श्रम आणि रोजगार मंत्रालय
वेतनपट आकडेवारीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 15.48 लाख सदस्यांची भर
फेब्रुवारी 2024 मध्ये ईपीएफओमध्ये 7.78 लाख नव्या सदस्यांची नोंदणी
Posted On:
20 APR 2024 4:44PM by PIB Mumbai
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 20 एप्रिल 2024 रोजी जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार ईपीएफओमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 15.48 लाख सदस्यांची भर पडली आहे. या आकडेवारीनुसार असे दिसत आहे की फेब्रुवारी 2024 मध्ये 7.78 लाख नव्या सदस्यांची नोंदणी झाली आहे. या आकडेवारीमधील एक लक्षवेधी बाब म्हणजे यामध्ये 18-25 या वयोगटाचे असलेले वर्चस्व, ज्यांचा एकूण नवीन सदस्यांमध्ये 56.36% इतका लक्षणीय सहभाग आहे. त्यामुळे या संघटित मनुष्यबळामध्ये युवावर्गाचे प्राबल्य असून प्राथमिक दृष्टीकोनातून त्यांचा हा पहिला रोजगार आहे.
या वेतनपटानुसार 11.78 लाख सदस्य सोडून गेले आणि त्यानंतर ते पुन्हा ईपीएफओमध्ये सहभागी झाले. या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या सोडल्या आणि पुन्हा ईपीएफओच्या कक्षेत असलेल्या आस्थापनांमध्ये रुजू झाले आणि त्यांची जमा रक्कम परत मागण्याऐवजी ती पुन्हा खात्यात वळवण्याला पसंती दिली, ज्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक हितसंबंधांचे रक्षण झाले आणि त्यांना सामाजिक संरक्षण पुढे सुरू राहिले.
लिंगनिहाय वेतनपटाच्या विश्लेषणानुसार या महिन्यात समाविष्ट झालेल्या एकूण 7.78 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.05 लाख नवीन महिला सदस्य आहेत. तसेच, या महिन्यात समाविष्ट झालेल्या एकूण महिला सदस्यांची संख्या 3.08 लाख इतकी आहे. महिला सदस्यांची ही भर अधिक समावेशक मनुष्यबळाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थित्यंतराचे निदर्शक आहे.
उद्योग-निहाय आकडेवारीची मासिक तुलना ही उद्योगांमध्ये विशेषतः संगणक उत्पादन, विपणन, देखभाल आणि संगणकांच्या वापराशी संबंधित आस्थापनांमधील, कंपन्या/ सोसायट्या/ एएसएससी /क्लब्ज/ कार्यक्रम सादर करणारी पथके, रस्ते वाहतूक, स्वयंचलित वाहन देखभाल, वस्त्रोद्योग या क्षेत्रात काम करणार्या सदस्यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते. एकूण निव्वळ सदस्यांपैकी सुमारे 41.53% नवे सदस्य तज्ञ सेवा क्षेत्रातील (मनुष्यबळ पुरवठादार, सामान्य कंत्राटदार, सुरक्षा सेवा, अन्य) आहेत.
वरील वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे, कारण डेटा निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच ही आकडेवारी दर महिन्याला अद्ययावत केली जाते.
एप्रिल 2018 पासून ईपीएफओ, सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीचा समावेश असलेल्या वेतनपटाची माहिती जारी करत आहे. मासिक वेतनपट माहितीमध्ये आधार प्रमाणित सार्वत्रिक खाते क्रमांकाद्वारे (UAN) प्रथमच ईपीएफओमध्ये सामील होणार्या सदस्यांची संख्या, ईपीएफओ मधून बाहेर पडलेले विद्यमान सदस्य, आणि जे बाहेर पडले, मात्र पुन्हा सदस्य म्हणून सामील झाले, अशा सदस्यांची संख्या निव्वळ मासिक वेतनपटासाठी विचारात घेतली जाते.
***
M.Pange/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2018344)
Visitor Counter : 107