माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तम पटकथा आणि दमदार अभिनय चित्रपटांना अजरामर बनवतात: 18 व्या मिफ (MIFF) मध्ये 'पोचर' चे दिग्दर्शक रिची मेहता

Posted On: 16 JUN 2024 10:02PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज  एमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक, रिची मेहता, ज्यांना ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘पोचर’ सारख्या गाजले ल्या मालिकांसाठी ओळखले जाते, यांच्याबरोबरचे  इन-कन्वर्सेशन सत्र  मोठे उद्बोधक ठरले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित रेडिओ कलाकार, रोहिणी रामनाथन यांनी संचालन केलेल्या या सत्रात, प्रेक्षक क्राइम थ्रिलर चित्रपट निर्मितीची गुंतागुंतीची प्रक्रिया जाणून घेताना मंत्रमुग्ध झाले.

रिची मेहता यांनी चांगली पटकथा आणि सशक्त अभिनयाच्या कालातीत महत्त्वावर भर देत, चित्रपट निर्मितीच्या सृजनशील प्रक्रियेबद्दल आपले  विचार मांडले. "एक गोष्ट जी चित्रपटांना अजरामर बनवते, ती म्हणजे चांगली पटकथा आणि अभिनय. कास्टिंग (पात्र नियोजन) आणि संशोधन खूप महत्वाचं आहे," हे सांगताना त्यांनी यशस्वी कथा-कथनाचे मुलभूत घटक अधोरेखित केले.  

(छायाचित्र: रिची मेहता 18 व्या मिफ (MIFF) मध्ये आयोजित संभाषण सत्राला संबोधित करताना)

 

या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करूनही, गुन्हेगारी शैलीकडे विशेषत: आकर्षित न झालेल्या या असामान्य चित्रपट निर्मात्याने आपला अनोखा दृष्टिकोन प्रकट केला. "स्थानिक चित्रपट बनवणारे जी गोष्ट उत्तम सांगू शकतील, अशा स्थानिक कथा सांगण्यात मला रस नाही. मला ज्या कथा सांगायच्या आहेत, त्यांचा आवाका खूप मोठा आहे, अशा कथा, ज्या आपल्या हृदयाला भिडतील, एक मानव जात म्हणून त्यासाठी आपण सक्षम आहोत याचा प्रत्यय देतील," ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षक वर्गाला  गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याच वेळी अधिक व्यापक, अनेकदा अधिक क्लिष्ट विषयांना संबोधित करण्यासाठी ते गुन्हेगारी शैलीचा वापर करतात. “मनोरंजन हे साधन आहे, साध्य नाही,” रिची मेहता यांनी नमूद केले.

त्यांच्या बहुचर्चित क्राईम थ्रिलरच्या उत्पत्तीचा शोध घेताना, रिची मेहता म्हणाले की, "इंडिया इन अ डे" या माहितीपटाच्या प्रक्रियेत गोळा केलेल्या हस्तिदंताच्या बस्टचे फुटेज जमावाने मिळवले, त्यामुळे हत्तींची शिकार या विषयावर त्यांना उत्सुकता वाटू लागली, आणि त्या नंतर ‘पोचर’ या मालिकेची निर्मिती झाली.  

(छायाचित्र: ख्यातनाम रेडिओ कलाकार रोहिणी रामनाथन रिची मेहता यांच्या बरोबरच्या संभाषण सत्राचे संचालन करताना)

 

अनिवासी भारतीय चित्रपट निर्माता म्हणून, रिची मेहता यांना त्यांच्या मायदेशासाठी काहीतरी  योगदान देण्याच्या जबाबदारीची तीव्र जाणीव आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रीयेमधील संशोधनाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना, ते म्हणाले, "आपण लोकांशी बोलू लागतो, आणि त्यांना जाणून घेतो, आणि तिथेच आपल्याला सर्व गोष्टी समजू लागतात. लोकांना ज्या गोष्टी बघण्याची सवय नाही, त्या दाखवण्यावर माझा भर होता. मी जर प्राण्याची भूमिका मांडत असेन, तर मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की त्यांची मानवाबद्दलची प्रतिक्रिया ही भीती किंवा उदासीनता हीच आहे,” त्यांनी स्पष्ट केले.

अनेक भाषांमध्ये मालिका दिग्दर्शित करण्यामधील तांत्रिक आणि भाषिक आव्हानांवरही या सत्रात चर्चा झाली. "हा  शिकण्याचा अद्भुत अनुभव होता. मी इंग्रजीत जे लिहिले आहे ते अचूकपणे मांडले जात आहे, एवढेच मला पाहायचे होते ," असे रिची मेहता म्हणाले.

आपल्या यापुढील प्रकल्पांवर बोलताना ते म्हणाले की, ते वाघ आणि मार्जार जातीच्या मोठ्या प्राण्यांवरील संशोधनाच्या दीर्घकालीन प्रकल्पावर काम करणार आहेत. त्यांच्या लेखन प्रक्रियेबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना, रिची मेहता यांनी बंदिस्त खोलीत बसून केलेल्या लेखना पेक्षा आपण संशोधनामधून केलेल्या लेखनाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले, . “मला लेखनामधील संशोधन आवडते,” असे ते म्हणाले.

 

* * *

PIB Team MIFF | S.Kane/R.Agashe/D.Rane | 19

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2025807) Visitor Counter : 63