श्रम आणि रोजगार मंत्रालय

ईपीएस निवृत्तीवेतनधारकांकडून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादरीकरणासाठी चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर

Posted On: 08 JUN 2024 10:37AM by PIB Mumbai

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) 78 लाखांहून जास्त निवृत्तीवेतनधारक आहेत ज्यांना निवृत्तीवेतन अदा करणे सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. यापूर्वी त्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व्यक्तिशः बँकेत जावे लागत होते, ज्यामध्ये त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

ही बाब विचारात घेऊन 2015 मध्ये ईपीएफओ ने डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) प्रणालीचा अंगिकार केला. ईपीएफओ ईपीएस निवृत्तीवेतनधारकांकडून बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर आधारित डीएलसीचा स्वीकार करते. बायोमेट्रिक आधारित डीएलसी सादर करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी कोणत्याही बँकेची एखादी शाखा, टपाल कार्यालय, सामाईक सेवा केंद्र किंवा ईपीएफओ कार्यालयात, बोटांचे ठसे/बुबुळे कॅप्चर करणारे उपकरण असल्याने व्यक्तिशः भेट द्यायची असते.

ज्येष्ठ नागरिकांना बँक/टपाल कार्यालय इ. ठिकाणी व्यक्तिशः जाण्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी मेती (MeitY) आणि यूआयडीएआय ने चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान (FAT) विकसित केले आहे, ज्यामध्ये जीवन प्रमाणपत्रासाठी पुरावा म्हणून चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या घरातूनच डीएलसी सादर करण्याची एक पूर्णपणे नवी पद्धती सुरू झाली आहे जी वापरण्यासाठी सोयीची आणि परवडण्याजोगी आहे. यासाठी ते कोणत्याही ऍन्ड्रॉइड आधारित स्मार्टफोनचा वापर करू शकतात आणि वार्धक्यामुळे बँक, टपाल कार्यालयात ये-जा करण्यासाठी होणाऱा त्रास कमी करू शकतात.

या पद्धतीमध्ये निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या घरातूनच अतिशय सुविधाजनक पद्धतीने स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून चेहऱा स्कॅन करून ओळख पटवता येते. यूआयडीएआयच्या आधार डेटाबेसच्या मदतीने यूआयडीएआयच्या फेस रेकग्निशन ऍपचा वापर करून हे प्रमाणीकरण करता येते.

ही पद्धत सुरू केल्यापासून 2022-23 मध्ये 2.1 लाख निवृत्तीवेतनधारकांनी चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला,2023-24 या वर्षात त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 6.6 लाख झाली. ज्यातून असे दिसत आहे की एका वर्षात त्यामध्ये 200% वृद्धी झाली आहे. यामध्ये ही बाब देखील विचारात घेण्याजोगी आहे की 2023-24 मध्ये प्राप्त झालेल्या एकूण डीएलसीपैकी ही संख्या सुमारे 10% आहे. गेल्या आर्थिक वर्षात निवृत्तीवेतनधारकांकडून सुमारे 60 लाख डिजिटल जीवन प्रमाणपत्रे(डीएलसी) प्राप्त झाली होती.

चेहरा प्रमाणीकरण पद्धती वापरण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये आधार फेस आरडीआणि जीवन प्रमाणही दोन ऍप्लिकेशन्स इन्स्टॉल करायची असतात. या ऍप्लिकेशन्समध्ये आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकांद्वारे ऑपरेटर प्रमाणीकरण केले जाते. या ऍप्समध्ये चेहरा प्रमाणीकरण योग्य पद्धतीने व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन सुविधा असते. स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोबाईल स्क्रीनवर जीवन प्रमाण आयडी आणि पीपीओ क्रमांकासोबत डीएलसी सादरीकरणाची पुष्टी केली जाते आणि घरूनच सोयीस्कर पद्धतीने प्रक्रिया पूर्ण होते.

ईपीएस निवृत्तीवेतनधारकांसाठी या नावीन्यपूर्ण आणि सुविधाजनक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जुलै 2022 मध्ये  ईपीएफओ सॉफ्टवेअरमध्ये डीएलसी  समाविष्ट करण्यात आले. जानेवारी 2023 पासून ही प्रक्रिया निवृत्तीवेतनधारकांना केवळ फील्ड ऑफिसर्सकडूनच नव्हे  तर देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये  निधी आपके निकट कार्यक्रमांचे आयोजन करून त्यामध्येही सविस्तर समजावली जाते.या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ ईपीएफओ च्या @SOCIALEPFO या अधिकृत  यूट्युब हँडलवर उपलब्ध आहे.

ही सुविधाजनक पद्धती अधिकाधिक निवृत्तीवेतनधारकांचे आयुष्य सुकर करेल असा विश्वास ईपीएफओला वाटत आहे.

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023575) Visitor Counter : 65