माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18 व्या मिफ्फ मध्ये प्रख्यात स्विस ॲनिमेटर जॉर्ज श्विजगेबल यांच्या मास्टर क्लासचे आयोजन
Posted On:
18 JUN 2024 8:52PM by PIB Mumbai
मुंबई, 18 जून 2024
18 व्या मिफ्फ म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज स्वीस ॲनिमेशनपट निर्माता जॉर्ज श्विजगेबल यांनी, ‘जॉर्ज श्विजगेबलचा ॲनिमेशनकडे बघण्याचा दृष्टीकोन’, या विषयावरील मास्टर क्लासला संबोधित केले. महोत्सवातील चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्रात, श्विझगेबल यांची शानदार कारकीर्द आणि ॲनिमेशनमधील त्यांची अनोखी तंत्रे यांचे दर्शन घडले.
श्विजगेबल यांचा 2004 मधील "द मॅन विथ नो शॅडो" (L'Homme sans ombre) हा पेंट-ऑन-ग्लास ॲनिमेटेड चित्रपट, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसेला पात्र ठरला होता. 50 वर्षांहून अधिक काळ ॲनिमेशन उद्योगातील दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहे. या संवादात्मक सत्रात, चित्रपट निर्मितीची आपली अतूट ओढ त्यांनी विषद केली. ते म्हणाले, “मला चित्र रेखाटून चित्रपट बनवायला आवडतात ... दुसरं काही नाही, फक्त चित्रपट बनवणं आवडतं.”
ख्यातनाम ॲनिमेशन पटांच्या निर्मात्या ध्वनी देसाई यांनी प्रेक्षकांना श्विजगेबल यांचा परिचय करून देताना, त्यांच्या कामावर विविध कला चळवळींचा खोलवर असलेला प्रभाव, आणि त्यामधून उमटणारा वास्तववाद स्पष्ट केला.
उपस्थितांना संबोधित करताना, श्विजगेबल यांनी आपल्या कामातील सृजनशील प्रक्रियेमागचा दृष्टीकोन विषद केला. आधुनिक ॲनिमेशन कलाकारांनी चित्रपट बनवताना वेगवेगळ्या साधनांचा वापर करायला सुरुवात केली आहे, मात्र आपण डिजिटल कॅमेरासह, चित्रपटाच्या फ्रेमसाठी ॲक्रेलिक पेंटिंगचा वापर करत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे तंत्र शिकवणे आता उपयुक्त नसल्याचे सांगून, ॲनिमेशन तंत्राची अनेक दशकांमध्ये उत्क्रांती झाल्याचे त्यांनी मान्य केले. आपण अधूनमधून ड्राय पेस्टल्सचाही वापरही केल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्मितीमागचा आपला दृष्टीकोन स्पष्ट करताना श्विजगेबल म्हणाले की, ॲनिमेशनपट केवळ दृश्यांमधून बरेच काही सांगू शकतो, त्यामुळे आपल्या बहुतेक चित्रपटांमध्ये संवादांऐवजी संगीत आहे. 25 फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लूप आणि सायकल वापरण्याची आपली पद्धत, आणि वेगवान कथनासाठी प्रत्येक 16 फ्रेम्समध्ये पार्श्वभूमी बदलण्याच्या आपल्या तंत्राचे त्यांनी विश्लेषण केले. आपल्या चित्रपटांमधील संगीताचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “संगीत आणि प्रतिमा यांच्यातला संबंध अत्यंत दृढ आहे”.
प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर देताना, श्विजगेबल यांनी 1970 च्या दशकात आपली कारकीर्द सुरू झाल्यापासून ॲनिमेशन उद्योगात झालेल्या बदलांवर विचार मांडले. भूतकाळात ॲनिमेशन दृश्यांसाठी अधिक संधी असल्याचं निरीक्षण नोंदवत, आता अनेक चित्रपट निर्माते ॲनिमेशन फिचर फिल्म बनवत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या मास्टर क्लासने प्रेक्षकांना ॲनिमेशन विश्वातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तीकडून शिकण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली, आणि ॲनिमेशन कला आणि त्याच्या कलात्मक निर्मितीची प्रक्रिया जाणून घेता आली.
* * *
PIB Team MIFF | N.Chitale/R.Agashe/D.Rane | 34
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2026337)
Visitor Counter : 74