माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पहिल्यावहिल्या माहितीपट 'बाझार'चे, मिफ 2024 या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाले उद्घाटन


प्रस्थापित व्यावसायिक आणि उदयोन्मुख प्रतिभा यांच्यातील सहयोगाला चालना देत परस्परसंवादी केंद्र बनण्याचे या माहितीपट 'बाझार'चे उद्दिष्ट

Posted On: 16 JUN 2024 4:58PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ) आज पहिल्यावहिल्या माहितीपट 'बाझार'चे  उद्घाटन झाले.  हा महत्त्वाचा उपक्रम मिफ साठी, दक्षिण आशियातील चित्रपटेतर पटांसाठी मुख्य व्यासपीठ म्हणून आपला दर्जा अधिक मजबूत करणारा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.

माहितीपटांचा 'बाझार' हा एक अग्रगण्य उपक्रम आहे, ज्याचा उद्देश चित्रपट निर्मात्यांना खरेदीदार, प्रायोजक आणि सहयोगी यांच्याशी जोडण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ मिळवून देऊन माहितीपट उद्योग उंचावणे हा आहे.  16 ते 18 जून 2024 या कालावधीत एनएफडीसी  संकुलात आयोजित या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात 27 भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 10 देशांमधील जवळपास 200 माहितीपट समाविष्ट आहेत.

चित्रपट निर्मात्या अपूर्वा बक्षी यांनी माहितीपट 'बाझार'चे उद्घाटन केले. यावेळी  मिफ चित्रपट महोत्सव संचालक आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार आणि पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग) च्या अतिरिक्त महासंचालक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ-सी बी एफ सी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता वत्स शर्मा उपस्थित होते.

नवोदित चित्रपट निर्मात्यांना संबोधित करताना, अपूर्वा बक्षी यांनी त्यांना बाजारातील संधींचा प्रभावी सहकार्यासाठी उपयोग करण्याची विनंती केली.  "या निमित्ताने आपण इथे असताना, नवीन कल्पना, शक्यता आणि सहयोगाच्या संधी शोधू, आजमावू आणि संवाद साधू", असे त्या म्हणाल्या.

माहितीपट 'बाझार'मध्ये तीन निवडक टप्पे (क्युरेटेड वर्टिकल) असतील:

  • सह-निर्मिती बाजार: 16 प्रकल्पांचा समावेश असलेला, हा विभाग चित्रपट निर्मात्यांना जगभरातील संभाव्य सहयोगी, निर्माते, सह-निर्माते आणि वित्तपुरवठादारांशी जोडतो.
  • प्रक्रिया सुरु असणारी प्रयोगशाळा {वर्क-इन-प्रोग्रेस  लॅब}: चित्रपटांची चित्रीकरण केलेली सर्व दृश्य जोडणीसाठी सज्ज असलेल्या टप्प्यातले (रफ-कट स्टेज) 6 प्रकल्प मांडणारी ही प्रयोगशाळा, हे चित्रपट पूर्णावस्थेत नेण्यासाठी उद्योग व्यावसायिकांकडून अमूल्य अभिप्राय आणि मार्गदर्शन मिळवण्याची संधी देते.
  • पाहण्याची खोली: पूर्ण झालेले 106 माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट, निवडक प्रतिनिधींच्या  प्रेक्षक वर्गासाठी सादर करण्याची ही एक खास जागा, वितरण आणि निधीसाठीचे सौदे करण्यासाठी संधी मिळवून देते.

या कक्षांव्यतिरिक्त, हा 'बाझार' 'ओपन बायर-सेलर मीट' हा खुला विक्रेता-खरेदीदार मेळावा आयोजित करेल. यामुळे  निर्मिती, वितरण (सिंडिकेशन), अधिग्रहण, वितरण आणि विक्रीमध्ये सहयोग सुलभ होईल.  यातील एक समर्पित सत्र, माहितीपट निर्मिती प्रक्रिया आणि कॉर्पोरेट ब्रँडिंग यांच्यातील संबंधाला देखील वाव देईल, ज्यामध्ये फिक्की  सारख्या औद्योगिक संस्था ब्रँड वाढीसाठी आणि सामाजिक प्रभावासाठी एक साधन म्हणून सीएसआर निधीवर चर्चा करतील.

माहितीपटांचा हा 'बाझार' प्रस्थापित व्यावसायिक आणि उदयोन्मुख प्रतिभा यांच्यातील सहयोगाला चालना देत परस्परसंवादी केंद्र बनण्याचा प्रयत्न करतो. निर्मितीच्या  विविध टप्प्यांवर महत्त्वपूर्ण सहाय्य प्रदान करून, जागतिक स्तरावर प्रभावी माहितीपटांच्या निर्मिती आणि वितरणाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

माहितीपट 'बाझार' हा मेळा, चित्रपट निर्मात्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि आकर्षक कथा आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या अग्रभागी आणण्यासाठी वचनबद्ध आहे.  यातून,सहभागींना सध्याचे कल, बाजारातील मागणी, वितरण धोरणे आणि प्रेक्षकांना काय हवे या बद्दल मौल्यवान माहिती मिळेल, तसेच उद्योग तज्ञांना त्यांच्या कलाकृतींची पूर्ण क्षमता साध्य करण्यात मदत करण्यासाठी मार्मिक अभिप्राय प्रदान करेल.

या मेळ्यामध्ये, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन लिमिटेड, J&K, IDPA, सिनेडब्स इत्यादी संस्थांचे अनेक स्टॉल्स आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने श्रीलंका, बेलारूस, इराण आणि अर्जेंटिना यांसारख्या देशांनाही स्टॉल्स उपलब्ध करुन दिले आहेत.

 

* * *

PIB Team MIFF | S.Kane/A.Save/D.Rane | 15

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2025699) Visitor Counter : 94