माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या विविध भागांमधील दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधील कथात्मक मांडणीतली अस्सलता आणि प्रगल्भतेचे दर्शन हा असामान्य अनुभव - 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गतच्या राष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या परिक्षण मंडळाने व्यक्त केली भावना


या विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट अनुभवी चित्रपट दिग्दर्शकांच्या तोडीचे : राष्ट्रीय परिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अपूर्वा बक्षी

Posted On: 19 JUN 2024 10:03PM by PIB Mumbai

मुंबई, 19 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गतच्या (MIFF) राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या परिक्षकांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत वार्ताहरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 च्या राष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड झालेल्या चित्रपटांबाबतची त्यांची मते मांडली. यावेळी त्यांनी या चित्रपटांमधला गहिरा आशय आणि या चित्रपटांच्या कथानक आणि मांडणीतली विविधता अधोरेखीत करत, या चित्रपटांची प्रशंसाही केली.

यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 च्या राष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या परिक्षक मंडळाच्या सदस्यांनी सामूहिक निवेदनही जारी केले. या निवेदनातून त्यांनी या चित्रपटांच्या परिक्षणाचा ठळक अनुभव मांडला आहे. निवड झालेल्या या सर्व चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी, आपापल्या चित्रपटांमधून पितृसत्ता परंपरेचे अंतरंग पूर्णतः उलगडत त्याची पूनर्रचना करणारी मांडणी केली आहे, आणि पुरुषांचे नातेसंबंध अत्यंत नाजूक दृष्टीभावनेतून चित्रित केले असून, हा अपवादात्मक अनुभव असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. या परिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय  चित्रपट निर्मात्या  अपूर्वा बक्षी यांच्यासह अॅडले सीलमन (जर्मन चित्रपट निर्माती), डॉ. बॉबी सरमा बारुआ (भारतीय चित्रपट निर्मात्या), मुंजल श्रॉफ (भारतीय अॅनिमेटर) आणि अॅना हेन्केल - डोनर्समार्क (जर्मन चित्रपट निर्मात्या) हे परिक्षण मंडळाचे सदस्यही या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

या चित्रपटांच्या माध्यमातून भारताच्या विविध भागांतून अत्यंत ठाम, आशयघन आणि मर्मभेदी कथा पाहण्याच्या अनुभव मिळाला, आणि ही आपल्याला सन्मानजनक बाब असल्याचे सर्व परिक्षकांनी ठळकपणे अधोरेखित केले आहे. गेल्या चार दिवसांत आपण माहितीपट, लघुपट, आणि अॅनिमेशन विभागाअंतर्गतचे 75 चित्रपट आम्ही पाहिले, या सर्व चित्रपटांमधून आम्हाला अचंबित करणाऱ्या सशक्त आशयप्रधान लेखनातून साकारलेली भावनांची अनेकविध रुपे अनुभवायला मिळाली, आणि या सगळ्यातूनच आम्हा सगळ्यांच्या भोवताली दर्जेदार सिनेमाजगत साकारलं गेलं असे मतही या सदस्यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केले आहे. या चित्रपटांमधून भारतात सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरावर पालन केल्या जात असलेल्या जुन्या समृद्ध तसेच वैविध्यपूर्ण परंपरा आणि चालीरीतींच्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीवर नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे वैशिष्टपूर्ण निरिक्षणही या परिक्षक मंडळाने आपल्या निवेदनात मांडले आहे.

या परिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अपूर्वा बक्षी यांनी गेल्या चार दिवसांमधील परिक्षणाचा उत्साहवर्धक अनुभव वार्ताहरांसमोर मांडला. खरे तर आपल्या कलात्मक मांडणीतून रसिकांपर्यंत कथा पोहचवणे हीच आम्हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे, त्याला जागतच या संपूर्ण परिक्षण काळात आम्ही सगळ्यांनी तासन् तास चर्चा आणि मंथन केले. चित्रपट सादरीकरणातला माहितीपट हा प्रकार भारतातील उदयोन्मुख कलाप्रकार आहे, असे म्हणत, या कलाप्रकाराला केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल त्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्यवस्थापनाची प्रशंसाही केली. अॅनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर बनवलेल्या चित्रपटांनी आपल्याला आश्चर्याचा धक्काच दिल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. ईशान्य भारतातील दिग्दर्शकांनी बनवलेले चित्रपट अप्रतिम आणि विशेष प्रभाव पाडणारे होते असा अनुभवही त्यांनी यावेळी मांडला.

खोलवर परिणाम करणाऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्ये आणि विषयांना स्पर्श  करणाऱ्या अनेक चित्रपट कलाकृतींनी परिक्षण मंडळाचे काम आव्हानात्मक केल्याचा अनुभवही अपूर्वा बक्षी यांनी ठळकपणे मांडला. आपली कथा मांडण्याच्या कौशल्यात एवढी प्रगल्भता दिसणे ही खूपच असामान्य बाब आहे. हे सर्व चित्रपट म्हणजे काश्मीर, पंजाब, ईशान्य भारत तसेच दक्षिण भारत अशा देशाच्या कानाकोपऱ्यातील अस्सल कथानकांचा अखंड प्रवाहच होता. त्यामुळेच हे चित्रपट पाहणं हा विलक्षण अनुभव वाटत असून, या चित्रपटांच्या खेळासाठी उपस्थित राहिलेल्या अनेक चित्रपट दिग्दर्शकांनाही या चित्रपटांनी आनंदमयी अनुभव दिल्याची बाब अपूर्वा बक्षी यांनी आवर्जून नमूद केली. या स्पर्धा विभागातील विद्यार्थ्यांनी बनवलेले चित्रपटही अनुभवी दिग्दर्शकांशी बरोबरीने स्पर्धा करणारे होते, अशा अनेक चित्रपटांमधल्या कथात्मक मांडणीच्या अद्भूत कौशल्याने परिक्षण मंडळाच्या सगळ्या सदस्यांना प्रचंड अचंबित केल्याचा अनुभवही त्यांनी यावेळी मांडला. 

जर्मन चित्रपट निर्माती अॅडले सीलमन यांनी स्पर्था विभागातील चित्रपट, कथात्मक मांडणीची पार्श्वभूमी आणि चित्रपटांच्या संकल्पना यातील वैविध्याने दिलेला रोमहर्षक अनुभव मांडला. या चित्रपटांनी दिलेल्या दृश्यानुभवाने आपण  भारावून गेलो आहोत, आणि त्यामुळेच या परिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून आमंत्रित केल्याबद्दल आपण मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्यवस्थापनाचे ऋणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चित्रपटाची भाषा ही सर्वत्र एकसमान असते, आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना या सिमोल्लंघनन करणाऱ्या होत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले. या सर्व चित्रपटांमध्ये मानवी अस्तित्वाची गुंतागुंत ज्या पद्धतीने चित्रित केली गेली आहे, त्याने परिक्षण मंडळाच्या सदस्यांसह प्रेक्षकांनाही अचंबित केल्याची बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.

ईशान्य भारतातील चित्रपट दिग्दर्शकांनी उत्तम चित्रपट साकारल्याबद्दल तसेच वैचारिक स्वातंत्र्याची भावना जपल्याबद्दल भारतातील चित्रपट दिग्दर्शक बॉबी सरमा बरुआ यांनी या सर्व चित्रपट दिग्दर्शकांचे कौतुक केले. आपण ज्या भागातून येतो तिथले म्हणजे ईशान्य भारतातले चित्रपट उद्योगक्षेत्र जगत आकाराने फार लहान आहे, मात्र तिथे निर्मित होत असलेल्या चित्रपटांचा दर्जा मात्र स्वतःची छाप सोडणारा आहे असे त्या म्हणाल्या.

अॅनिमेटर मुंजल श्रॉफ यांनी आपल्या या चित्रपटांच्या, विशेषतः अॅनिमेशनपटांमधील कथात्मक मांडणीतील गहिरेपणाने प्रचंड भूरळ पाडल्याचा अनुभव सांगितला. युवा चित्रपट दिग्दर्शकांचा ध्वनी आणि चित्रपटांच्या छायाचित्रणाबद्दलचा दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भपणाचा अनुभव देणारा होता, तर या चित्रपटांमधून तरुण चित्रपट दिग्दर्शकांचे या माध्यमावरचे  नियंत्रणही अतिशय आश्चर्यकारक वाटावे असेच आहे असे त्यांनी सांगितले. हे चित्रपट म्हणजे या दिग्दर्शकांच्या विशेषतः युवा पिढीतील दिग्दर्शकांच्या प्रतिभेच्या गहिरेपणाची साक्ष देणारे चित्रपट आहेत असे ते म्हणाले. या स्पर्धा विभागातील चित्रपटांमधून व्यापक आणि वैविध्यपूर्ण विषयांना स्पर्ष केल्याबद्दल त्यांनी सर्व दिग्दर्शकांचे कौतुक केले. या सर्व चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करण्यासाठी परिक्षण मंडळाला प्रदीर्घ चर्चा करावी लागली असे सांगून, हा महोत्सव म्हणजे सर्वोत्तम महोत्सवांचा मापदंड ठरला असल्याचे ते म्हणाले. तीन भारतीय आणि दोन परदेशी सदस्यांचा समावेश असलेल्या परिक्षण मंडळाच्या  वैविध्यपूर्ण रचनेमुळे, परिक्षणाचा हा अनुभव अतिशय समृद्ध ठरला आणि त्यामुळेच स्वतःपलिकडील अमूल्य दृष्टीकोनही समजून घेता आल्याची बाबही मुंजल श्रॉफ यांनी नमूद केली.

जर्मनीच्या चित्रपट दिग्दर्शिका अॅना हेन्केल-डोनर्समार्क यांनी आपण परिक्षण मंडळाच्या सदस्य असल्याबद्दल आनंद वाटत असल्याची भावना व्यक्त केली. यामुळेच आपल्याला भारतीय चित्रपट दिग्दर्शकांच्या माध्यमातून भारताला समजून घेण्याची संधी मिळाली असे त्या म्हणाल्या.  आपण या परिक्षण मंडळाचा एक भाग असल्याने भारतातली चित्रपट विषयक परिसंस्था समजून घेण्यात, इथे कोणत्या प्रकारच्या चित्रपटांना आर्थिक सहकार्य उपलब्ध होते, कोणत्या प्रकारच्या चित्रपटांची निवड होते, इथल्या दिग्दर्शकांना कशाप्रकारच्या कथा प्रेक्षकांसमोर मांडायच्या आहेत हे समजून घ्यायला मोठी मदत झाल्याचे त्या म्हणाल्या. परिक्षण मंडळातील आम्हा सगळ्या सदस्यांचा दृष्टीकोन  भिन्न होता, त्यामुळेच पुरस्कारांची प्रत्येकाच्या निवडीची यादी खूप मोठी असल्याने पुरस्कारांसाठी नेमकी निवड आव्हानात्मक होती, या पार्श्वभूमीवर आम्हा सगळ्यांमध्ये झालेली साधक - बाधक चर्चा समाधान देणारी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

PIB Team MIFF | N.Chitale/T.Pawar/D.Rane | 47

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026788) Visitor Counter : 68


Read this release in: Hindi , English , Urdu , Assamese