नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे "पवन-ऊर्जा: भारताच्या भविष्याला बळ" या मध्यवर्ती संकल्पनेसह 'जागतिक पवन दिन 2024' कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
15 JUN 2024 7:37PM by PIB Mumbai
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे "पवन-ऊर्जा: भारताच्या भविष्याला बळ" या मध्यवर्ती संकल्पनेसह 15 जून 2024 रोजी 'जागतिक पवन दिन " आयोजित केला होता. भारतीय पवन क्षेत्राचे आतापर्यंतचे गौरवशाली यश साजरे करणे आणि भारतात पवन ऊर्जेच्या वापराला गती देण्याच्या संभाव्य उपायांवर चर्चा करणे, हा यामागचा उद्देश आहे. "पवन-ऊर्जा: भारताच्या भविष्याला बळ" ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात 'वीज मागणी पूर्ण करण्यात पवन ऊर्जेची भूमिका', 'भारतात ऑफशोअर पवन उर्जेच्या वापराला गती देणे ' आणि "भारतातील पवन विकास: भारताच्या ऊर्जा सुरक्षेला चालना ' या विषयावर गट चर्चा यशस्वीपणे पार पडल्या.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, ऊर्जा सचिव भूपिंदर सिंग भल्ला आणि सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर प्रमुख हितधारक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशात सर्वाधिक पवन क्षमता निर्मिती साध्य केल्याबद्दल गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांचा, ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी सत्कार केला. आपल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय मंत्र्यांनी नवीकरणीय ऊर्जेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, भारताला पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर बनवण्यासाठी आणि सर्वांसाठी हरित उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी सामूहिक कृती करण्याचे आवाहन केले.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा सचिव भूपिंदरसिंग भल्ला यांनी आपल्या मुख्य भाषणात, मागील वर्षाच्या कामगिरीचा उल्लेख केला आणि संबंधितांना या क्षेत्रासाठी अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करण्यास प्रोत्साहित केले.
ऑनशोअर आणि ऑफशोअर पवन ऊर्जेच्या क्षमतेवरील तीन गट चर्चांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, उत्पादक आणि विकासक, शैक्षणिक संस्था, विचारवंत आणि इतर प्रमुख हितधारक सक्रिय सहभागी झाले.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025628)
Visitor Counter : 80