निती आयोग

अटल नवोन्मेष अभियान (Atal Innovation Mission - AIM) आणि ला फोंडेशन डसॉल्ट सिस्टीम्स इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'मेड इन थ्रीडी - सीड द फ्युचर आंत्रप्रेन्युअर्स' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या महाअंतिम फेरीत युवा नवोन्मेषकांनी दाखवली चमक

Posted On: 13 JUN 2024 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2024

अटल नवोन्मेष अभियानअंतर्गतच्या (Atal Innovation Mission - AIM) शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या उद्योगशीलता कार्याक्रमाअंतर्गत (Student Entrepreneurship Program - SEP) 2023 - 24 या वर्षाच्या हंगामात राबवलेल्या 'मेड इन थ्रीडी - सीड द फ्युचर आंत्रप्रेन्युअर्स' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा समारोप काल पुणे इथे महाअंतिम फेरीने साजरा झाला. अटल नवोन्मेष अभियान (Atal Innovation Mission - AIM) आणि ला फोंडेशन डसॉल्ट सिस्टीम्स इंडिया यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला होता. युवा वर्गातील अभिनवता आणि उद्योगशीलतेला चालना देण्याच्या समर्पित उद्देशाने गेले आठ महिने हा कार्यक्रम राबवला गेला. काल झालेल्या सोहळ्याने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

या कार्यक्रमाच्या 2023 - 24 या वर्षाच्या हंगामात विद्यार्थ्यांना कृषी विज्ञान केंद्रांसोबत जोडून देण्यावर विशेष भर दिला गेला. या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांच्या संकल्पनांपैकी देशाच्या ग्रामीण परिसंस्थेशी संबंधित संकल्पनांवर आधारीत प्रकल्पांची संख्या  लक्षणीय असल्याचे आढळून आले. देशभरातील 140 शाळांमधील सर्वोच्च 12 मध्ये आलेल्या शाळांच्या चमूंनी आपल्या प्रकल्पांअंतर्गतच्या उत्पादनाच्या संरचनेत असामान्य अभिनवतेचे दर्शन घडवले, इतकेच नाही तर या विद्यार्थ्यांनी आपल्या स्टार्ट - अपमधून पतपुरवठा, व्यवसाय आणि विपणन धोरणाविषयीच्या आपल्या सखोल आकलनाचे दर्शनही घडवले.

निती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाचे (Atal Innovation Mission - AIM) अभियान संचालक डॉ. चिंतन वैष्णव, डसॉल्ट सिस्टीम्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक एन. जी., दसॉल्ट सिस्टीम्स सोल्यूशन्स लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन मोगसाळे, पुण्यातील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचे तंत्रज्ञान सल्लागार जयेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या  पुरस्कार सोहळ्यात उपस्थितीत राहून सोहळ्याला नव्या उंचीवर नेले.  डॉ. चिंतन वैष्णव यांनी केलेल्या अत्यंत  प्रेरणादायी संबोधनात देशाच्या शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेषाचे महत्त्व तसेच भविष्यातील नवोन्मेषाचे कर्तेधर्ते आणि उद्योजक घडवण्याच्यादृष्टीने या कार्यक्रमाचे योगदान अधोरेखित केले.

महाराष्ट्रातील चिखली येथील दादा महाराज नाटेकर विद्यालयाने प्रथम क्रमांक, तर  पुण्याच्या ऑर्किड विद्यालयाने द्वितीय क्रमांक, तर दिल्ली येथील स्प्रिंगडेल्स स्कूल, धौला कुआँ, यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या यशांमुळे भारतातील नवोदित आणि उद्योजकांच्या पुढील पिढीची जडणघडण करण्यात या कार्यक्रमाचा प्रभाव अधोरेखित होतो.

एआयएम, नीती आयोग आणि ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम्स इंडियाद्वारे संयुक्तपणे हा कार्यक्रम भारतभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेची मानसिकता रुजवण्यासाठी आयोजित केला आहे. एआयएमद्वारे आयोजित एटीएल मॅरेथॉनमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांचे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नामांकन देखील केले जाते.

या कार्यक्रमात निवडक शाळांनी   स्टार्टअप तयार करण्यासाठी सहा विद्यार्थी आणि एक शिक्षक यांचा संघ तयार केला आहे. स्टार्टअप म्हणून, विद्यार्थ्यांना आजूबाजूला दिसणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्या स्वप्नातील उत्पादन ओळखून 3D डिजिटल तंत्रज्ञान वापरून ते डिझाइन करावे लागते आणि एक विपणन मोहीम तयार करावी लागते. ज्यामध्ये उत्पादन माहितीपत्रक, उत्पादनाच्या जाहिरातीचा व्हिडिओ आणि किंमत धोरण यांचा समावेश असतो.

2023 च्या हंगामात, 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 140 शाळांनी सहभाग नोंदवला. यातून तरुण उद्योजकांची जडणघडण आणि विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याची आवड निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचा व्यापक प्रभाव दिसून येतो.


NM/Tushar P/Gajendra D/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2025040) Visitor Counter : 47