संरक्षण मंत्रालय
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर केली यशस्वी उड्डाण चाचणी
Posted On:
18 APR 2024 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2024
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी (आय टी आर ), चांदीपूर इथून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची (आयटीसीएम ) यशस्वी उड्डाण चाचणी केली. चाचणीदरम्यान, सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम (EOTS) आणि आयटीआर द्वारे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेल्या टेलीमेट्री सारख्या अनेक रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले,ज्यामुळे उड्डाण मार्गाचा संपूर्ण माग घेता आला.तसेच भारतीय हवाई दलाच्या सुखोई (Su-30-Mk-I)विमानातूनही क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आले.
क्षेपणास्त्राने वे पॉइंट नेव्हिगेशनचा (दिशादर्शन) वापर करून इच्छित मार्गाचा अवलंब केला आणि अत्यंत कमी उंचीवरील समुद्र-स्किमिंग उड्डाणाचे प्रात्यक्षिक केले. या यशस्वी उड्डाण चाचणीने बेंगळुरू येथील गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने,विकसित केलेल्या स्वदेशी प्रणोदन प्रणालीची विश्वसनीय कामगिरीदेखील सिद्ध केली आहे.
अधिक उत्तम आणि विश्वसनीय कामगिरी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक वैमानिकी तंत्रे आणि सॉफ्टवेअर यांनी देखील सुसज्ज केले आहे.बेंगळूरूस्थित डीआरडीओ प्रयोगशाळेतील वैमानिकी विकास आस्थापनेने (एडीई) इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय उद्योगांच्या योगदानासह हे क्षेपणास्त्र विकसित केले.सदर चाचणीच्या वेळी विविध डीआरडीओ प्रयोगशाळांतील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच उत्पादन भागीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयटीसीएमच्या यशस्वी उड्डाण-चाचणीसाठी डीआरडीओच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.भारतीय बनावटीच्या प्रॉपल्शनने(प्रणोदन) सक्षम अशा दीर्घ पल्ल्याच्या स्वदेशी सबसोनिक(अवस्वनी) क्रुझ क्षेपणास्त्राचा विकास हा भारतीय संरक्षणविषयक संशोधन आणि विकास कार्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संरक्षण विषयक संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही.कामत यांनी आयटीसीएमच्या उड्डाणाच्या यशासाठी डीआरडीओच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
S.Kakade/B.Sontakke/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2018176)
Visitor Counter : 210