अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

करदात्यांना वास्तव वेळेत माहिती पुष्टी प्रक्रियेची स्थिती दर्शवण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वार्षिक माहिती निवेदनातील नवी सुविधा जारी केली

Posted On: 13 MAY 2024 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2024

अनुपालन पोर्टलच्या माध्यमातून सर्व नोंदणीकृत आयकर दात्यांसाठी वार्षिक माहिती निवेदन (एआयएस) उपलब्ध करण्यात येते आणि त्यांना ते ई-करविवरणपत्र संकेतस्थळाच्या (www.incometax.gov.in) माध्यमातून सुलभतेने मिळवता येते. करदात्यांनी केलेल्या  आणि कर पात्र ठरू शकणाऱ्या मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहारांचे तपशील या एआयएसमधून मिळतात.

आता करदात्याला एआयएसमध्ये त्याने सादर केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावरचा अभिप्राय देण्याची सुविधा एआयएसमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारचा अभिप्राय करदात्याला ही माहिती मिळवण्याच्या स्त्रोताने पुरवलेल्या माहितीच्या अचूकतेवर भाष्य करण्यास मदत करतो.

सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आता एआयएस मध्ये अशी एक नवी सुविधा अंतर्भूत केली आहे ज्यातून माहितीच्या पुष्टी  प्रक्रियेची स्थिती दर्शवली जाते. करदात्याने दिलेल्या अभिप्रायावर स्त्रोताकडून काही प्रमाणात किंवा संपूर्णतः स्वीकार अथवा नकार देण्याची कारवाई करण्यात आली आहे किंवा कसे, याची माहिती यातून दर्शवली जाईल.

संपूर्ण किंवा आंशिक स्वीकाराच्या बाबतीत, स्रोताकडून दुरुस्ती निवेदन घेऊन माहितीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्रोताकडून अभिप्राय आल्याच्या खात्री करून घेण्यासाठी पुढील मुद्दे करदात्याला दिसतील, अशी व्यवस्था केली आहे.

  • खात्रीसाठी अभिप्रायाची नोंद केली आहे का – यामुळे माहितीची नोंद घेणाऱ्या स्रोताकडे अभिप्राय पोहोचला आहे किंवा नाही हे करदात्याला कळेल.
  • अभिप्राय कधी पोहोचला – यामुळे स्रोताकडे अभिप्राय कोणत्या तारखेला पोहोचला हे करदात्याला कळेल.
  • उत्तर कधी आले – यामुळे स्रोताकडून अभिप्रायावर कोणत्या तारखेला उत्तर आले  हे करदात्याला कळेल.
  • स्रोताचे उत्तर – यामुळे स्रोताने करदात्याच्या अभिप्रायावर काय उत्तर दिले (दुरुस्तीची आवश्यकता आहे किंवा नाही) हे करदात्याला कळेल.

या नव्या सुविधांमुळे करदात्याला वार्षिक माहिती निवेदनाद्वारे माहिती देण्याच्या प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल अशी अपेक्षा आहे. अनुपालनात सुलभता आणणे आणि करदात्यांना वर्धित सेवा देण्यासाठी आयकर विभागाने सुरू केलेला हा आणखी एक उपक्रम आहे.

N.Chitale/S.Chitnis/R.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2020476) Visitor Counter : 121