वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आयपीईएफ स्वच्छ अर्थव्यवस्था गुंतवणूकदार मंचामध्ये भारतातल्या  संधींचे प्रदर्शन

Posted On: 07 JUN 2024 1:17PM by PIB Mumbai

 

इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्पॅरिटी (IPEF) अर्थात हिंद प्रशांत क्षेत्र समृद्धीसाठी आर्थिक आराखडा या उपक्रमाच्या क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम अर्थात स्वच्छ अर्थव्यवस्था गुंतवणूकदार मंचाच्या उद्घाटन  प्रसंगी, भारताच्या वाणिज्य आणि गुंतवणूक विभागाने भारतातील विविध गुंतवणुकीच्या संधी प्रदर्शित करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती.

वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणात भारताचा विकास दर इतर उदयोन्मुख बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थांपेक्षा जवळजवळ दुप्पट कसा आहे यावर भर दिला.  ही मजबूत वाढ 'रिव्हर्स फ्लिपिंग'च्या प्रवृत्तीकडे कशी नेत आहे यावर त्यांनी टिप्पणी केली. यावेळी त्यांनी, एकेकाळी भांडवलाची उपलब्धता आणि कर लाभासाठी परदेशात गेलेले भारतीय स्टार्ट-अप आता मायदेशी परतत आहेत, असे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह डिजिटल अर्थव्यवस्था आणि डेटा सेंटर्सचा उदय भविष्यातील भारतीय विकासासाठी कसा महत्त्वाचा आहे यावर त्यांनी भर दिला.

सिंगापूरमधील मरीना बे सँड्स येथे झालेल्या या बैठकीत अमेरिका, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि इतर देशांतील जागतिक गुंतवणूकदार तसेच भारताचे खाजगी क्षेत्र आणि सरकारी अधिकारी यांच्यासह 60 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.  या कार्यक्रमाने आयपीईएफ सदस्य देशांतील गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्थाना एकत्र आणले होते. भारतीय पायाभूत सुविधा आणि हवामान तंत्रज्ञान कंपन्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पर्याय प्रदर्शित केले आणि जागतिक बाजारपेठांमध्ये संधी शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांशी संवाद साधला.

यानंतर भारताच्या संधी सादरीकरणात इन्व्हेस्ट इंडियाने समृद्ध  स्टार्टअप प्रणाली, विविध उद्योगांमधील कुशल आणि प्रतिभावान व्यावसायिकांचा मोठा समूह, पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन, नियमन सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक सुधारणापारदर्शकता वाढवणे आणि व्यवसाय सुलभीकरण यासारख्या सुधारणांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे  विविध सरकारी उपक्रम आणि त्यातून भारतातील आगामी संधी प्रदर्शित  केल्या.

कार्यक्रमादरम्यान, उद्योगातील सदस्यांनी असे नमूद केले की आज उद्घाटन झालेला मंच हिंद प्रशांत क्षेत्रात आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उद्योगांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उद्योगांच्या वाढीसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.  या मंचाने स्वच्छ अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळीतील लवचिकतेचे महत्त्वपूर्ण स्वरूप देखील अधोरेखित केले.

आयपीईएफ आणि क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम बद्दल अधिक माहिती:

हिंद प्रशांत क्षेत्र समृद्धीसाठी आर्थिक आराखडा (IPEF) या उपक्रमाचा प्रारंभ मे 2022 मध्ये करण्यात आला.   सध्या यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई दारुसलाम, फिजी, भारत, इंडोनेशिया, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, अमेरिका, व्हिएतनाम या 14 भागीदारांचा समावेश आहे.  व्यापार, पुरवठा साखळी, स्वच्छ अर्थव्यवस्था आणि न्याय्य अर्थव्यवस्था या सहकार्याच्या चार स्तंभांचा समावेश असलेला उपक्रम, या प्रदेशातील देशांना लवचिक, शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी सहकार्य करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो तसेच हिंद प्रशांत क्षेत्रात समृद्धीसाठी सहकार्य, स्थिरता आणि स्थैर्य यासाठी योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करतो.

आयपीईएफ अंतर्गत उपक्रमांपैकी एक असलेला आयपीईएफ स्वच्छ अर्थव्यवस्था गुंतवणूकदार मंच हा शाश्वत पायाभूत सुविधा, हवामान तंत्रज्ञान आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक एकत्रित करण्यासाठी हिंद प्रशांत क्षेत्रातील शीर्ष गुंतवणूकदार, परोपकारी संस्था, वित्तीय संस्था, नवोन्मेषी कंपन्या, स्टार्ट-अप आणि उद्योजकांना एकत्र आणतो.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023508) Visitor Counter : 54