कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

“प्रशासकीय सुधारणांमध्ये नागरिकांच्या डिजिटल सक्षमीकरणाचा समावेश”


डॉ.जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या विविध विभागांची आढावा बैठक

Posted On: 13 JUN 2024 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2024

कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, “प्रशासकीय सुधारणांमध्ये वयस्क नागरीक आणि निवृत्तीवेतनधारकांसह सर्व नागरिकांना डिजिटल माध्यमात सक्षम करण्याचा समावेश केला जाईल.” ते आज नवी दिल्लीत इथे बोलत होते.

कर्मचारी व प्रशिक्षण विभाग, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग यांची एकत्रित बैठक डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान सरकार कमाल प्रशासन या दृष्टीकोनाला धरून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय सुधारणांचे गेल्या दशकात सुरू केलेले काम मंत्रालय सातत्याने पुढे नेत राहील.”

सरकारने सुरू केलेल्या प्रशासकीय सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरीक राहील आणि त्याचे जीवन  सुलभ करण्यासाठी कार्यक्षम सार्वजनिक सेवा पुरवठा, भक्कम सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रशासनाद्वारे नागरिकांचे कल्याण साध्य करणार असल्याचे, डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

सेवा आणि पदभरतीच्या नियमांमध्ये काळानुरुप एकवाक्यता आणण्याच्या दिशेने काम करण्याच्या व त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील बदलांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, संवर्धित/आभासी वास्तव आदी विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर हा नव्या सुधारणांचा अविभाज्य भाग असावा, अशी भूमिका डॉ.सिंह यांनी मांडली. ई-लर्निंग व कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी हा त्यांच्या कारकीर्दीतील प्रगतीचा भाग असावा, यावर त्यांनी भर दिला.

प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागाच्या कामाचा आढावा घेताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “राज्यांमध्ये निकोप आणि सहकार्यात्मक  स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या निर्देशांकांच्या धर्तीवर आपण केंद्रीय मंत्रालयांसाठी चांगल्या प्रशासनाचे निर्देशांक निर्माण केले पाहिजेत. त्यातून वेगवेगळ्या सरकारी विभागांत उत्तम पद्धतींच्या वापराला चालना मिळेल.”

“निवृत्तीवेतनविषयक नियमांमध्ये समानता आणून ज्येष्ठ नागरिकांच्या डिजिटल सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनात  सुलभता आणण्याचे ध्येय आपल्या विभागासाठी मार्गदर्शक ठरायला हवे,” असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले.

 

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2025197) Visitor Counter : 59