माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतातील सृजनशील व्यक्तींनी त्यांच्या बौद्धिक संपदा अधिकारांबाबत जागरुक असले पाहिजे आणि त्यांच्या निर्मितींची नोंदणी केली पाहिजे- मिफ्फ मध्ये “बिल्डिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज थ्रू ऍनिमेशन फिल्म्स” या पॅनेल चर्चेमध्ये तज्ञांचा सूर


प्रसारकांना भारतीयत्व असलेला आशय हवा होता आणि त्यातूनच छोटा भीमची निर्मिती झाली- ग्रीन गोल्ड ऍनिमेशन प्रा. लि. चे सीईओ राजीव चिल्का यांची माहिती

‘अयलान’ हा तामिळ ऍनिमेशनपट हिंदी आणि इतर भाषांमध्ये येईल- चित्रपटांचे व्हीएफएक्स सुपरवायझर बिजॉय अर्पूथराज यांची माहिती

भारताच्या समृद्ध इतिहासातून भारतीय ऍनिमेशन पात्रांची निर्मिती झाली पाहिजे- नमन रामचंद्रन, चित्रपट समीक्षक

Posted On: 16 JUN 2024 9:10PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

भारतातील सृजनशील व्यक्तींनी त्यांच्या सृजनशील निर्मितीच्या नोंदणीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे आणि त्यावर अधिकार मिळवला पाहिजे. एका सृजनशील निर्मितीचे मालक किंवा लेखक बनल्यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनापासून कायदेशीर संरक्षण मिळेल,  असे मनोरंजन क्षेत्रातील विधिज्ञ अनामिका झा यांनी सांगितले. अलीकडच्या काळातील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ऍनिमेशन पात्र असलेल्या छोटा भीमची निर्मिती करणारे राजीव चिल्का यांनी देखील याबाबत सहमती व्यक्त केली. तर अयलान या तामिळ भाषेतील साय-फाय चित्रपटाचे व्हीएफएक्स सुपरवायजर असलेले बिजॉय अर्पूथराज यांनी सृजनशील निर्मात्यांना त्यांच्या निर्मितीची नोंदणी तिच्या संकल्पनेच्या पहिल्या दिवसापासूनच करण्याचे आवाहन केले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सोबतच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या “ अनव्हेलिंग द ऍनिमेशन फ्रंटियरः बिल्डिंग इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज थ्रू ऍनिमेशन फिल्म्सः केस स्टडीः अयलान अँड छोटा भीम” या पॅनेल चर्चेमध्ये आज विविध मान्यवरांनी हा सूर व्यक्त केला. फिक्कीमध्ये एव्हीजीसी फोरमचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी यांनी या महत्त्वाच्या मात्र मनोरंजन क्षेत्रात नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या बाजूवरील या चर्चेचे सूत्रसंचालन केले. या पॅनेलमध्ये ब्रिटन स्थित चित्रपट समीक्षक नमन रामचंद्रन देखील सहभागी झाले होते ज्यांनी भारतात आणि इतरत्र ऍनिमेशन बाजाराच्या विकासाचे विविध पैलू उलगडून दाखवले.

छोटा भीमचा जन्म ज्या स्टुडिओतून झाला त्या ग्रीन गोल्ड ऍनिमेशन प्रा. लि. चे सीईओ राजीव चिलाका यांनी प्रेक्षकांना लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेल्या आणि यावर्षी एप्रिल महिन्यात 16 वर्षे पूर्ण झालेल्या आणि अजूनही त्याची लोकप्रियता कायम असलेल्या या पात्राच्या उत्क्रांतीचा प्रवास घडवून आणला.

छोटा भीम या पात्राचे आतापर्यंत सहा अवतार झाले आहेत आणि त्याला देशभरात भरभरून व्यावसायिक यश मिळाले आहे असे राजीव चिलका म्हणाले. “या पात्रासाठी मी सुरुवातीलाच नोंदणी केली होती”,असे  ते म्हणाले. त्यांनी खुलासा केला की, अमेझॉन (Amazon) ने छोटा भीमच्या सर्व आवृत्त्या विकत घेतल्यावर, त्यांच्या कंपनीने नेटफ्लिक्स (Netflix) साठी Mighty Little Bheem तयार केला, तिथे  या मालिकेने चार सीझनमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली.

फँटम एफएक्सचे संचालक बेजॉय अर्पूर्थराज म्हणाले, ‘आम्हाला ‘आयलान’ या पात्राचा आयपी विकत घ्यायचा होता याचे एक मोठे कारण म्हणजे, आम्हाला वाटले की ते मार्केटेबल (सहज विक्री योग्य) आहे आणि त्याचा उत्तम परतावा मिळेल’. त्यावर काम सुरु करण्यापूर्वी त्यांनी त्याचे बौद्धिक संपदा हक्कही मिळवले होते. ‘आयलान’ ची तेलुगू आवृत्ती प्रदर्शित झाली असून निर्माते आता तो हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. अर्पूर्थराज यांनी नमूद केले की जेव्हा चित्रपटाची योजना आखली जात होती, तेव्हा निर्मात्यांना तो चालेल की नाही याची खात्री नव्हती. मात्र अर्पूर्थराज आणि त्यांची टीम त्यावर काम करण्यासाठी उत्सुक होते कारण हा चित्रपट भारतीय ॲनिमेशन निर्मितीच्या बाजारपेठेतील अनेक मिथक (चुकीचे समज) मोडीत काढेल, आणि भारतीय VFX आणि ॲनिमेशन कलाकारांपुढे एक नवे उदाहरण ठेवेल, याची त्यांना खात्री होती. ‘‘आम्ही आता आयलानवर कार्टून मालिका काढण्याचा विचार करत आहोत आणि पुढच्या मालिकेत लोकांना आयलान किंवा एलियनच्या ग्रहावर घेऊन जाण्याच्या कल्पनेवरही काम करत आहोत’’, असे ते पुढे म्हणाले.

चित्रपट समीक्षक नमन रामचंद्रन म्हणाले की, लोकांना कोविड (COVID) नंतरच्या जगात अधिक स्थानिक मनोरंजन उत्पादने हवी आहेत. उदाहरणार्थ, एका भारतीयाला नार्कोस पाहायला आवडेल, तर एक मेक्सिकन मिर्झापूर पाहील, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय ॲनिमेशन पात्रे भारताच्या समृद्ध इतिहासामधून सुचायला हवीत असे मत त्यांनी व्यक्त केले.  भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि निर्मात्यांना आशयसंपन्न सामग्रीसाठी अन्य देशांवर  अवलंबून राहण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. कल्पना स्थानिक मातीत घट्ट रुजलेल्या हव्यात, असे ते म्हणाले. राजीव चिलका यांनी माहिती दिली की, ब्रॉडकास्टरना भारतीय मातीतली सामग्री हवी होती, आणि त्यातूनच छोटा भीमचा जन्म झाला. 2008 मध्ये तो पहिल्यांदाच प्रदर्शित झाला, आणि पटकन लोकप्रिय झाला.

‘अटर्नी फॉर क्रिएटर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायदेतज्ज्ञ अनामिका झा, यांनी या सत्राला उपस्थित राहिलेल्या नवोदित निर्मात्यांना सावध केले, आणि सांगितले, ‘‘'एखाद्या पात्राची निर्मिती करण्यासाठी जर तुम्ही तुमचे हृदय आणि आत्मा गुंतवला असेल, तर तुमच्याकडे त्याचे बौद्धिक संपदा (IP) अधिकारही असायला हवेत”. भारतातील अनेक निर्माते आणि कलाप्रेमी लोकांना त्यांच्या सृजनशील निर्मितीच्या  कॉपीराइटबद्दल जागरुक होण्याची गरज आहे याचा आशिष कुलकर्णी यांनी  पुनरुच्चार केला. 

 

* * *

PIB Team MIFF | S.Kane/Shailesh P/Rajshree/D.Rane | 17

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025783) Visitor Counter : 33