अशा विविध संकल्पनांचा अविष्कार दाखवला.

ऑस्कर पॅकेज मध्ये देखील जागतिक दर्जाच्या आशयघन कलाकृतींचा आस्वाद प्रतिनिधींना देणाऱ्या बारा फिचर फिल्म्स दाखवण्यात आल्या. या पॅकेजमध्ये 'लेटर टू अ पिग', 'द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर', 'पॅचिडर्म', 'अवर युनिफॉर्म', 'इनव्हिन्सिबल', 'नाइट ऑफ फॉर्च्युन', 'रेड, व्हाईट अँड ब्लू', 'नाइन्टी-फाइव्ह सेन्स', 'आय एम हिप', 'वाइल्ड समन', 'वॉर इज ओव्हर आणि 'द आफ्टर या जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश होता, ज्यांनी उत्कृष्ट कलाकृतीच्या शोधात असलेल्या प्रतिनिधींना निराळी अनुभूती दिली.

ऑस्कर चित्रपटांनी स्वातंत्र्याचा शोध, दु:ख आणि तोटा यांचा भार, एकल पालकत्वाचा संघर्ष, सामूहिक आघात, ओळखीचे प्रश्न, मानवी स्वभावाचा सामूहिक कट्टरपणा आणि शरीराच्या संवेदनांचा अनुभव यासह विविध संकल्पनांवर कलाकृती सादर केल्या. 

मिफ 2024 मध्ये ॲमेझॉन वर प्रदर्शित झालेली मालिका 'पोचर', डिस्ने आणि पिक्सरचा 'इनसाइड आऊट 2', जपानी माहितीपट 'आय गो गा गा वेलकम होम मॉम', 'बोगस फोन ऑपरेटर' सारख्या भारतीय माहितीपटांसह विविध प्रकारच्या चित्रपटांचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले गेले. 'प्लास्टिक फॅन्टास्टिक', 'वुमन ऑफ माय बिलियन', 'इट इज धिस' आणि 'माय मर्क्युरी' या पर्यावरण-संवर्धन-संकल्पनेवर आधारित  माहितीपट यांचा समावेश होता. या महोत्सवात राजकुमार राव अभिनीत 'श्रीकांत' हा हिंदी चित्रपट देखील दाखवण्यात आला.

नॅशनल जिओग्राफिकच्या ‘बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी’ या माहितीपटाच्या भारतीय प्रीमियरने या महोत्सवाची सुरुवात झाली,  या माहितीपटाच्या मनमोहक कथनाने प्रेक्षकांना मोहित केले. डॅनिएला वोल्कर दिग्दर्शित मिडफेस्ट लघुपट 'द कमांडंट्स शॅडो च्या स्क्रीनिंगने होलोकॉस्टवर एक नवीन दृष्टीकोन प्रदान केला आणि समीक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली.

मिफ 2024 ची सांगता उद्या एका भव्य समारोप समारंभाने होणार असून यावेळी प्रतिष्ठित गोल्डन काउंच आणि सिल्व्हर काउंच पुरस्कारांची घोषणा केली जाईल, आणि चित्रपट निर्मितीची कला सर्व प्रकारांनी खऱ्या अर्थाने साजऱ्या करणाऱ्या या महोत्सवाची सांगता होईल.

 

* * *

PIB Team MIFF | M.Chopade/B.Sontakke/D.Rane | 54

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2027247) Visitor Counter : 60