आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आभाच्या ‘स्कॅन अँड शेअर’ सेवेमार्फत देशभरातील बाह्य रूग्ण विभागांमध्ये तीन कोटी नागरिक नोंदणीकृत

Posted On: 06 JUN 2024 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांच्या ‘स्कॅन अँड शेअर’ सेवेमार्फत देशभरात बाह्य रूग्ण विभागांत तीन कोटीपेक्षा जास्त नागरिकांची नोंद करून घेत ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणा’ने आरोग्य सेवांच्या डिजिटलीकरणात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

आभावर आधारित ‘स्कॅन अँड शेअर’ सुविधेमुळे रुग्णांना बाह्य रूग्ण विभागात गेल्यावर क्यूआर कोड स्कॅन करून सहज नोंदणी करणे शक्य होते. नोंदणी करताच रुग्णाच्या आभा कार्डावरील माहितीचीही नोंद बाह्य रुग्ण विभागात होते.

ही स्कॅन अँड शेअर सुविधा सध्या देशातील 35 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 546 जिल्ह्यांमधील 5,435 आरोग्य सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. त्या मार्फत दररोज सरासरी 1.3 लाख व्यक्ती नोंदणी करून घेत आहेत, ही बाब या सुविधेची उपयुक्तता व लोकप्रियता अधोरेखित करते.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक 92.7 लाख वेळा नोंदणी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशात 53.7 लाख, कर्नाटकात 39.9 लाख आणि जम्मू कश्मिरमध्ये 37.1 लाख वेळा नोंदणी झाली आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या डॅशबोर्ड (https://dashboard.abdm.gov.in/abdm/) वर या सेवेच्या वापराबाबत आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामध्ये दिल्ली, भोपाळ, रायपूर आणि भुवनेश्वर इथल्य एम्स रुग्णालयांमध्ये लक्षणीय वापर झाल्याचे दिसून आले आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात 14.9 लाख वेळा नोंदणीसाठी स्कॅन अँड शेअर सुविधेचा वापर झाल्याचे दिसून आले. तसेच भोपाळ, प्रयागराज व रायपूर इथल्या रुग्णालयांमध्ये हा वापर अनुक्रमे 6.7 लाख, 5.1 लाख आणि 4.9 लाख वेळा परिणामकारकरित्या झाल्याची नोंद आहे. 

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023318) Visitor Counter : 66