संरक्षण मंत्रालय

देशाचे लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती. येत्या 30 जून 2024 रोजी स्वीकारणार पदभार

Posted On: 11 JUN 2024 10:58PM by PIB Mumbai

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. देशाचे विद्यमान लष्करप्रमुख, परमविशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक विजेते जनरल मनोज सी पांडे येत्या 30 जून 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. त्याच दिवशी दुपारनंतर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे जनरल मनोज सी पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारतील. परमविशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्या देशाचे लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 

1 जुलै, 1964 रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची 15 डिसेंबर 1984 रोजी भारतीय लष्कराच्या पायदळात (जम्मू-काश्मीर रायफल्स) अर्थात इन्फंट्री मध्ये  सुरुवातीची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आपल्या सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि अभिमानास्पद लष्करी कारकिर्दी दरम्यान लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराच्या विविध कमांड, अधिकारी कर्मचारी, सूचित आणि परदेशातील नियुक्त्यांसारखी व्यापक सेवा बजावली आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना कमांड अंतर्गत मिळालेल्या नियुक्त्यांमध्ये कमांड ऑफ रेजिमेंट (18 जम्मू-काश्मीर रायफल्स), ब्रिगेड (26 सेक्टर आसाम रायफल्स), आसाम रायफल्स (पूर्व) आणि 9 कॉर्प्स चे महानिरीक्षक या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे

लेफ्टनंट जनरल पदाचा दर्जा प्राप्त असलेल्या उपेंद्र द्विवेदी यांची देशाचे लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्त होण्याआधी अनेक महत्वाच्या पदांवर नियुक्ती झाली आहे. यात 2022 - 2024 या कालावधीत भारतीय लष्कराच्या पायदळाचे महासंचालक तसेच लष्कराच्या उत्तर कमांड मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन अशा महत्वाच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे रेवा इथली सैनिकी शाळा, राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि यूएस आर्मी वॉर कॉलेज अशा प्रतिथयश लष्करी शैक्षणिक संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी संरक्षण सेवा  कर्मचारी महाविद्यालय (Defence Services Staff College - DSSC ) वेलिंग्टन आणि महू इथल्या लष्करी युद्धसराव महाविद्यालयातील (Army War College) अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत. याव्यतिरिक्त, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अमेरिकेच्या कार्लिस्ले इथल्या यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील (National Defence College -  NDC) अभ्यासक्रमाच्या दर्जाच्या अभ्यासक्रमात सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा सन्मानही प्राप्त केला आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण व्यवस्थापन विषयात एम फिल ही पदवी प्राप्त केली आहे, यासोबतच त्यांनी रणनितीविषयक अभ्यासक्रम आणि लष्करी विज्ञान या विषयांमधून दोन पदव्युत्तर पदव्याही प्राप्त केल्या आहेत.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) तसेच तीन जीओसी-इन-सी प्रशस्तीपत्रांनी सन्मानित करण्यात आले आहे.

***

NM/TusharP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2024632) Visitor Counter : 61


Read this release in: English , Urdu , Hindi