संरक्षण मंत्रालय
नवी दिल्ली येथे एनसीसीच्या दोन दिवसीय ‘वार्षिक नीति संवाद शिबीराचे’ आयोजन
Posted On:
05 JUN 2024 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2024
नवी दिल्ली येथे 04-05 जून 2024 रोजी, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचे दोन दिवसीय 'वार्षिक नीति संवाद शिबिर' संपन्न झाले. देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विस्तार योजनेच्या प्रगतीचा आढावा घेणे हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी केले. देशभरातील राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयांचे प्रतिनिधीत्व करणारे अतिरिक्त महासंचालक आणि उपमहासंचालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सेवा वर्धित करण्यासाठी गेल्या वर्षभरात केलेल्या भरीव प्रयत्नांवर प्रकाश टाकला. राष्ट्र उभारणी, सामाजिक जागरुकता आणि समुदाय विकास कार्यक्रमांमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी संस्थात्मक प्रशिक्षण हे सर्व संचालनालयांचे आधारस्तंभ असण्याची गरज यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत देशाला ‘विकसित भारत’ बनविण्याच्या सरकारी धोरणांशी सुसंगती साधत युवा भारतीयांना प्रेरित करण्याच्या आणि त्यांना जबाबदार नागरिकांमध्ये रूपांतरित करण्याच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या अतुट वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
हे शिबिर नवी दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंड वरील डीजी एनसीसी कॅम्प मधील नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रताप कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. युद्धादरम्यान 13 सप्टेंबर 1965 रोजी गुरुदासपूर रेल्वे स्थानकावर अग्निशमन मोहीमे दरम्यान त्यांच्या शौर्य, कर्तव्य पूर्ती आणि निस्वार्थ निष्ठेसाठी अशोक चक्र वर्ग III ने सन्मानित करण्यात आललेल्या गुरुदासपूरच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या 10 व्या पंजाब बटालियनचे कॅडेट सार्जंट प्रताप सिंग यांच्या नावावरून या सभागृहाला नाव देण्यात आले आहे.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022856)
Visitor Counter : 370