वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आसियान -भारत मालव्यापार करार विषयक संयुक्त समितीची चौथी बैठक

Posted On: 12 MAY 2024 1:34PM by PIB Mumbai

 

AITIGA (ASEAN-India Trade in Goods Agreement) अर्थात आसियान-भारत मालव्यापार कराराचा आढावा घेण्यासाठी संयुक्त समितीची चौथी बैठक, 7 ते 9 मे 2024 या कालावधीत मलेशियातील पुत्रजया इथे झाली. भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि मलेशियाच्या गुंतवणूक, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उप महासचिव (व्यापार) मस्तुरा अहमद मुस्तफा, या बैठकीचे सह-अध्यक्ष होते.  भारत आणि सर्व 10 आसियान देशांच्या  प्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेतला. आसियान (ASEAN- Association of South East Asian nations) ही दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय आशियाई राष्ट्रसमूहाची संघटना आहे.

AITIGA च्या पुनरावलोकनासाठीची, तसच हा करार अधिक व्यापार-सुविधास्नेही आणि या संपूर्ण प्रदेशातील व्यवसायांना लाभदायक बनवण्यासाठीची चर्चा, मे 2023 मध्ये सुरू झाली. पुनरावलोकनाचे काम हाती घेणाऱ्या संयुक्त समितीची आतापर्यंत चार वेळा बैठक झाली आहे.  संयुक्त समितीने तिच्या पहिल्या दोन बैठकांमध्ये, पुनरावलोकनाच्या वाटाघाटीसाठीच्या आपल्या संदर्भ अटी आणि वाटाघाटींचा आराखडा या बाबी निश्चित केल्या आणि AITIGA च्या पुनरावलोकनासाठी वाटाघाटी, नवी दिल्लीत 18-19 फेब्रुवारी 2024 दरम्यान झालेल्या तिसऱ्या बैठकीपासून सुरू केल्या.

पुनरावलोकनामध्ये करारामधील विविध धोरणात्मक क्षेत्रे हाताळण्यासाठी एकूण 8 उपसमित्यांची स्थापना करण्यात आली असून यापैकी 5 उपसमित्यांनी चर्चा सुरू केली आहे.  सर्व 5 उपसमित्यांनी त्यांच्या चर्चेची फलनिष्पत्ती, AITIGA च्या चौथ्या संयुक्त समितीला कळवली आहे.   'समान वागणूक  आणि बाजार उपलब्धता', 'मूळ नियम', 'मानके, तांत्रिक नियमन आणि अनुरूप मूल्यांकन प्रक्रिया' आणि 'कायदेशीर आणि संस्थात्मक समस्या' यांवर काम करणाऱ्या चार उपसमित्यांची, AITIGA च्या चौथ्या संयुक्त समिती सह  मलेशियातील पुत्रजया इथे प्रत्यक्ष बैठक झाली.  सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी ( स्वच्छता आणि वनस्पती आरोग्य विषयक) उपसमितीची याआधी 3 मे 2024 रोजी बैठक झाली होती. संयुक्त समितीने उपसमित्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

भारताच्या जागतिक व्यापारात 11% वाटा असलेला आसियान हा राष्ट्रसमूह, भारताच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे.  2023-24 मध्ये हा द्विपक्षीय व्यापार 122.67 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका होता.  सुधारित  AITIGA करारा मुळे द्विपक्षीय व्यापाराला आणखी चालना मिळेल.   संयुक्त समितीच्या पाचव्या बैठकीसाठी दोन्ही बाजूंची पुढील बैठक, इंडोनेशियात जकार्ता इथे 29 ते 31 जुलै 2024 दरम्यान होईल.

***

S.Kane/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2020360) Visitor Counter : 129