वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या वतीने नवी दिल्लीत ओएनडीसी स्टार्टअप महोत्सवाचे आयोजन; ओएनडीसी ठरले स्टार्ट अप्सना डिजिटल व्यापारासाठी ओपन नेटवर्कला चालना देणारे व्यासपीठ

Posted On: 17 MAY 2024 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2024

उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या ( डीपीआयआयटी) वतीने आज म्हणजेच 17 मे  2024 रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे 'ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स स्टार्टअप महोत्सवा'चे आयोजन केले होते. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने राबवलेले दोन महत्त्वाचे उपक्रम, स्टार्ट अप इंडिया  आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) यांचे  यश प्रतिकात्मकरित्या साजरा करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित केला गेला होता.

डीपीआयआयटीचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी या सोहळ्याला संबोधित केले. देशात स्टार्टअप्सचा विकास आणि  नवोन्मेषासाठी परिसंस्थेचे  संवर्धन  व प्रोत्साहन यासाठी केंद्र सरकारची  वचनबद्धता राजेश कुमार सिंह यांनी यावेळी अधोरेखित केली.

या कार्यक्रमात प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि डिजीडल माध्यम अशा  हायब्रीड पद्धतीने सुमारे पाच हजार स्टार्टअप्स सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या स्टार्टअप, युनिकॉर्न तसेच इझ माय ट्रिप, ऑफ बिझनेस, विन्झो, लिव्हस्पेस, ग्लोबलबीज, प्रिस्टीन केअर, कार्स ट्वेंटी फोर, फिजिक्स वाला, पॉलिसी बझार आणि झिरोधा यांसारख्या वेगाने वाढत असलेले उद्योग आणि  या परिसंस्थेचा भाग असलेल्या 125 पेक्षा जास्त भागधारकांनी लेटर ऑफ इंटेन्ट अर्थात हमीपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. या हमीपत्राच्या माध्यमातून ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सची  (ONDC) क्षमता आणि त्यांच्यासोबतच्या भागिदारीत जोडले जाण्यासाठी  देशातील अग्रगण्य स्टार्टअप्समध्ये असलेल्या उत्सुकतेचीच साक्ष मिळाली.

डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव यांनीही या सोहळ्याला संबोधित केले. कल्पकतेला चालना देत, स्पर्धेचा विस्तार करत आणि ग्राहकांसमोरच्या पर्यायांची संख्या वाढवण्याच्या माधयमातून अनेक स्टार्टअप्स ओएनडीसीसारख्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असे त्यांनी सांगितले. 

'ओएनडीसी स्टार्टअप महोत्सव'हा ओएनडीसी आणि स्टार्टअप इंडिया उपक्रमासोबतची नाविन्यपूर्ण भागिदारी आहे. ओएनडीसी या व्यासपीठासोबत 5 लाखांपेक्षा जास्त विक्रेते जोडले गेले आहेत. यांपैकी  70%  पेक्षा अधिक विक्रेते हे लहान किंवा मध्यम स्वरुपाच्या व्यवसायातील विक्रेते आहेत. एप्रिल 2024 मध्ये ओएनडीसी या व्यासपीठावरून सुमारे 7.22 दशलक्ष व्यवहार झाले होते.

S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2020957) Visitor Counter : 60


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu