अर्थ मंत्रालय

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्रपत्र 10A/10AB भरण्याच्या मुदतीत 30 जून 2024 पर्यंत केली वाढ

Posted On: 25 APR 2024 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2024

 

सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने  25.04.2024 रोजी परिपत्रक क्र. 07/2024 काढून, प्राप्तिकर कायदा,1961 अन्तर्गत प्रपत्र 10A/10AB भरण्याची मुदत आणखी वाढवून 30 जून 2024 पर्यंत  नेली आहे.

करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी- न्यास, संस्था आणि निधींनी प्रपत्र 10A/10AB भरण्याची मुदत यापूर्वी सीबीडीटीने अनेक वेळा वाढवली आहे. अशी शेवटची मुदतवाढ परिपत्रक क्र. 06/2023 अन्वये 30.09.2023 पर्यंत देण्यात आली होती.

अशी प्रपत्रे भरण्याची मुदत शेवटच्या मुदतवाढीने दिलेल्या तारखेच्या म्हणजे 30.09.2023 च्या पलीकडे आणखी वाढवून देण्याच्या विनंत्या आणि निवेदने सीबीडीटी कडे आली होती. ती विचारात घेऊन तसेच, करदात्यांना येणाऱ्या  अडचणी टाळण्यासाठी सीबीडीटी  ने प्रपत्र 10A/10AB भरण्याची मुदत 30 जून 2024 पर्यंत वाढवली आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10(23C)/ कलम 12A/ कलम 80G/ आणि कलम 35 मधील तरतुदींच्या अधीन राहून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

सीबीडीटी ने असेही स्पष्ट केले आहे की सध्या अस्तित्वात असलेल्या न्यास, संस्था किंवा निधीला मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी वाढीव मुदतीत प्रपत्र 10A भरता आले नसेल आणि नंतर त्यांनी नवीन एकक म्हणून तात्पुरती नोंदणी करण्यासाठी अर्ज केला असेल व त्यांना प्रपत्र 10AC मिळाले असेल, तर तेही आता पूर्वोल्लिखित प्रपत्र 10AC परत करण्याच्या संधीचा तसेच मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी विद्यमान न्यास, संस्था किंवा निधी म्हणून प्रपत्र 10A मध्ये नोंदणी अर्ज भरण्याच्या संधीचा 30 जून 2024 पर्यंत लाभ घेऊ शकतात.

ज्या न्यास, संस्था किंवा निधींचे पुनर्नोंदणीचे अर्ज केवळ उशिरा भरल्यावरून किंवा चुकीच्या कलमांतर्गत भरल्यावरून नाकारले गेले असतील, त्याही प्रपत्र 10AB मध्ये, उपरोल्लिखित वाढीव मुदतीत म्हणजे 30 जून 2024 पर्यंत नव्याने अर्ज करू शकतात.

प्रपत्र 10A/ प्रपत्र 10AB नुसार भरण्याचे अर्ज प्राप्तिकर विभागाच्या इ-भरणा संकेतस्थळाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरले जातील. परिपत्रक क्र. 07/2024 पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे -: www.incometaxindia.gov.in

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018875) Visitor Counter : 56