संरक्षण मंत्रालय

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी एनडीएच्या 146 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची केली पाहणी

Posted On: 24 MAY 2024 11:42AM by PIB Mumbai

 

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 24 मे 2024 रोजी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए)  खेत्रपाल परेड मैदानावर राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 146 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची पाहणी केली.या दीक्षांत संचलनामध्ये एकूण 1265 छात्र सहभागी झाले होते. यापैकी 337 या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेले आहेत.  या दीक्षांत संचलनामध्ये भूतान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीव या भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांतील 19 छात्रही सहभागी झाले होते. या परेडमध्ये 199 लष्कर, 38  नौदल आणि 100 हवाई दल छात्रांचा समावेश होता.  सध्या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात असलेल्या 24 महिला छात्रांच्या तुकडीनेही या दीक्षांत संचलनात  भाग घेतला.

लष्करी शिक्षणाचा पाया घालणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी, एनडीए ही देशातील प्रमुख संयुक्त सेवा प्रशिक्षण संस्था आहे. परेडमध्ये सहभागी झालेले कॅडेट आता त्यांच्या संबंधित प्री-कमिशनिंग प्रशिक्षण अकादमीमध्ये सामील होतील.

बटालियन कॅडेट कॅप्टन (BCC) शोभित गुप्ता याने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रपती सुवर्णपदक प्राप्त केले, अकादमी कॅडेट ऍडज्युटंट (ACA) माणिक तरुण यांनी एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत द्वितीय स्थान मिळवून राष्ट्रपती रौप्य पदक पटकावले.  एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहून बटालियन कॅडेट कॅप्टन (BCC) अन्नी नेहराने राष्ट्रपती कांस्य पदक मिळवले. परेड दरम्यान सादरीकरण केलेल्या  गोल्फ स्क्वाड्रनने प्रतिष्ठित 'चीफ ऑफ स्टाफ बॅनर' जिंकला.

निरिक्षण अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण उत्तीर्ण  कॅडेट्स, पदक विजेते आणि चॅम्पियन स्क्वाड्रन यांचे कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले.  अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या छात्रांच्या पालकांचे त्यांनी आपल्या मुलांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल या अधिकाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले. अधिकाऱ्यांनी छात्रांना आपल्या सेवा काळात  एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि मुख्यत्वेकरून तंत्रज्ञानावर आधारीत लष्करी घडामोडींमधील क्रांतीवरही भर देण्याचे आवाहन केले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021469) Visitor Counter : 68