माहिती आणि प्रसारण मंत्रालय

'75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमातल्या उदयोन्मुखांची प्रतिभा 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार


54 व्या इफ्फीमध्ये क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो अंतर्गत सर्वोत्कृष्ट ठरलेला 'ओड' लघुपट मिफ मध्ये प्रदर्शित केला जाणार

Posted On: 18 JUN 2024 4:10PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा इफ्फी म्हणजे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष आकर्षण ठरण्यापासून मिफ म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रंगत वाढवण्यापर्यंत देशातल्या उदयोन्मुख प्रतिभावंतांनी सी एम ओ टी म्हणजेच 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या उपक्रमाच्या माध्यमातून कलात्मक उत्कृष्टतेचा प्रेरणादायी प्रवास केला आहे.

18 व्या मिफ मध्ये महत्वाकांक्षी तरुण चित्रपट निर्मात्यांचे काही चित्तवेधक चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत त्यामध्ये गोवा इथं झालेल्या 54 व्या इफ्फी मध्ये सर्वोत्कृष्ट सी एम ओ टी चित्रपट विजेता ‘ओड’ चा समावेश आहे.

 

मिफ मध्ये दाखवल्या जाणाऱ्या 75-सी एम ओ टी मधील चित्रपटांची यादी

अलाम

अलाम ही कथा एका पश्चात्तापदग्ध व्यक्तीची आहे, जो निसर्गाची अजिबात पर्वा करत नसे. काही काळातच वृक्ष, हवा, पाणी आणि मेघगर्जना यांसारख्या सर्व घटकांचा सामना त्याला करावा लागतो आणि मग त्याला जाणीव होते की आपल्या वर्तनामुळे केवळ निसर्गच नव्हे तर आपल्या भोवतालच्या माणसांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.

 

ला मेर

विनाश झालेल्या रुक्ष अशा जगात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ जकार्ता आशा आणि निराशेच्या हिंदोळ्यावर दिवस कंठत आहे. शुद्ध पाण्याचा शेवटचा स्रोत हिरावून घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका निर्दयी गटाचा सामना करताना, झालेल्या एका  त्रासदायक अशा चकमकीतून  एक अनपेक्षित भागीदारी समोर येते. एका उजाड परिदृश्यात पुन्हा एकदा विश्वास आणि नाविन्य रुजवण्याचा एक मर्मभेदक प्रवास यातून सुरु होतो.   चार्ल्स ट्रेनेटच्या गाण्यावर आधारित.

 

ओड 

दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे एका स्थानिक मच्छिमारावर आलेली परिस्थिती या चित्रपटाच्या कथानकातून उलगडत जाते. त्याला आपली बोट नांगरण्यासाठी जागा न मिळाल्याने तो बोट शहरात आणतो, अशी याची कथा आहे.

 

बिरवा

हा चित्रपट मानव आणि निर्सग यांच्यातल्या बिघडत चाललेल्या संबंधांवर भाष्य करणारा असून त्यामध्ये त्या दोघांमधले विषारी नाते दाखवण्यात आले आहे जे जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. पण यावर काही मार्ग आहे का?

 

अंकुरन

मानवाने निसर्गाच्या अविष्कारांमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या विषारी वायूंचा परिणाम या चित्रपटात दाखवला आहे. हा चित्रपट एका लहान मुलीबद्दल तिच्या मनातल्या उद्याच्या उज्ज्वल  आशेबद्दल भाष्य करणारा आहे.

 

'75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' या उपक्रमाविषयी

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा"75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो" हा एक अभिनव उपक्रम असून संपूर्ण भारतातील चित्रपट प्रतिभावंतांच्या कलागुणांना ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उपक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागींना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 52 व्या इफ्फी 2021 च्या आवृत्तीत हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आणि तेव्हापासून, झालेल्या इफ्फी च्या तीन आवृत्यांसह आतापर्यंत 225 माजी विद्यार्थ्यांचा टॅलेंट पूल किंवा प्रतिभावंतांचा संच तयार झाला आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून दरवर्षी, अनुभवी चित्रपट निर्मात्यांसोबत नव्यानं या क्षेत्रात येऊ घातलेल्या /उदयोन्मुख निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, अभिनय, संपादन, पार्श्वगायन, संगीत रचना, वेशभूषा आणि मेकअप, आर्ट डिझाइन आणि ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) आणि आभासी वास्तविकता (VR) या  श्रेण्यांमध्ये चित्रपटनिर्मिती आणि संबंधित कलांमध्ये अतिशय मनापासून स्वारस्य असलेल्या व्यक्तींकडून हजारो अर्ज प्राप्त होतात.

देशभरातले युवा प्रतिभावंत एका  चित्रपट विषयक आव्हानात म्हणजे  ‘फिल्म चॅलेंज’ मध्ये भाग घेतात ज्यासाठी त्यांना इफ्फी मध्ये  केवळ 48 तासात लघुपट बनवावा लागतो. मागील तीन इफ्फी मध्ये तरुण सर्जनशील प्रतिभावंतांनी  नावीन्यपूर्ण आणि कथाकथन कौशल्याच्या वेगवान उत्सवाचा अनुभव घेतला.  

इफ्फी-54 मध्ये सहभागींना भारतातील माध्यम  आणि मनोरंजन  क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधता यावा यासाठी सीएमओटी  टॅलेंट कॅम्पचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात प्रोडक्शन हाऊस,एव्हीजीसी  कंपन्या आणि स्टुडिओ यांचा समावेश होता. या भर्ती प्रक्रियेदरम्यान सहभागी झालेल्या प्रतिभावंतांनी आपल्या नवकल्पना आणि पूर्वी केलेल्या कामाविषयीची माहिती चित्रपट उद्योगातील आघाडीच्या व्यावसायिकांसमोर मांडण्याची संधी मिळाली. याशिवाय तरुण कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने तयार केलेल्या विशेष मास्टरक्लासेस, इन-कॉन्व्हर्सेशन सेशन्स म्हणजे संभाषण सत्र आणि ओपन फोरम डिस्कशनमध्ये अर्थात खुला मंच चर्चेत उपस्थित राहण्याची आणि उद्योग तज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळते.

 

* * *

PIB Team MIFF | N.Chitale/B.Sontakke/D.Rane | 30

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026182) Visitor Counter : 52