विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) – जिज्ञासा विभागाने भूषवले हवामान बदलाबाबत विद्यार्थी-विज्ञान संपर्क कार्यक्रमाचे यजमान पद

Posted On: 08 MAY 2024 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मे 2024

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- (सीएसआयआर) -चा जिज्ञासा विभाग आणि राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरण संशोधन संस्था (एनआयएससीपीआर) यांनी आज नवी दिल्ली इथे ‘सीएसआयआर-एनआयएससीपीआर’च्या आवारातील विवेकानंद सभागृहात ‘हवामान बदलाचा प्रभाव – अन्न आणि पाणी शाश्वतता’ या विद्यार्थी-विज्ञान संपर्क कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणामार्फत शाश्वतेसाठी कृतीशील होण्याची प्रेरणा देण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. केंद्रीय विद्यालय बीएएसएफ कँप चावला आणि केंब्रिज स्कूल, श्रीनिवासपुरी, नवी दिल्ली या दोन शाळांचे एकूण 55 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

‘सीएसआयआर-एनआयएससीपीआर’च्या संचालक प्रा. रंजना अगरवाल म्हणाल्या, हवामान बदलाच्या गंभीर समस्येवर उपाययोजनांचा भाग म्हणून आम्ही ‘रिंकल अच्छे है’(सुरकुत्या चांगल्या असतात) अभियान सुरू केले आहे. यामध्ये ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी इस्त्री न केलेले कपडे परिधान करणे अपेक्षित आहे. हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करणे, पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीसाठी विद्यार्थ्यांना कृतीशील होण्याची प्रेरणा देणे हे आमचे ध्येय आहे. विद्यार्थी-विज्ञान संपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जीवनशैलीच्या पर्यावरणीय प्रभावाबाबत जागरूक आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यास सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

कार्यक्रमात ‘डुइंग सायन्स इज फन’ (विज्ञान म्हणजे गंमत) हा खेळ घेण्यात आला. निर्भया विज्ञान वस्तुसंग्रहालय, एमसीडी, नवी दिल्लीचे अमित कुमार शर्मा यांनी त्याचे नेतृत्व केले. स्वस्तिक प्रदर्शनालाही भेट देण्यात आली. सीएसआयआर-एनआयएससीपीआर जिज्ञासा प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि मुख्य वैज्ञानिक डॉ. सुमन रे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शिव नारायण निशाद, सीएसआयआर-एनआयएससीपीआरमधील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ. कनिका मलिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2020031) Visitor Counter : 105