आयुष मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिन - 2024 च्या 75 दिवसांच्या उलटगणनेनिमित्त आयोजित कार्यक्रमात 5000 हून अधिक योगप्रेमी सहभागी होणार

Posted On: 05 APR 2024 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2024

आंतरराष्ट्रीय योग दिन - 2024 च्या 100 दिवसांच्या उलटगणनेच्या कालावधीत, 7 एप्रिल 2024 रोजी पुण्याच्या (महाराष्ट्र) वाडिया महाविद्यालय क्रीडांगणावर आयोजित 75 व्या दिवसाच्या उलटगणनेच्या कार्यक्रमात 5000 हून अधिक योगप्रेमी सहभागी होणार आहेत.

सर्वांगीण आरोग्य आणि निरामय दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करून आणि योगाच्या सामर्थ्याची दखल घेत, या कार्यक्रमात ग्रामप्रधान, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स/बचतगट, आयुष आरोग्य आणि निरामयता केंद्र, निवासी कल्याणकारी संघटना (आरडब्ल्यूए), महिला कल्याणकारी संस्था, शालेय मुले आणि अन्य लोकांचा सक्रिय सहभाग असेल. या सोहळ्यात नामवंत मान्यवर, योग गुरू/मास्टर्स आणि योग आणि सहयोगी शास्त्रांचे तज्ञ आणि संस्थांचे प्रमुख देखील सहभागी होतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने आरोग्य आणि निरामयतेकरिता योगाचा व्यापक प्रचार आणि प्रसार करणे हे योग महोत्सवाचे मूळ उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 सोहोळ्याच्या उलटगणनेतील 75 वा दिवस हा 7 एप्रिल 2024 रोजी येत असून त्या दिवशी जागतिक आरोग्य दिन देखील असल्याने हा योगायोग आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. यावर्षी देखील योगाच्या फायद्यांबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी आणि सर्वांगीण आरोग्याचा अभिप्रेत संदेश देण्यासाठी, 13 मार्च रोजी 100 दिवसांची उलटगणना सुरू करण्यात आली. उलटगणनेनिमित्त आयोजित कार्यक्रम मालिकेचा एक भाग म्हणून, उलटगणनेतील 75 वा दिवस योग महोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. एका उत्सवाप्रमाणे हा कार्यक्रम मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि आयुष मंत्रालयाची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एनआयएन) यांनी संयुक्तपणे हजारो सहभागींच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. सर्व सहभागी 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता सुरू होणाऱ्या कॉमन योग प्रोटोकॉल (सीवायपी) च्या सरावात सक्रियपणे सहभागी होतील.

कॉमन योग प्रोटोकॉल हा कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. सीवायपी ची रचना तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आली असून त्यात योगाचे सर्व फायदे मिळवण्यासाठी दैनंदिन योगाभ्यास समाविष्ट आहे.

10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने आयुष मंत्रालय हे मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेसोबत 13 मार्च 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत विविध विद्यापीठे/संस्था/महाविद्यालये यांच्या सहकार्याने '100 दिवस, 100 शहरे आणि 100 संस्थांच्या मोहिमेचा समावेश असलेली सामूहिक योग प्रात्यक्षिके/सत्रांचे आयोजन करत आहे.

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2017256) Visitor Counter : 71