माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ महोत्सवाच्या बिगर-स्पर्धा विभागात सादर होणार भारतातील वन्यजीव सृष्टीवरील कथांची विशेष मालिका


वन्यजीवांवरील माहितीपट मालिका प्राण्यांच्या विविध प्रजातींचं सौदर्य, त्यांच्या अस्तित्वापुढील आव्हाने व त्यांच्या संवर्धनाची तातडीची गरज अधोरेखित करणार

Posted On: 16 JUN 2024 4:40PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

जैवविविधतेची देणगी लाभलेल्या भारतात वन्यजीव प्रजाती आणि परीसंस्थेची विपुल श्रेणी पाहायला मिळते. हिमालय पर्वत रांगांच्या हिमाच्छादित शिखरांपासून, ते पश्चिम घाटाच्या हिरव्यागार जंगलांपर्यंत, भारताच्या वैविध्यपूर्ण भूप्रदेशात वाघ, हत्ती, गेंडा, बिबट्या आणि विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी वास्तव्याला आहेत.   

भारताचं या वन्यजीवांशी असलेले घट्ट नाते साजरे करण्यासाठी, 18वा मिफ (MIFF), म्हणजेच यंदाचा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, आपल्या बिगर स्पर्धा विभागात वन्यजीवांवर आधारित कथांची विशेष मालिका घेऊन आला आहे. माहितीपटांचा हा खजीना, प्राण्यांच्या विविध  प्रजातींचे सौदर्य, त्यांच्या अस्तित्वापुढील आव्हाने आणि त्यांच्या संवर्धनाची तातडीची गरज अधोरेखित करतो.

हे माहितीपट आणि त्याचे दिग्दर्शक आकर्षक, उद्बोधक कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती करायला उद्युक्त करतात. ‘वन्यजीव पॅकेज’ अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या माहितीपटांवर एक नजर टाकूया:

 

विंग्स ऑफ हिमालयाज (WINGS OF HIMALAYAS):

हवामानाबाबत जागरुकता निर्माण होत असलेल्या आजच्या जगात, ‘विंग्स ऑफ हिमालयाज’ हा माहितीपट रोमांचकारी साहसाचा अनुभव देतो, आणि जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या बियर्ड व्हल्चर, म्हणजेच दाढीवाल्या गिधाडांच्या आकर्षक जगाचा वेध घेतो. हा चित्रपट नेपाळी जीवशास्त्रज्ञ डॉ. तुलसी सुबेदी आणि त्यांचे मार्गदर्शक संदेश यांच्या बरोबर पुढे सरकतो. धोक्यात आलेल्या या प्रजातीचे भविष्य सुरक्षित करताना, हवानाच्या बदलत्या स्थितीच्या आव्हानाचा धैर्याने सामना करताना त्यांना येणारे अनुभव या माहितीपटात आपल्याला पाहायला मिळतात. इंग्रजी भाषेतील 31 मिनिटांचा हा माहितीपट जगभरातील प्रेक्षकांना पर्यावरण रक्षणासाठी कृती करण्याची आणि निसर्गाशी एकरूपतेने अधिक शाश्वतपणे जगण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा बाळगतो.  

स्क्रीनिंगची (प्रदर्शन) तारीख, वेळ आणि स्थळ: 20 जून 2024, रात्री 8.30 वाजता जेबी हॉल येथे.

दिग्दर्शकाचा परिचय:

किरण घाडगे हे वन्यजीवांवर आधारित चित्रपट बनवतात. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी अनेक माहितीपट तयार केले आहेत. शाश्वत पर्यटन आणि संवर्धनाला चालना देण्यासाठी व्याख्याने आणि लेखनाद्वारे देखील ते निसर्ग संवर्धनाचा पुरस्कार करतात.

मुनीर विराणी हे एक संवर्धन जीवशास्त्रज्ञ, छायाचित्रकार, चित्रपट निर्माते आणि लेखक आहेत. त्यांना संवर्धन प्रकल्प डिझाइन, अंमलबजावणी, व्यवस्थापन आणि प्रसाराचा वीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

 

होमकमिंग: द एडव्हेनचर्स ऑफ अ ग्रीन सी टर्टल (THE ADVENTURES OF A GREEN SEA TURTLE)

होमकमिंग, एका हिरव्या कासवाचा जिज्ञासा वाढवणारा जीवन प्रवास उलगडतो. पडल्स नावाचे हे कासव आपल्या जन्मापासून पहिल्या तीस वर्षांच्या काळात काय करतं, हे या माहितीपटात दाखवलं आहे. दूरवरच्या एका समुद्र किनाऱ्यावर अंड्यातून बाहेर येण्यापासून, ते धडपडत, कठीण रस्त्यावर सरपटत आपला रस्ता शोधणे, पहिल्यांदा पोहण्याचा अनुभव घेणे, आणि शेवटी विशाल समुद्राच्या कुशीत हे कासव स्वतःला झोकून देते. मात्र, अशीच वर्षा मागून वर्ष जातात, आणि पाण्याच्या अनियंत्रित प्रदूषणामुळे पडल्सला तिचा जन्म झालेल्या समुद्रकिनाऱ्यावर, आपल्या घरी परतण्याचा मार्ग शोधताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे तिच्या संपूर्ण प्रजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.    

स्क्रीनिंगची तारीख, वेळ आणि ठिकाण: 18 जून 2024, संध्याकाळी 6.45 वाजता जेबी हॉल येथे.

दिग्दर्शकाचा परिचय:

अमोघवर्षा जे.एस. हे भारतीय चित्रपट निर्माते आणि वन्यजीव छायाचित्रकार आहेत. 2021 मध्ये, सर डेव्हिड ॲटनबरो यांचे निवेदन लाभलेल्या "वाइल्ड कर्नाटका" या त्यांच्या चित्रपटाने, सर्वोत्कृष्ट एक्सप्लोरेशन/व्हॉइस ओव्हर श्रेणीमध्ये 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता.

 

ब्लड लाईन  

"ब्लड लाइन" हा माहितीपट माधुरी किंवा टायगर (T10), या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका वाघिणीची गोष्ट सांगतो. ही गोष्ट आपल्याला मध्य भारतात, जिथे वाघांचे सर्वाधिक वास्तव्य आहे, अशा घनदाट जंगलात घेऊन जाते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये मध्य भारतातल्या वाघांच्या संख्येत वाढ होत असल्याचे काही अहवाल सांगतात, मात्र वाघांची संख्या वाढत असताना, त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक साधन संपत्तीमध्ये मात्र घट होत आहे. अधिवासाची हानी, झपाट्याने खंडित झालेले कॉरिडॉर (वनक्षेत्र) आणि वाघांची शिकार, हे विरोधाभासी चित्र रंगवते. हा माहितीपट मार्जार वर्गातल्या या दिमाखदार प्राण्याच्या अस्तित्वापुढे निर्माण झालेल्या धोक्याचे कठोर वास्तव सांगतो. हा चित्रपट माधुरी या वाघिणीने स्वतःच्या आणि आपल्या  बछड्यांच्या जगण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी दिलेल्या असामान्य लढ्याचा प्रवास सांगतो.    

स्क्रीनिंगची तारीख, वेळ आणि ठिकाण: 17 जून 2024, रात्री 8.30 वाजता जेबी हॉल येथे.

दिग्दर्शकाचा परिचय:

भारताच्या टायगर कॅपिटलमध्ये लहानाचे मोठे झालेले, वन्यजीव छायाचित्रकार श्रीहर्ष गजभिये यांनी पहिल्यांदा जंगलात वाघाचं छायाचित्र काढलं, तेव्हापासून निसर्गा विषयीच्या अतूट ओढीनं त्यांच्या मनाचा ताबा घेतला. श्रीहर्ष यांनी अनेक वर्ष जंगलामध्ये माधुरी या वाघिणीचा जगण्याचा संघर्ष जाणून घेण्यासाठी तिचा मागोवा घेतला. तिचा हा असामान्य प्रवास त्यांनी आपल्या कथा कथन आणि चित्रिकरण कौशल्यामधून या माहितीपटाच्या माधमातून सादर केला आहे.   

 

* * *

PIB Team MIFF | S.Nilkanth/R.Agashe/D.Rane | 14

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025696) Visitor Counter : 36