संरक्षण मंत्रालय

पुणे येथील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत तीनही दलातील अधिकाऱ्यांसाठी संरक्षण सेवा तांत्रिक अधिकारी अभ्यासक्रम सुरू


नव्याने स्थापन झालेल्या तीनही दलांच्या संयुक्त प्रशिक्षण चमूद्वारे प्रशिक्षित करणारा पहिला अभ्यासक्रम

Posted On: 10 JUN 2024 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,10 जून 2024

 

पुणे येथील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत 10 जून 2024 रोजी तीनही दलातील अधिकाऱ्यांसाठी संरक्षण सेवा तांत्रिक अधिकारी अभ्यासक्रम सुरू झाला. भावी तंत्रज्ञानाधारित योद्धे आणि लष्कराचे नेतृत्व घडवण्यासाठी करियरच्या मध्यावधीतील भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल भारतीय तटरक्षक दल आणि परदेशी मित्र राष्ट्रातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आखणी करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात परदेशी मित्र राष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांसह तीनही दलातील आणि भारतीय तटरक्षक दलातील एकूण 166 अधिकारी सहभागी होत आहेत.

लष्करी तंत्रज्ञान संस्थेचे कमांडंट, अतिविशिष्ट पदक प्राप्त विवेक ब्लोरिया यांनी लष्कराची धुरा वाहणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना संबोधित करताना दलांमधील एकता आणि समन्वयाचे महत्त्व तसेच बहु-क्षेत्रीय कारवाईत युद्ध लढण्यासाठी प्रत्येक दलाची अद्वितीय क्षमता जोखण्याचे महत्व अधोरेखित केले. भारताच्या लष्करी आणि सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भू-राजकीय मुद्द्यांचे सर्वंकष ज्ञान विकसित करण्यासाठी भविष्यातील तंत्रज्ञानाधारित योध्यांच्या आवश्यकतेवरही कमांडंटनी प्रकाश टाकला. ही जागरूकता त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि दलांमधील विशिष्ट तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच लष्करी धोरणांमध्ये प्रभावीपणे योगदान देण्यास सक्षम करेल.

अभ्यासक्रमादरम्यान, अधिकाऱ्यांना विविध उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण धोरण, प्रत्यक्ष आणि सदृश्य कवायती, परिसंवाद, सहयोगी प्रकल्प, विविध संरक्षित क्षेत्रांना भेटी तसेच संरक्षण संशोधन आणि विकास आणि औद्योगिक कॉरिडॉर याविषयी माहिती दिली जाईल, जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षा धोरण, सामरिक कारवाई, लष्करी तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेसाठीचे राष्ट्रीय प्रयत्न याबाबत त्यांची जागरूकता आणि आकलन यात भर पडेल.

लष्करी तंत्रज्ञान संस्थेद्वारे संयुक्ततेच्या दिशेने एक अग्रगण्य उपक्रम म्हणून, संयुक्त प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी, तिन्ही दलांमधून घेतलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संयुक्त विभागांची स्थापना करण्यात आली आहे, जे विविध कौशल्य संच आणि दृष्टीकोन एकत्र आणतील. नव्याने स्थापन झालेल्या तिन्ही दलातील संयुक्त प्रशिक्षण पथकांद्वारे प्रशिक्षित होणारी ही पहिली डीएसटीएससी असेल. बहु-क्षेत्रीय कारवाई आणि संयुक्त संस्कृती निर्माण करण्यासाठी आवश्यक अखंड समन्वय आणि एकात्मता वाढवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2023743) Visitor Counter : 51