माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पहिल्या डॉक (माहितीपट) फिल्म बाजार 2024 मध्ये एनफडीसी इंडियाकडून प्रथमच डॉक सह-निर्मिती बाजारप्रकल्पांसाठी निवड झालेल्या माहितीपटांची घोषणा


6 देशांच्या 15 प्रकल्पांमधून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधील विविधतेचे दर्शन

Posted On: 31 MAY 2024 6:39PM by PIB Mumbai

 

मुंबईत 16 ते 18 जून 2024 दरम्यान आयोजित होणाऱ्या डॉक सह-निर्मिती बाजारसाठी निवड झालेल्या माहितीपटांची पहिल्या डॉक फिल्म बाजारमध्ये अधिकृत घोषणा करण्यात आली.

डॉक फिल्म बाजारच्या पहिल्याच उद्घाटनाच्या आवृत्तीमध्ये  दक्षिण आशियायी परिदृश्यावर भर देत जागतिक दृष्टीकोन समोर मांडणाऱ्या माहितीपटांच्या सह-निर्मिती बाजाराचा एक भाग म्हणून डॉक फिल्म बाजार यावर्षी 15 प्रकल्प प्रदर्शित करत आहे. यामध्ये भारत, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स, रशिया, स्वित्झर्लंड आणि नेपाळ यांच्यासह विविध देशांमधील संस्कृती आणि प्रदेशांमधील परिस्थितीचे समृद्ध दर्शन या माहितीपटांच्या माध्यमातून घडवण्यात आले आहे. निवड झालेले चित्रपट निर्माते आपले हे प्रकल्प आंतरराष्ट्रीय आणि भारतीय निर्माते, वितरक, महोत्सव आयोजक, अर्थपुरवठादार आणि विक्री प्रतिनिधींसमोर एका खुल्या मंचावर सादर करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये पाहुणे आणि प्रतिनिधी यांच्यासोबत थेट संवाद साधण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.  

मिफ्फ आणि डॉक फिल्म बाजारचे महोत्सव संचालक, एनएफडीसीचे संयुक्त सचिव आणि एमडी म्हणाले, “डॉक फिल्म बाजारच्या सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या डॉक सह-निर्मिती बाजारकडून अतिशय काळजीपूर्वक निवड करण्यात आलेल्या  प्रकल्पांना निधी आणि पाठबळ पुरवले जाणार आहे. डॉक फिल्म बाजारमध्ये पहिल्या डॉक सह-निर्मिती बाजारसाठी आम्हाला 10 देशांमधून 27 भाषांमधील 62 संकल्पना प्राप्त झाल्या. चित्रपट उद्योगातील समितीच्या  सदस्यांनी अतिशय काळजीपूर्वक त्यांची छाननी केली आणि 15 प्रकल्पांची निवड केली. निवड झालेल्या निर्मात्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कलात्मक प्रवासाची यशस्वी सांगता करण्यासाठी योग्य सह-निर्माते भागीदार त्यांच्या प्रकल्पांची निवड करतील अशी आशा करतो.

सह-निर्मिती बाजार 2024 साठी निवड झालेले प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत

1 - अरावन कूथ-परफॉर्मन्स ऑफ लाईफ/भारत/इंग्रजी

निर्मातेः डॉ. अनुपमा के पी- अनुपमा के पी या सध्या कालिकत विद्यापीठात पत्रकारिता आणि जनसंप्रेषण विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी भारतातील हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील संप्रेषण विभागातून 2020मध्ये पीएचडी प्राप्त केली. तामिळनाडूमध्ये साजऱ्या होणाऱ्या अरावन उत्सवावर त्यांनी पीएचडी मिळवली आहे आणि या पीएचडीसाठी केलेल्या संशोधनातूनच हा माहितीपट तयार करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी सेकंड प्राईझ’(रंदम सम्मानम) नावाच्या मल्याळम् लघुपटाची देखील निर्मिती केली आहे.

दिग्दर्शकः श्रीराज राजीव एस- श्रीराज राजीव एस हे केरळस्थित लेखक आहेत आणि ते पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियामधील(एफटीआयआय) फीचर फिल्म स्क्रीनप्ले लेखन विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. केरळमध्ये 2018मध्ये आयोजित केलेल्या 11व्या आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि लघुपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आलेल्या रंदम सम्मानम/ सेकंड प्राईझचे लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आणि अनेक चित्रपट महोत्सवात हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे. पुण्यामधील एफटीआयआयमध्ये शिकत असताना 2017 मध्ये त्यांनी पटकथा लेखनासाठी इनलॅक्स फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवली. ख्रिस्टो टॉमी दिग्दर्शित आणि कोलकात्याच्या एसआरएफटीआयद्वारे निर्मित कामुकी/स्वीटहार्टया राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटासाठी त्यांनी सहलेखन देखील केले आहे. मल्याळम् भाषेतील एच अँड सी पब्लिकेशन या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेच्या 75 व्या वर्धापनदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून त्यांच्या मल्याळम् भाषेतील चिल्लुकन्नू(ग्लास आय)या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. मल्याळम् भाषेतील अग्रणी वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या इंडियाव्हीजन सॅटेलाईट कम्युनिकेशनसाठी प्रसारण पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

 

2 – भायचुंग- द स्टोरी ऑफ इंडियाज फूटबॉल लेजंड/भारत/अबोरिगीनल, इंग्रजी, हिंदी, नेपाळी

निर्मातेः अनादी आठले आणि आर्फी लांबा :अनादी आठले यांनी 2014 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियामधून फिल्म एडिटिंग या विषयाची पदवी मिळवली. हे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी ह्युमन ट्रेल पिक्चर्स या चित्रपट संस्थेसाठी चित्रपट निर्मिती सुरू केली.  नॉन फिक्शन आणि फिक्शन फिल्म्सच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग असून विविध स्वरूपे आणि परिस्थितीवरील भाष्य यांच्या माध्यमातून ते चित्रपट निर्मितीच्या माध्यमाचे अंतरंग उलगडून पाहत आहेत. त्यांनी निर्मिती केलेल्या मोर मन नके भरमया पहिल्या चित्रपटाने 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षकांचा विशेष पुरस्कार पटकावला होता. रलंग रोडहा त्यांचा दुसरा चित्रपट 52व्या कार्लोवी व्हेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेत प्रदर्शित करण्यात आला. द फर्स्ट फिल्महा त्यांची सहनिर्मिती असलेला लघुपट अलीकडेच कोलंबियामधील बोगोशॉर्ट्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. सध्या ते निर्माते आणि संकलक म्हणून विविध चित्रपटांवर काम करत आहेत.

आर्फी लांबा मुंबई आणि बर्लिनस्थित बॉम्बे बर्लिन फिल्म प्रॉडक्शन्स(BBFP) चे सहसंस्थापक आहेत. बीबीएफपीने 2011 मध्ये आपल्या प्रवासाची सुरुवात केली आणि त्यांनी आतापर्यंत तीन फीचर फिल्म्सची निर्मिती/सहनिर्मिती केली आहे, भारत आणि जर्मनीमधील युरोपीय टीव्ही वाहिन्यांसाठी निर्मिती केली आहे आणि काही लघुपट आणि जाहिरातींची निर्मिती केली आहे. त्यांच्या LOEV( टॅलीन ब्लॅक नाईट्स, एसएक्सएसडब्लू, बीएफआय फ्लेअर, नेटफ्लिक्स) या पहिल्या फीचरने नेटफ्लिक्ससोबत पाच वर्षांचा परवाना करार पूर्ण केला आहे. रोड टू मंडाले(व्हेनिस, टीआयएफएफ, बीएफआय, टोक्यो) ही मिडी झेडची त्यांची दुसरी फीचर फिल्म होती ज्यामध्ये ते जर्मन सह-निर्माते होते आणि 30 पेक्षा जास्त देशात ती प्रदर्शित करण्यात आली. त्यापुढील त्रिज्या( शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, टॅलिन ब्लॅक नाईट्स, 3 एएनटीए नामांकने, ध्वनिसंयोजनासाठी राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार) ही फिल्म अक्षय इंडीकरची पदार्पणाची फिल्म होती जी आता MUBI वर आहे.

 दिग्दर्शकः कर्मा टकापा- कर्मा टकापा पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे पदवीधर असून दिग्दर्शन आणि पटकथालेखन हे त्यांचे प्रमुख विषय होते. त्यांनी छत्तीसगडी भाषेतील मोर मन के भरम’(2015) या 17व्या मामी,2015 मध्ये विशेष परीक्षक पुरस्कार जिंकणाऱ्या फीचर फिल्मचे सह-दिग्दर्शन केले. त्यांचा रलंग रोड(2017) हा दिग्दर्शक म्हणून पदार्पणाचा असलेला चित्रपट चेक प्रजासत्ताकमधील 52व्या कार्लोवी व्हेरी आयएफएफ महोत्सवातील मुख्य स्पर्धेत प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर जगभरात अनेक महोत्सवात प्रदर्शित झाला. त्यापूर्वीच्या त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक लघुपट आणि माहितीपटांचा समावेश होता, ज्यामध्ये त्यांनी सिक्कीम राज्यातील त्यांच्या मूळ शहरासह विविध स्थानांचा शोध घेण्याचा आणि त्याविषयीचे कथन करण्याचा प्रयत्न केला आहे. सायनी गुप्ता आणि शुभम यांच्या भूमिका असलेला उपर नीचे हा त्यांचा आगामी चित्रपट निर्मितीपश्चात स्थितीत आहे. अमित कुमार दिग्दर्शित द लास्ट अवर या ऍमेझॉन प्राईमवरील मालिकेत त्यांनी अलीकडेच देव ही प्रमुख भूमिका साकारली. नेटफ्लिक्सवरील जाने जाँ(2023) या सुजॉय घोष दिग्दर्शित फिल्ममध्येही त्यांनी सुंदर हे पात्र साकारले आहे.

 

3 - भालू आ गये/भारत/छत्तीसगडी, इंग्रजी, हिंदी

निर्मातेः अगस्त्य भाटिया- अगस्त्य गेल्या आठ वर्षांपासून भारतात मुंबईत निर्माते म्हणून काम करत आहेत. विविध निर्मितीगृहांसोबत त्यांनी विविध प्रकल्पांच्या संकल्पना आणि निर्मितीचे काम केले आहे. एक स्वतंत्र निर्माते म्हणून त्यांच्या अनुभवामुळे त्यांच्यात एखाद्या प्रकल्पाच्या प्रारंभापासून त्याच्या पूर्णत्वापर्यंतच्या व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान निर्माण झाले आहे. आशयाच्या वेगवेगळ्या भागांची जोडणी कशी करायची आणि टीमचे व्यवस्थापन आणि विकास कसा करायचा याचे सखोल आकलन त्यांना झाले आहे. यामुळे मेटा, व्हाईस मीडिया, गुगल, व्हायकॉम 18, काँड नास्ट ट्रॅव्हलर, लॉरियल इ. सारख्या जागतिक कंपन्यांसोबत सहकार्य प्रस्थापित होऊ लागले आहे. एखाद्या भागातील संवाद आणि धोरणांवर थेट परिणाम करू शकणाऱ्या नॉन-फिक्शन कथानकाची निर्मिती करण्याची त्यांना अतिशय आवड आहे. त्यामुळेच जम्मू आणि काश्मीरमध्ये युवा वर्गाला हिंसक मूलतत्ववादी कारवायांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी कथाकथन, पुनर्वसन आणि समुदायांदरम्यान संवाद यांच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शांतता निर्मितीचे प्रयत्न करणाऱ्या यकजाहनावाच्या संघटनेसोबत गेल्या 10 वर्षांपासून भागीदारी प्रस्थापित झाली आहे.

दिग्दर्शकः नमन सरैय्या- संस्कृती आणि ओळख यांच्यामधील परस्परसंबंधांचा शोध घेणाऱ्या सरैय्या यांच्या कामाचा संगीत, लिंग, मानसिक आरोग्य, राजकारण, जात आणि वर्ग, तंत्रज्ञान आणि खाद्यपदार्थ अशा विविध क्षेत्रात संचार आहे. क्या बोलता बंताईया भारतातील गल्ली रॅपच्या उदयाचा मागोवा घेणाऱ्या आणि व्हाईस वर्ल्ड न्यूजसाठी आशियाभरात प्रसारित होणाऱ्या, भारतातील बंदूक संस्कृतीचा शोध घेणाऱ्या  पॉइंट ब्लँक नावाच्या एका मालिकेचे  ते दिग्दर्शक आहेत. अलीकडेच नमन यांनी स्वामी नित्यानंदच्या गुन्ह्यांच्या तपासावर आधारित माय डॉटर जॉइन्ड ए कल्ट फॉर डिस्कव्हरीया 3 भागांच्या पुरस्कारविजेत्या माहितीपटाच्या मालिकेचे दिग्दर्शन केले. नमन यांचे माहितीपट आणि छायाचित्रणाच्या कामांचे भारतभरात आणि जगभरात विविध चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शन करण्यात आले आहे. धिस इज अ फोटो डंपहे त्यांचे अगदी अलीकडे निकिता राणा यांच्यासोबत केलेले काम मुंबई अर्बन आर्ट फेस्टिव्हल 2022-23 साठी स्टार्ट इंडिया फाउंडेशनने प्रदर्शित केले होते. एक निर्माता म्हणून त्यांनी पदार्पणात तयार केलेल्या गुडबाय, हॅलोचे जगभरात अनेक चित्रपट महोत्सवात प्रदर्शन करण्यात आले आहे आणि त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत, तसेच मामी 2023 मध्ये त्याचा आशिया प्रिमियर करण्यात आला होता.

 

4 - हिमालय की पीठ पर/ भारत/ गढवाली, हिंदी, कुमाओनी

दिग्दर्शक आणि निर्मातेः अरुण फुलारा- अरुण फुलारा हे भारतातील मुंबईस्थित लेखक आणि चित्रपटनिर्माते आहेत. त्यांच्या संडे(2020), माय मदर्स गर्लफ्रेंड(2021) आणि शेरा(2022) या लघुपटांनी जगभरात अनेक महोत्सवात प्रवास केला आहे आणि 2020 मध्ये कशिश एमआयक्यूएफएफ, 2021 मध्ये रिलिंगः द शिकागो एलजीबीटीक्यू+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2021 मध्ये केरळमधील आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि लघुपट महोत्सव यांसह अनेक पुरस्कार मिळवले आहेत. सध्या ते माय होम इज इन द हिल्सया उत्तर भारतीय हिमालयातील  गावातील नाट्य आणि स्थलांतरासंदर्भातील जादुई वास्तव असलेल्या आपल्या पदार्पणाच्या फीचर फिल्मवर काम करत आहेत. हिमालयातील एका दुर्गम गावात कडाक्याच्या हिवाळ्याला तोंड देत आपल्या फळबागेची देखभाल करणाऱ्या एका वृद्ध दांपत्याविषयीचा त्यांचा वॉल्डेन हा माहितीपट सध्या निर्मिती-पश्चात स्थितीत आहे. नामवंत चित्रपट निर्माते देवाशिष मखीजा यांना त्यांनी यापूर्वी आज्जी अँड भोसले यांसारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांसाठी सहाय्य केले आहे, जे चित्रपट बुसान, रॉटरडॅम, टॅलीन आणि गोथेनबर्ग येथील महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले होते.

 

5 - कलरी | भारत, स्वित्झर्लंड | मल्याळम्

निर्मातेः एस्थर व्हॅन मेसेल- 1965 मध्ये व्हिएन्ना येथे जन्म झालेल्या आणि स्वित्झर्लंडमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एस्थर व्हॅन मेसेल यांनी तेल अवीव विद्यापीठात चित्रपट आणि टीव्ही आणि इतिहासाचा अभ्यास केला. 1990 मध्ये त्या वॉर्नर ब्रदर्स इस्रायल वितरण कंपनीमध्ये दाखल झाल्या आणि लवकरच त्यांनी व्यवस्थापनाच्या पदाची जबाबदारी स्वीकारली. 1998 मध्ये त्यांनी झुरिक येथे आणि 1999 मध्ये बर्लिन येथे फर्स्ट हँड फिल्म्सची स्थापना केली. जगभरातून काळजीपूर्वक निवड केलेल्या 150 चित्रपटांचे आणि 200 निर्मात्यांचे प्रतिनिधीत्व ही जागतिक विक्री कंपनी करत आहे. ही कंपनी 2013 पासून स्विस चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांचे वितरण करत आहे आणि 2018 पासून निर्माता म्हणूनही काम केले आहे. एस्थर व्हॅन मेसेल या नियमितपणे कार्यशाळांमध्ये शिकवतात, कार्यक्रम आयोजित करतात आणि परीक्षक आणि जागतिक स्तरावर एक निर्णयकर्त्या म्हणून काम करतात. त्यांनी ओएफआयच्या मूल्यमापन समितीवर तीन वर्षे आणि बीएकेच्या समितीवर चार वर्षे काम केले आहे आणि 2023 च्या युरोपीय चित्रपट पुरस्कारासाठी परीक्षक होत्या ज्यामध्ये त्या नियुक्त सदस्य आहेत. 

दिग्दर्शकः सतींदर सिंग बेदी आणि मारिया कौर 

भारतात जन्म झालेले सतींदर सिंग बेदी हे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. जानेवारी 2022 पासून ते स्वित्झर्लंड आणि भारतादरम्यान ये जा करत असतात. आर्थिक क्षेत्रात काम केल्यावर ते 2008 मध्ये चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळले. त्यांनी 2015 मध्ये त्यांचे प्रशिक्षण पुण्याच्या नामवंत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियामधून पूर्ण केले आहे. त्यांची मध्यम लांबीची कामाक्षी ही फिल्म पहिल्यांदा बर्लिनेल येथे प्रदर्शित करण्यात आली आणि त्यानंतर जगभरात सुमारे 40 महोत्सवात प्रदर्शित करण्यात आली आणि तिने 20 पुरस्कार पटकावले. 2016 मध्ये क्योटो फिल्ममेकर्स लॅब आणि 2019 मध्ये झुरिक फिल्म फेस्टीव्हल मास्टर क्लासमध्ये सहभागी झाले. मारिया कौर बेदी यांच्यासोबत त्यांनी 2022 मध्ये द कर्स या काव्यात्मक माहितीपटाचे चित्रिकरण केले, ज्याचे प्रिक्स डे सोलेऊर आणि जर्मन कॅमेरा अवॉर्डसाठी नामांकन झाले आणि 2023 मध्ये कलात्मक संकल्पनेसाठी या माहितीपटाला झुरिक फिल्म पुरस्कार मिळाला

मारिया कौर बेदी(पूर्वाश्रमीच्या मारिया सिगरिस्ट) या एक स्विस चित्रपट दिग्दर्शक आहेत आणि प्रेरणादायी नायिकांच्या चित्रपट प्रकल्पांवर त्यांचा भर असतो. झुरिक युनिव्हर्सिटी ऑफ द आर्टस् आणि ऱ्होडे आयलंड स्कूल ऑफ डिझाईन(यूएसए) येथे चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केल्यावर त्यांनी या क्षेत्रातील सुसान बॅटसन, स्लावोमीर इदझियाक आणि ज्युडी वेस्टन यांसारख्या ज्येष्ठ मान्यवरांसोबत कार्यशाळांच्या माध्यमातून आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले. मारिया कौर बेदी यांनी स्वित्झर्लंड, जर्मनी, पोलंड आणि अमेरिकेत काम केले आहे आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात गुडबाय बॉयफ्रेंड, गर्ल अँड बॉय ऑन द रॉक्स आणि बेट्रिक्स यांसारख्या लघुपटांद्वारे यश मिळवले आहे. त्यांच्या अतिशय प्रशंसा झालेल्या डाय एन्झिगेन या टेलिफिल्मचे एसआरएफ2 वर अनेकदा प्रमुख वेळेत प्रसारण करण्यात आले. व्यसन आणि प्रेम याविषयीच्या द कर्स या काव्यात्मक सिनेमा माहितीपटाचे प्रिक्स डे सोलेऊर आणि जर्मन कॅमेरा अवॉर्डसाठी नामांकन झाले आणि 2023 मध्ये कलात्मक संकल्पनेसाठी या माहितीपटाला झुरिक फिल्म पुरस्कार मिळाला.

 

6 – लाम हुडाँग( ऍनिमेशन) | भारत | मणिपुरी

निर्मातेः कोंगब्रेलात्पम यसोबंता शर्मा- कोंगब्रेलात्पम यसोबंता शर्मा हे मणीपूरमधील इंफाळचे असून ध्वनी रचना, चित्रपट संकलन, छायालेखन, दिग्दर्शन आणि पटकथालेखन यामध्ये तरबेज असलेले बहुआयामी चित्रपट निर्माते आहेत. जनसंप्रेषण आणि पत्रकारितेचा पाया असलेल्या शर्मा यांनी त्यांचे कौशल्य सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमध्ये आणखी विकसित केले. यसोबंता यांच्या परिचयामध्ये जो भी हो सो होआणि कम्युनिटी ऑन व्हीलयांसारख्या नावाजलेल्या कलाकृतींचा समावेश असून त्यामधून त्यांच्या कथाकथनाच्या वैविध्यपूर्ण क्षमतेचे दर्शन घडते. उल्लेखनीय बाब म्हणजे निनाचिल्लकलीलया त्यांच्या मल्याळम लघुपटाला मुंबई शॉर्ट्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विजेतेपद मिळाले होते.त्याशिवाय यसोबंता यांचा ब्लो ब्रिसास मीडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडसोबत सह-निर्मिती असलेली एनएफडीसीने निधी दिलेली शॉर्ट ऍनिमेशन फिल्म या एप्रिलमध्ये पूर्णत्वाच्या स्तराजवळ पोहोचली आहे. आपली सृजनशीलता आणि उद्यमशीलता यांच्या माध्यमातून यसोबंता भारतीय चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवत असून आपल्या प्रभावी कथाकथनाद्वारे बदल आणि एकतेची प्रेरणा देत आहेत.

दिग्दर्शकः त्रिशूल युमनाम- मणिपूरमधील इंफाळचे असलेले त्रिशूल युमनाम ऍनिमेशन, दिग्दर्शन आणि पटकथालेखन यामधील प्रावीण्य असलेले चित्रपट निर्माते असून त्यांना ग्राफिक डिझाईन आणि थ्रीडी ऍनिमेशनचे अतिरिक्त ज्ञान आहे. शिलाँगमधील द इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी मिळवली आणि सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्युटमधून शिक्षण घेत आपले कौशल्य आणखी वाढवले. बालपणातील कथा आणि व्हिडीओ गेम्स यामुळे त्यांना कथाकथनात जास्त रुची निर्माण झाली.  सध्या ते एनएफडीसीच्या निर्मिती अंतर्गत एका लघु ऍनिमेशन फिल्मचे दिग्दर्शन करत आहेत आणि  अजूनही आणखी जास्त फिल्म्ससाठी विषय आणि कथांवर काम करत आहेत. एनएफडीसीने अलीकडेच आयोजित केलेल्या थ्रीडी ऍनिमेशन प्रशिक्षण कार्यशाळेतील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ईशान्येकडील विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश होता आणि त्यांनी एमएएसी राजौरी दिल्ली च्या मार्गदर्शनाखाली अनेक स्टुडंट ऑफ द मन्थपुरस्कार मिळवले. एक चित्रपटनिर्माता आणि कथाकथनकार म्हणून प्रत्यक्ष जीवनातील नव्या आणि मूळ कथा लोकांना सांगण्याची त्यांची इच्छा असते आणि उपलब्ध असलेल्या कोणत्याही आधुनिक माध्यमाचा आणि प्रकाराचा वापर करायची त्यांची तयारी असते.  

 

7 -लिजेंड ऑफ अब्बाक्का  | भारत | इंग्रजी, कन्नड

निर्माती : सतावेशा बोस - सतावेशा बोस एक लेखिका-दिग्दर्शिका -निर्माती आहे जी कथाकथन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशमधील आपल्या  कौशल्याचा वापर करून  प्रभावी आणि अर्थपूर्ण कथा जिवंत बनवते आणि विविध शैलींमध्ये महिलांना होणारा विरोध नव्या पद्धतीने मांडते.  रेड आइस फिल्म्स, रायझिंग सन फिल्म्स, फिल्म फिलॉसॉफी आणि व्हायब्रंट वर्क्स मधून व्यापक अनुभव घेतल्यानंतर  सतावेशा बोस यांनी कोका कोला, ह्युंदाई, युनिलिव्हर, सॅमसंग, डोमिनोज पिझ्झा, कॅडबरी, मॅरिको, डाबर , मेट्रो शूज, टाटा स्टील, आयबीएम लंडन, एमटीव्ही  आणि व्हायकोम  वगैरेंसाठी असंख्य जाहिराती, कॉर्पोरेट फिल्म  आणि संगीत व्हिडिओ यशस्वीपणे  तयार केले आहेत.मोहन नादार यांनी गेल्या 6 वर्षांत TPHQ (द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लिमिटेड) सह लंडन, आशिया आणि युरोपमधील कार्यालयांबरोबर  50 चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोठी  कमाई करणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यापासून, मोहन नादार यांनी  मुख्य प्रवाहातील सिनेमांवर प्रभाव टाकला आहे, ब्लॉकबस्टरचे प्रदर्शन आणि वितरण केले आहे आणि स्वतंत्र आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची स्वतःची श्रेणी तयार केली आहे. त्यांचा नवीन प्रकल्प 'लायनेस' हा द्विपक्षीय करारांतर्गत केलेला पहिला अधिकृत भारत-ब्रिटन सह-निर्मिती आहे.

दिग्दर्शक : सायरस खंबाटा - सायरस मुंबईचे आहेत. त्यांनी आर.ए. पोद्दार महाविद्यालयातून बीकॉम केले आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता येथून दिग्दर्शन आणि पटकथा लेखनात उच्च शिक्षण घेतले. फिल्म स्कूलपूर्वी, त्यांनी झी सिनेमासाठी काम केले , जिथे त्यांनी 200 हून अधिक प्रोमोजचे संकलन केले. त्यांच्या  चुंग पाओ चायनीज चिली सॉस या लघुपटाची  बर्लिन टॅलेंट कॅम्पस मध्ये निवड झाली आणि मिफ्फ मध्ये प्रदर्शित झाला. त्यांनी पीएसबीटी प्रायोजित म्हैसूर मल्लिगे आणि कोका कोला अनुदानित जल प्रकल्प यांसारख्या माहितीपटांसाठी एकत्र काम केले आहे. त्यांनी सागर बल्लारी आणि रजत कपूर या दिग्दर्शकांसोबत, भेजा फ्राय, कच्चा लिंबू आणि मिथ्या या चित्रपटांसाठी काम केले आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'यहाँ सबकी लगी है' या चित्रपटाचे त्यांनी सह-लेखन, सह-दिग्दर्शन, सह-निर्मिती आणि संकलन  केले आहे. व्हायब्रंट वर्क्समध्ये, वायाकॉम, पार्ले, पिडिलाइट, कॅडबरीज , कोका कोला , हार्पर कॉलिन्स , रेमंड समूह , टाटा विस्तारा , नल्ली, हार्पर- कॉलिन्स आणि ओ अँड एम , बीबीडीओ , कोका कोला  आणि एचएक्यु होल्डिंग्स सारख्या क्लायंटसाठी त्यांनी अनेक चित्रपटांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात  महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

 

8 - ल्हासा मा सून छा  | भारत, नेपाळ, इंग्रजी, नेपाळी, तिबेटी

निर्माते : सुरभी दिवाण आणि जस्मिन लवली जॉर्ज

सुरभी दिवाण या एक स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शिका, लेखिका आणि निर्मात्या आहेत. त्यांचे चित्रपट सामाजिक-राजकीय संघर्ष, विस्थापन, स्मृती आणि अस्तित्व  यांच्यातील संबंध  शोधतात. त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये अ थिन वॉल (65 मिनिटे, डॉक, 2015), डॉटर ऑफ नेपाळ (34 मि. , डॉक, 2018) आणि ट्रान्स काश्मीर (62 मि, डॉक, 2022) यांचा समावेश आहे. सुरभीने आपल्या  नवी दिल्लीस्थित  पेंटेड ट्री पिक्चर्स या निर्मिती कंपनीसह पुरस्कारप्राप्त सामाजिक आणि व्यावसायिक ऑडिओ-व्हिज्युअल आशय  निर्मिती देखील केली आहे. व्हिडीओ कन्सोर्टियम, नवी दिल्ली चॅप्टर च्या त्या  आयोजक सदस्य आहेत .  त्या बिचित्रा कलेक्टिव्ह आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वुमन इन रेडिओ अँड टेलिव्हिजन, इंडिया चॅप्टरच्या सदस्या आहेत. सुरभी यांनी  न्यूयॉर्कच्या रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून चित्रपटांमध्ये एमएफए पदवी प्राप्त केली आणि दिल्ली विद्यापीठाच्या डी श्री राम महाविद्यालयातून  राज्यशास्त्रात बीए पदवी प्राप्त केली.

जस्मिन लवली जॉर्ज यांचा स्त्रीवादी दृष्टिकोन असूनदक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी  हिडन पॉकेट्स कलेक्टिव्ह या एनजीओची  स्थापना केली जी पुनरुत्पादक आणि समान तंत्रज्ञान यावर  केंद्रित आहे. त्यांना ग्लोबल साऊथ मधील सामाजिक चळवळींसाठी निधी उभारायचा आहे आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करायची इच्छा आहे.

 

9 -  म्युझिक फ्रॉम द रुफ ऑफ द वर्ल्ड/ भारत, ब्रिटन , अमेरिका / इंग्रजी, हिंदी, नेपाळी, तिबेटी

दिग्दर्शक आणि निर्माती : प्राची होता - प्राची होता हिने  लंडन फिल्म स्कूल (LFS) मधून अलिकडेच पदवी मिळवली आहे. इथे तिने ऑस्कर आणि बाफ्टा विजेत्या चित्रपट दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती, माहितीपट दिग्दर्शन, ध्वनी रेकॉर्डिंग आणि संकलन यात विशेष प्राविण्य मिळवले आहे. लंडन फिल्म स्कूल मधून पदवी मिळवल्यानंतर तिने ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने अनेक ब्रिटीश स्टार्टअप्ससाठी जाहिरातींची निर्मिती केली आहे, क्रीडा आणि चित्रपट महोत्सव आयोजित केले आहेत तसेच  इटली, चेक प्रजासत्ताक, फ्रान्स,ब्रिटन आणि भारतात चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिचा ग्रॅज्युएशन चित्रपट  पास्ट इम्परफेक्ट हा रिचर्ड टोसे  या पुरस्कार विजेत्या ब्रिटिश चित्रकारावरचा लघुपट आहे , ज्याने आपल्या अत्यंत क्लेशकारक बालपणाच्या वेदना कमी करण्यासाठी आपल्या कलेचा उपयोग केला. अलिकडेच ब्रिटीश चित्रपट उद्योगातील सदस्यांसाठी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये तो दाखवण्यात आला.

 

10 -  रोमान्सिंग द डान्स/ भारत, रशिया/ इंग्रजी, रशियन

निर्मातेः अनास्तासिया व्होस्क्रेसेन्स्काया- निर्मिती  आणि जाहिरात प्रसिद्धी क्षेत्रात   20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून चित्रपट उद्योगात पीआर विशेषज्ञ म्हणून गेली  5 वर्षे काम करत आहेत. 20 पेक्षा जास्त प्रकल्पांचे आयोजन, ज्यात "होली आर्किपेलागो" (2023), "सेलेस्टियल तवरिदा" (2022), तरुण सर्जनशील व्यावसायिकांसाठी डॉक्युमेंटरी स्क्रीन फेस्टिव्हल (2020) सारख्या  चित्रपटांच्या राष्ट्रीय वितरणासाठी उत्पादन आणि पीआर सहाय्य , मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (2022, 2020), इंडियन फिल्म बाजार (2023) यासह प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि रशियन चित्रपट महोत्सवांमध्ये  टू कॅप्टन फिल्म कंपनीच्या सहभागासाठी पीआर सहाय्य केले आहे . या कामाची फलश्रुती यशस्वी कामगिरीत झाली , परिणामी थिएटर्समध्ये माहितीपटांचे यशस्वी प्रदर्शन , 3,500 हून अधिक बातम्या, टीव्ही अहवाल आणि मुलाखती , तसेच आघाडीच्या चित्रपट समीक्षकांनी आणि चित्रपट तज्ञांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली.   सोशल नेटवर्क्सवर या प्रकल्पाना व्यापक प्रसिद्धीही मिळाली.

दिग्दर्शक: सर्गेई देबिझेव्ह - पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शक , पटकथा लेखक आणि सोशल इन्फ्लुएन्झर आहेत.  जागतिक प्रेक्षकांसाठी अर्थपूर्ण आशयासह  विलक्षण भावनिक प्रभावाची काव्यात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या चित्रपटशैलीचा नवोन्मेषक आहे. देबिझेव्ह हे रशियाच्या सर्वात सक्षम माहितीपट दिग्दर्शकांपैकी एक म्हणून सिनेजगतात प्रसिद्ध आहेत. त्यांनी आधुनिक काळातील प्रमुख समस्यांवर 30 हून अधिक चित्रपट आणि माहितीपटांचे  दिग्दर्शन केले आहे. यापैकी अनेक चित्रपटांना प्रतिष्ठित देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे पुरस्कार आणि प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींच्या यादीत असलेल्या सेलेस्टियल तवरिदा चित्रपटाला 27 व्या शांघाय टीव्ही फेस्टिव्हल मॅग्नोलिया पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट तसेच 11व्या चायना अकादमी माहितीपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट संकलनासाठी नामांकन मिळाले आहे.

 

11 -  द व्हॅली ऑफ हेल्थ/भारत/ इंग्रजी, राजस्थानी, तामिळ

दिग्दर्शक आणि निर्मातेः शंकर नारायणन् कृष्णन्

शंकर नारायणन हे एक माजी कॉर्पोरेट व्यावसायिक आहेत ज्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आणि कदाचित आयुष्यातील एक चतुर्थांश काळ काम केल्यानंतर चित्रपट निर्मितीत उतरले.  आपल्या पत्नीच्या पाठिंब्याने प्रोत्साहित होऊन, त्यांनी  आपली  चित्रपट निर्मितीची स्वप्ने साकार करण्याचा प्रवास सुरू केला. या प्रवासात उल्लेखनीय हिंदी आणि मल्याळम चित्रपटांसाठी प्रख्यात चित्रपट निर्मात्यांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तसेच मधुमिता, देवेन मुंजाल आणि अजय गोविंद यांच्यासारख्या प्रख्यात दिग्दर्शकांसोबत एकत्र काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. त्याचबरोबर, पटकथा लेखक म्हणूनही ते मोठ्या प्रमाणावर काम करतात. याआधी  लघुपट दिग्दर्शित करण्याचा त्यांना अनुभव आहे आणि सध्या ते पहिल्या व्यावसायिक चित्रपटावर काम करत आहेत .

 

12 -  थ्रू अ ब्रोकन ग्लास/भारत/इंग्रजी

दिग्दर्शक आणि निर्मातेः मधू महांकाली

मधु महांकाली हे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथील  पदवीधर असून  त्यांनी सिनेमॅटोग्राफीमध्ये डिप्लोमा घेतला आहे. मधु यांनी विविध भारतीय भाषांमधील 15 चित्रपटांसाठी छायाचित्रण संकलक  म्हणून काम केले आहे. 'द जर्नी' या लघुपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहेज्याने 2007 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भाग घेतला होताकान मधील शॉर्ट फिल्म  कॉर्नर, हैदराबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि फेस्टिव्हल डू सिनेमा डी पॅरिस मध्ये विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला होता. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'परंपरा ' (रेजिम) चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केले , जो अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आणि 2014 मध्ये इंडोनेशियाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटाने प्लॅटिनम पुरस्कार जिंकला. 'सोलिट्युड' नावाचा  चित्रपट 2016 मध्ये हाँगकाँग आशिया फिल्म फायनान्स फोरमसाठी  (HAF-2016) निवडला गेला ,ज्यात मधु यांनी  निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही सहभागी झाले.

 

13 -  ट्रॅप्ड/भारत/ इंग्रजी, हिंदी

निर्मातेः आर्या मेनन

आर्या ही मुंबईत राहणारी निर्माती आहे, जी हार्दिक मेहताच्या 'फेमस इन अहमदाबाद' या माहितीपटासाठी ओळखली जाते , ज्याने 2015 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार (भारत) मध्ये सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म म्हणून पुरस्कार पटकावला होता. भारतातील पहिला नेटफ्लिक्स शो 'सेक्रेड गेम्स' S01 आणि S02 आणि 'Decoupled' S01 ची ती मालिका  निर्माती होती. 'AK vs AK' या चित्रपटासाठी तिने  दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांची  सहाय्यक म्हणून काम केले होते  आणि 'कंट्रोल' (2024) या अद्याप रिलीज न झालेल्या चित्रपटाची ती निर्माती आहे. तसेच उपमन्यू भट्टाचार्य आणि कल्प संघवी यांचा  'वेड' हा  हवामान बदलावरील ॲनिमेटेड लघुपट, मंजरी माकिजनी (अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट - डायरेक्टर्स वर्कशॉप फॉर वुमन) यांचा  'आय सी यू' या लघुपटासाठीही तिने काम केले आहे.

दिग्दर्शक : अजितेश शर्मा - पारंपरिक चौकट  ओलांडत अजितेश "होमस्पन" या माहितीपटाच्या  दिग्दर्शनाकडे वळले . फेसबुकवरील या मालिकेने मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवली. या माहितीपट मालिकेत  उत्तराखंडच्या कुशल कारागिरांचे जीवन , त्या प्रदेशाची सांस्कृतिक झालर  चित्रित केली आहे.   गुगल आर्टस् अँड म्युझिअमने त्याची दखल घेतली आहे. "डब्ल्यूओएमबी - वूमन ऑफ माय बिलियन" या समीक्षकांनी गौरवलेल्या माहितीपटाद्वारे त्यांचे दिग्दर्शनाचे कौशल्य झळाळत  आहे. भारतातील महिलांविरोधातील हिंसाचाराच्या व्यापक समस्येला सामोरे जाण्याचे  आणि ती समजून घेण्याच्या उद्देशाने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एका महिलेने चालत केलेला प्रवास यात दाखवला आहे. ऑडेशियस ओरिजिनल्स  आणि प्रियांका चोप्रा जोनास द्वारे निर्मित, WOMB लवकरच अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित होणार आहे. अजितेश यांनी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसाठी उत्तराखंडच्या मंदिरांवरील  "डिव्हाईन ट्रेल्स" नावाचा एक माहितीपटही दिग्दर्शित केला आहे. आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2023 मध्ये नामांकन प्राप्त हा मार्मिक माहितीपट, आकर्षक कथा पडद्यावर जिवंत करण्याच्या त्याच्या क्षमतेचे दर्शन घडवतो.

 

14 -  अंब्रेलाज ऑफ द ऍक्रोबॅट्स/ भारत, अमेरिका / तामिळ

निर्मातेः सौनक सूर- SRFTI चा  माजी विद्यार्थी असून चित्रपट निर्मितीमध्ये त्याची  वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी आहे.  स्वतंत्रपणे  चित्रपट, जाहिरातपट  आणि माहितीपट कार्यक्रमांच्या निर्मितीचा त्याला अनुभव आहे.  रेजिंग फिल्म्समध्ये निर्माता म्हणून, तो सध्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी असलेल्या तीन भव्य चित्रपटांची सहनिर्मिती करत आहे.

दिग्दर्शक: मुकेश सुब्रमण्यम - चेन्नई, भारत येथे स्थित पोटॅटो ईटर्स कलेक्टिव्हचे सह-संस्थापक मुकेश सुब्रमण्यम हे  एक स्वतंत्र चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. सध्या, मुकेश 'अम्ब्रेलाज ऑफ द एक्रोबॅट्स' नावाचा त्याचा पहिला माहितीपट बनवण्याच्या प्रक्रियेत आहे, जो निर्मितीच्या टप्प्यात आहे. अलिकडेच 2024 DocEdgeKolkata Asian Forum for Documentary मध्ये या माहितीपटाचे खूप कौतुक झाले. नवोदित निर्माता म्हणून प्रतिष्ठित DocEdge Lumiere Award आणि ढाका डॉकलॅब अवॉर्ड त्याने पटकावला आहे.  याव्यतिरिक्त,  '23 मध्ये Let'sdoc फेलोशिप प्रोग्रामसाठी या माहितीपटाच्या निवड झाली आहे.  चेन्नई बुक फेअर, 2023 मध्ये आर्थर सी. क्लार्क यांच्या वैज्ञानिक लघुकथेवर आधारित त्याने केलेला अनुवाद प्रकाशित झाला आहे.  वन्ननिलावनच्या प्रसिद्ध तमिळ आधुनिक क्लासिक कादंबरी 'कादलपुराथिल' चे रुपांतर असलेली त्याची पहिली पटकथा 'फिलोमी',  2021 मध्ये एनएफडीसी सह-निर्मिती बाजार साठी  निवडण्यात आली होती .

 

15 -  व्हिस्पर्स ऑफ द डेझर्ट विंड/भारत/ हिंदी

निर्माती - कविता बहल: कविता - एक बहुविध पुरस्कार विजेती स्वतंत्र निर्माती असून  2022 मध्ये प्रतिष्ठित 'चिकन अँड एग अवॉर्ड' (अमेरिका ) साठी नामांकन

मिळाले होते.  भारतातील प्रमुख दैनिक वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेस मधील 6 वर्षांचा कार्यकाळ आणि  बंडखोरीग्रस्त ईशान्य भारतातील दोन वर्षांचे वृत्तांकन  यामुळे तिला वेगळ्या नजरेतून बघायला मदत झाली. 1996 मध्ये, तिने नंदन सक्सेना यांच्यासोबत टॉप क्वार्क फिल्म्सची सह-स्थापना केली. त्यांचे चित्रपट हा तळागाळातील लोकांच्या जीवनाचे समृद्ध चित्रण आहेत. दुर्दम्य परिस्थितीच्या भोवऱ्यात अडकलेल्या लोकांच्या भावनांचे दर्शन घडवणाऱ्या  चित्रपटांच्या त्रयींसाठी कविताला तीनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. कविताने अनेक चित्रपटांसाठी  संशोधनदिग्दर्शन आणि  निर्माती म्हणून काम पाहिले आहे.  इफ्फी - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळावर  दोनदा आणि  ट्रेंटो फिल्म फेस्टिव्हल - इटलीमध्ये एकदा तिने ज्युरी म्हणून काम पाहिले आहे.  ती एक TEDx स्पीकर देखील आहे. कौशल्य सामायिकरणाची आवड असलेल्या, कविता आणि नंदन यांनी 2007 मध्ये 'क्वार्क वर्कशॉप ' स्थापन केले.

दिग्दर्शक: नंदन सक्सेना - नंदन सक्सेना हा एक पुरस्कार विजेता स्वतंत्र चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक असून त्याने 40 हून अधिक चित्रपट केले आहेत. इतर पुरस्कारांव्यतिरिक्त, त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नंदन यांनी अल जझीरा, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, दूरदर्शन, झी सारख्या प्रसारकांसाठी माहितीपट आणि रिॲलिटी-आधारित कार्यक्रमांसाठी दिग्दर्शक /डीओपी/सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये या काळातील मार्मिक चित्रण आहे , जे अनेकदा माहितीपट आणि सिनेमा यांच्यातील पातळ रेषा पुसट करतात. 1996 मध्ये, त्यांनी कवितासोबत मिळून टॉप क्वार्क फिल्म्सची स्थापना  केली.  त्यांनी अनेक पुरस्कार-विजेते आणि संवेदनशील चित्रपट तयार केले आहेत ज्यांनी सामाजिक बदल आणि धोरणात्मक  सुधारणांना प्रेरित केले आहे - लोकांना हसवले आणि रडवले देखील आहे . 2007 मध्ये त्यांनी आणि कविता यांनी स्थापन केलेल्या क्वार्क वर्कशॉप्स या कौशल्य सामायिकीकरण  प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून  नंदन चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर्सना सक्रिय मार्गदर्शन करतात. त्यांनी राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठात फोटोग्राफी आणि व्हिडिओ-निर्मिती याचे धडे दिले आहेत. ते एक उत्साही छायाचित्रकार आणि प्रेरक वक्ते  देखील आहेत .

 

***

JPS/S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022388) Visitor Counter : 47