सांस्कृतिक मंत्रालय

एनजीएमए "छत्रपती शिवाजी महाराज: महान राज्याभिषेकाचा 350 व्या वर्धापन दिनाचा उत्सव" या प्रदर्शनाचे करणार आयोजन

Posted On: 05 JUN 2024 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2024

 

आपल्या देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी, ‘छत्रपती शिवाजी महाराज: महान राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापन दिनाचा उत्सव’ हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. नवी दिल्लीतील जयपूर हाऊस येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) मध्ये गुरूवारी 6 जून 2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता या प्रदर्शनाची सुरुवात होत आहे. या अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्वाच्या उल्लेखनीय प्रवासाचा कालखंड अनुभवण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात येत आहे.

  

या प्रदर्शनात मांडण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची अद्वितीय आणि मंत्रमुग्ध करणारी चित्रे  दीपक गोरे यांच्या संग्रहातील आहेत. चित्रकार जहांगीर वजीफदार यांच्या कलादालनाचे व्यवस्थापन करण्याच्या अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या गोरे यांची या चित्रांबाबतची उत्कटता त्यांच्या 1996 मधील लंडन आणि पॅरिस संग्रहालयांच्या भेटीदरम्यान प्रज्वलित झाली.  युरोपियन तैलचित्रांच्या भव्यतेच्या अनुभूतीनंतर गोरे यांना एक प्रभावी, जनमानसाच्या मनात असलेला चित्रसंग्रह तयार करण्याची कल्पना सुचली.  अशा प्रकारे, शिवाजी महाराजांच्या आख्यायिकेला त्याचा अर्थपूर्ण कॅनव्हास सापडला. वर्ष 2000 मध्ये या प्रकल्पाचा श्रीगणेशा झाला.  श्रीकांत चौगुले आणि गौतम चौगुले या प्रख्यात पिता-पुत्र कलाकार जोडीसोबत भागीदारी करून गोरे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रवासाची सुरुवात केली. प्रख्यात इतिहासकार, पद्मविभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी या त्रयीची भेट होणे हा या प्रकल्पाचा एक निर्णायक क्षण ठरला.  छत्रपती शिवाजी महाराजांबाबत माहिती देण्याचा निर्विवाद अधिकार असलेले बाबासाहेब त्यांचे पथदर्शी दीप बनले. बाबासाहेबांनी वीरांच्या पोशाखापासून ते राजवाडे आणि किल्ल्यांच्या भव्यतेच्या प्रत्येक तपशीलात ऐतिहासिक अचूकतेची अत्यंत काळजीपूर्वक सुनिश्चिती केली. अनेक वर्षे चालत राहिलेल्या या संस्मरणीय कामाची फलनिष्पत्ती म्हणून  2016 मध्ये 115 उत्कृष्ट आणि चित्ताकर्षक चित्रांचा संग्रह तयार झाला. या संग्रहातील प्रत्येक चित्र गोरे यांच्या दूरदृष्टीचा, चौगुले जोडीच्या कलात्मक भव्यतेचा आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमूल्य ऐतिहासिक ज्ञानाचा पुरावा आहे.

प्रदर्शनाची सुरुवात एका निर्णायक दृश्याने होते: शिवाजी, जेमतेम चौदा वर्षांचा एक तरुण, आपले वडील शहाजी यांच्याकडून भगवा ध्वज (जरीपटका) स्विकारतो.  या प्रतिकात्मक कृतीतून स्वतंत्र मराठा राज्य, ‘स्वराज्य’ या स्वप्नाचा जन्म झाल्याचे दर्शवण्यात आले आहे. त्या नंतर हे कथानक मोठ्या लष्करी आणि नौदल घटनांच्या मालिकेतून पुढे वाटचाल करते. त्यांपैकी रायगड किल्ल्याला आपली राजधानी म्हणून निवडण्याची महाराजांची सामरिक अलौकिक बुद्धिमत्ता याला उल्लेखनीय महत्व आहे. 

एक दूरदर्शी शासक असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे एक चतुर प्रशासक होते. त्यांनी व्यापार आणि लोककल्याणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  महाराजांची परोपकारी वृत्ती, युरोपियन वर्चस्वाच्या विरोधात त्यांनी उचललेली पावले दर्शवणारी ही चित्रे महाराजांच्या बहुआयामी नेतृत्वाची झलक दाखवतात. याशिवाय या प्रदर्शनात एक समर्पित विभाग आहे जो आपल्याला शिवाजी महाराजांच्या समकालीन राज्यकर्त्यांचा परिचय करून देतो. या राज्यकर्त्यांनी हा कालखंड घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022948) Visitor Counter : 165


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi