वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातून संयुक्त अरब अमिरातीच्या बाजारपेठेत एमडी 2 जातीच्या अननसाची पहिली खेप रवाना करण्यात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने - अपेडाने बजावली महत्वाची भूमिका

Posted On: 13 JUN 2024 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2024

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत येत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (Agricultural and Processed Food Products Export Development Authority - APEDA),  संयुक्त अरब अमिरातीला एमडी 2 जातीच्या अननसाची पहिली खेप यशस्वीरित्या निर्यात करण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली. ही निर्यात देशाच्या ताज्या फळ निर्यात क्षेत्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारे पाऊल ठरले आहे. .

या निर्यातीअंतर्गत उच्च मूल्य असलेले 8.7 मेट्रिक टन इतक्या वजनाचे (650 पेट्या) एमडी 2 जातीच्या अननसाची खेप रवाना केली गेली. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी, निर्यात वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरण तसेच केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेअंतर्गतच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (Indian Council of Agricultural Research - Central Coastal Agricultural Research Institute - ICAR CCARI)अनेक वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थितीत होते.

ही निर्यात म्हणजे भारताच्या कृषी निर्यातीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, या निर्यातीमुळे सर्वोत्तम गुणवत्तेच्या अननसाचे उत्पादन घेऊन त्याचा जागतिक बाजारपेठेला पुरवठा करण्याच्या आपल्या क्षमतेचे दर्शन घडून आले आहे. अशी भावना अभिषेक देव यांनी यावेळी व्यक्त केली. अननसाचे एमडी 2 हे वाण त्याचा असाधारण गोडवा आणि कमालीच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे,  आणि अशा दर्जाचा अननस संयुक्त अरब अमिरातीच्या बाजारपेठेत उपलब्ध करून देताना आमचा उत्साहदेखील द्विगुणीत झाला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

एमडी 2 अननस, ज्याला "गोल्डन राईप" किंवा "सुपर स्वीट" असेही म्हटले जाते, ते अननस कोस्टा रिका, फिलीपिन्स आणि थायलंड सारख्या देशांमध्ये लक्षणीय लागवडीसह अननस उद्योगात सुवर्ण मानक बनले आहे.

भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर), केंद्रीय तटीय कृषी अनुसंधान संस्थान (सीसीएआरआय) ने महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादित एमडी 2 अननसासाठी कापणीपश्चात व्यवस्थापन आणि सागरी प्रोटोकॉलच्या विकासासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य प्रदान केले. त्याचबरोवर एका खाजगी कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांच्या भागीदारीत 200 एकरांवर हे  वाण यशस्वीरीत्या वाढवले , ज्यामुळे याच्या चांगल्या दर्जाची आणि उत्पन्नाची खात्री झाली.

पनवेल, नवी मुंबई येथे अननसांची बारकाईने प्रतवारी, वर्गवारी, पॅकिंग आणि साठवणूक करण्यात आली. तेथून, पुढील संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्यासाठी हे उत्पादन  जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे नेण्यात आले.

भारतातून ताजी फळे आणि भाज्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाचे  समर्पित प्रयत्न नेहमीच सुरु असतात . तसेच एमडी 2 अननसाची ही पहिली प्रायोगिक निर्यात खेप एपीईडीएच्या निर्यातीतील  भरीव वाढीची निर्देशक असून  , यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची उपस्थिती वाढण्यास मदत होईल.

 

 


JPS/TP/GD/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2025018) Visitor Counter : 101