संरक्षण मंत्रालय
देशाच्या संरक्षणाचे बळ केवळ लष्करी सामर्थ्यामध्येच नसून शक्तीचा स्रोत म्हणून सांस्कृतिक वारशाचा लाभ घेण्याच्या क्षमतेमध्ये देखील आहे :संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट
Posted On:
21 MAY 2024 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2024
नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात 21 मे 2024 रोजी, 'उद्भव' प्रकल्पाचा एक भाग असलेल्या 'भारतीय धोरणात्मक संस्कृतीचे ऐतिहासिक नमुने' या विषयावरील चर्चासत्र आणि त्यासोबत एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात 'प्राचीन काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या कालखंडात भारतीय लष्करी यंत्रणा, युद्धपद्धती आणि युद्धविषयक धोरणांचे डावपेच या क्षेत्रातील उत्क्रांती’ या विषयावरील प्रदर्शनाच्या उद्घाटनासोबतच 'उद्भव संकलन' आणि 'अल्हा उदल - बल्लाड रेंडिशन ऑफ वेस्टर्न उत्तर प्रदेश’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, भारतीय लष्कर आणि युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (USI) यांच्या ‘उद्भव उपक्रमाची’ प्रशंसा केली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशाचे प्राचीन ग्रंथ आणि मौखिक परंपरांचा शोध घेऊन त्यातून संरक्षणविषयक धोरणात्मक संस्कृतीत अमूल्य अंतर्दृष्टी प्रदान करणे हा आहे.“भू-राजकीय परिदृश्य सतत विकसित होत असून आपल्या सशस्त्र दलांनी त्यांचा दृष्टिकोन अनुकूल आणि नवोन्मेषी ठेवणे अत्यावश्यक आहे. आपले प्राचीन ग्रंथ आणि परंपरांचा अभ्यास करून, उद्भव सारखे प्रकल्प केवळ संरक्षणविषयक धोरणात्मक संस्कृती बाबतची आपली समज समृद्ध करत नाहीत तर अपारंपरिक युद्ध धोरणे, मुत्सद्दी पद्धती आणि युद्धातील नैतिक विचारांबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देखील देतात,” असेही ते म्हणाले.
पुढील वाटचालीबद्दल आपले विचार मांडताना,अजय भट्ट यांनी देशाच्या संरक्षणाची ताकद ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जे केवळ लष्करी सामर्थ्यातच नाही तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या आणि सांस्कृतिक वारशाचा शक्तीचा स्रोत म्हणून लाभ घेण्याच्या क्षमतेमध्ये देखील आहे, असे त्यांनी सांगितले. उद्भव सारखे प्रकल्प भविष्याकडे नेणारे दिशादर्शक आहेत, जिथे भारत स्वावलंबी असेल आणि तरीही त्याची मुळे सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेली असतील, असे उद्भव प्रकल्पाचे वर्णन अजय भट्ट यांनी केले.
उद्भव प्रकल्पाने प्रख्यात भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वानांमधील महत्त्वपूर्ण बौद्धिक एककेंद्राभिमुखता प्रकट केली आहे, तसेच त्यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि दृष्टीकोन यांच्यातील अनुनाद अधोरेखित केला आहे, असे या कार्यक्रमात बोलताना लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. या प्रयत्नाने भारताच्या आदिवासी परंपरा, मराठा नौदल वारसा आणि लष्करी व्यक्तींचे, विशेषत: महिलांच्या वैयक्तिक शौर्यगाथा उलगडून नवीन क्षेत्रांमध्ये शोधाला उत्प्रेरित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
“या प्रकल्पाने ज्यांची मुळे परस्पर संबंध, धार्मिकता आणि नैतिक मूल्ये एकमेकांशी जोडलेली आहेत अशा वेद, पुराण, उपनिषद आणि अर्थशास्त्र यासारख्या प्राचीन ग्रंथांचा खोलवर अभ्यास केला आहे. शिवाय, या प्रकल्पात ज्याने भारताच्या समृद्ध लष्करी वारशाला आकार दिला आहे अशा महाभारत या महाकाव्यातील लढाया आणि मौर्य, गुप्त आणि मराठ्यांच्या कारकिर्दीत वापरल्या गेलेल्या सामरिक तेजाचा शोध घेतला आहे,,” असे जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.
प्रदर्शन
'प्राचीन काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या कालखंडात भारतीय लष्करी यंत्रणा, युद्धपद्धती आणि संरक्षणविषयक धोरणात्मक डावपेच या क्षेत्रातील उत्क्रांती’ या प्रदर्शनात भारतीय लष्करी व्यवस्थेची उत्क्रांती आणि देशाच्या लष्करी संस्कृतीचे तात्विक आधार दृष्याद्वारे प्रदर्शित करण्यात आले.या प्रदर्शनात राष्ट्रीय संग्रहालयाच्या समृद्ध संग्रहातील कलाकृती, प्रिंट्स, हस्तलिखिते आणि लघुचित्रे मांडण्यात आली आहेत. पुढील दहा दिवसांसाठी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
संकलन
‘उद्भव कॉम्पेंडियम (2023-2024)’ - भविष्यातील बुद्धिमत्ता आणि विशेष लष्करी घडामोडी तसेच सर्वसाधारणपणे शासन कलेसाठी भारताच्या प्राचीन बुद्धिमत्तेची नोंद म्हणून हे संकलन संकल्पित केलेले आहे. यात सहा प्रकरणे आणि अनेक परिशिष्टांचा समावेश आहे ज्यात उद्भव प्रकल्पाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या उपक्रमांमधून आणि कार्यक्रमांमधून महत्त्वाचे निष्कर्ष आणि महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट आहे. हा उपक्रम या विषयावरील भविष्यातील संशोधन आणि विचारविनिमय करण्यासाठी तपशीलवार अभ्यासाला आधार देखील देतो.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2021226)