संरक्षण मंत्रालय
सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या फ्रान्स दौऱ्याची सांगता
Posted On:
28 APR 2024 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2024
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी फ्रान्सच्या सर्वसमावेशक दौऱ्याची नुकतीच सांगता केली. त्यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील दीर्घकाळापासून असलेल्या धोरणात्मक भागीदारीची दृढनिश्चिती झाली आणि दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक बळकट झाले.
सीडीएस अनिल चौहान यांनी फ्रेंच संरक्षण दलाच्या मंत्र्यांच्या नागरी आणि लष्करी कॅबिनेटचे संचालक पॅट्रिक पेलॉक्स आणि सर्वोच्च स्तरावर फ्रेंच संरक्षण दलाच्या मंत्र्यांच्या लष्करी कॅबिनेटचे प्रमुख व्हिन्सेंट जिरॉ आणि सीडीएस यांचे समपदस्थ जनरल थिअरी बुरखार्ड(सीईएमए) यांच्याशी केलेल्या चर्चेत सामाईक हिताच्या आणि परस्परांच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांच्या क्षेत्रांविषयी विचारविनिमय करण्यात आला.
फ्रान्सच्या शस्त्रास्त्र महासंचालनालयात उच्च तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीमध्ये वाढ करण्यासाठी चर्चा झाल्यानंतर दासॉ, साफ्रान आणि नौदल गट आणि थेल्स अलेनिया स्पेस यांच्यासह फ्रान्सच्या संरक्षण उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमुखांसोबतही चौहान यांनी स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी भारतीय संरक्षण दलांच्या भावी काळातील क्षमता उभारणीसंदर्भात संवाद साधला.
फ्रेंच पायदळ आणि फ्रेंच अवकाश दल आणि लष्करी अभ्यास शाळा यांच्यासोबत झालेल्या विचारविनिमयातून संरक्षणविषयक आव्हानांबाबत भारताचा दृष्टीकोन मांडतानाच अंतराळ क्षेत्रातील संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या, आधुनिकीकरणाचे उपक्रम यांच्या आणि दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय प्रशिक्षणात वाढ करण्याच्या देखील संधी उपलब्ध झाल्या.
सीडीएस अनिल चौहान यांनी नूव्ह-शॅपेल आणि व्हिलेर्स- गिस्लेन या युद्धस्मारकांना भेट दिली आणि या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडीवर लढताना अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवणाऱ्या भारतीय मोहीम दलाच्या सैनिकांना आदरांजली वाहिली. ही स्मारके भारत-फ्रान्स यांच्यातील प्रदीर्घ काळापासून असलेल्या मैत्रीची प्रतीके आहेत.
काळाच्या ओघात भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला चालना मिळाली आहे आणि ती आता आणखी दृढ झाली आहे तसेच सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये तिचा विस्तार होऊन बहुआयामी नातेसंबंध प्रस्थापित झाले आहेत.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019048)
Visitor Counter : 119