संरक्षण मंत्रालय

व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून स्वीकारला पदभार

Posted On: 25 MAY 2024 4:18PM by PIB Mumbai

 

 

व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग यांनी 25 मे 2024 रोजी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांच्याकडून राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाची सूत्रे स्वीकारली.  खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असणारे सिंग यांना 01 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात नियुक्त करण्यात आले होते.

त्यांनी समुद्रावर आणि किनारी अशा दोन्ही ठिकाणी अनेक पदांवर काम केले आहे. तोफखाना आणि क्षेपणास्त्रांमधील तज्ञ म्हणून त्यांनी भारतीय नौदलाच्या रणजित आणि प्रहार या जहाजांवर सेवा बजावली आहे. भारतात निर्मित तीन युद्धनौकांवर सेवा बजावणाऱ्या दलाचा भाग असण्याचा सन्मान त्यांना प्राप्त आहे. या युद्धनौकांपैकी आयएनएस ब्रह्मपुत्रावर तोफखाना अधिकारी म्हणून, आयएनएस शिवालिकवर कार्यकारी अधिकारी म्हणून तर आयएनएस  कोचीवर कमांडिंग ऑफिसर म्हणून सिंग यांनी सेवा केली आहे. त्यांनी आयएनएस विद्युत आणि आयएनएस खुकरी या नौकांचे नेतृत्व केले आहे. ते आयएनएस द्रोणाचार्यवर तोफखाना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक आणि नेव्हल वॉर कॉलेज, गोवाचे उप कमांडंट राहिले आहेत.  त्यांच्या आजवरच्या सेवा कार्यकाळात ते नौदल मुख्य कार्यालयातील कार्मिक संचालनालय, कार्मिक सहाय्यक प्रमुख (HRD), नौदल गुप्तचर संचालनालय आणि भारतीय नौदल वर्क-अप टीमचे सदस्य म्हणून कार्यरत होते.

29 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी ईस्टर्न फ्लीट कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणून पदभार स्वीकारला होता. या कार्यकाळात ऑर्डनन्स ऑन टार्गेटया मोहिमेवर लक्ष केंद्रित करून  त्यांच्या ताफ्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. 15 जानेवारी 2024 रोजी व्हाईस ॲडमिरल पदावर उन्नती झाल्यावर, ध्वज अधिकारी सिंग यांची नियंत्रक कार्मिक सेवा म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कार्यकाळात कर्मचारी आणि नौदल समुदायाच्या कामकाजाची स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम हाती घेण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान आपल्या तुकडीत एकूण गुणवत्ता यादीत प्रथम स्थान पटकावल्याबद्दल सिंग यांना ऍडमिरल कातारी चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये प्रथम स्थान मिळवले.  त्यांच्या नेतृत्वाखाली, INS खुकरीला डिसेंबर 2011 मध्ये नौदल प्रमुखांचे 'युनिट सायटेशन' प्रदान करण्यात आले होते. एकूणच परिणामकारक परिचालन आणि चाचेगिरी विरोधी मोहीम यशस्वीपणे चालवल्याबद्दल त्यांना फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चिफ (FOC-in-C) कमेंडेशन (2002); नौसेना पदक (2020), आणि अति विशिष्ट सेवा पदक (2024) देखील प्रदान करण्यात आले आहे.

त्याच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये एमएससी आणि एमफिल (संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास) यांचा समावेश आहे. डीएसएससी वेलिंग्टन येथील स्टाफ कोर्स, नेव्हल वॉर कॉलेजमधील हायर कमांड आणि भारतातील एनडीसी अभ्यासक्रमा बरोबरच त्यांनी वॉशिंग्टन येथील नॅशनल इंटेलिजेंस विद्यापीठातून (NIU) मेरीटाइम इंटेलिजेंस अभ्यासक्रम, आणि स्वीडन मधील स्टॉक होम येथून युनायटेड नेशन्स स्टाफ ऑफिसर्स अभ्यासक्रम (UNSOC) पूर्ण केला आहे.

व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग यांचा अफाट अनुभव, विशेषत: परिचालन, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन अशा सर्व क्षेत्रांतील त्यांचा अनुभव, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून काम करताना निश्चितच लाभदायक ठरेल.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021646) Visitor Counter : 53