राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सीपीडब्ल्यूडीच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 28 MAR 2024 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 28 मार्च 2024

सीपीडब्ल्यूडी म्हणजेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या गटाने (2022 आणि 2023 तुकडी ) राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांची आज (28 मार्च 2024) राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.

या  अभियंत्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, तरुण अभियंते म्हणून तुम्हाला हवामान बदल आणि तापमान वाढीच्या  धोक्यांची जाणीव आहे आणि परिणामी ऊर्जा-कार्यक्षम उपायांचा अवलंब करण्याची गरज आहे. तुम्ही  निर्माण केलेल्या इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा शाश्वत, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरण स्नेही असाव्यात.  येणाऱ्या आव्हानांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी अभियंत्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत नवोन्मेषी दृष्टीकोन ठेवायला हवा असे सांगत  थ्रीडी प्रिंटिंगच्या युगात बांधकाम तंत्रज्ञानामध्ये  मोठा बदल झाला आहे, असे त्या म्हणाल्या. पायाभूत सुविधा आणि बांधकाम प्रकल्प आता हवामानाशी सुसंगत आणि ऊर्जा-कार्यक्षम बनवले जाऊ शकतात.  हरित बांधकाम ही काळाची गरज आहे. बांधकामाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींमध्ये या क्षेत्राचा कायापालट करण्याची क्षमता आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. अचूक रचना तयार करून, हे अभियंते  पारंपरिक बांधकामाच्या सीमा ओलांडून नवे काहीतरी करू शकतात. त्यांना केवळ बांधकाम प्रक्रियेलाच  गती द्यावी लागेल असे नाही तर संसाधनांच्या इष्टतम वापराद्वारे कचरा कमी होईल हे देखील सुनिश्चित करावे लागेल, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी तरुण अभियंत्यांना विकेंद्रित पद्धतीने  काम न करण्याचा सल्ला देतानाच  सहयोगी, दूरदर्शी आणि तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोन स्वीकारावा, असे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता , मशीन लर्निंग, रोबोट्स, ड्रोन इत्यादी नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान  पारंपरिक विचाराच्या पलीकडे जाऊन काम करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याचा उपयोग कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी, प्रक्रिया स्वयंचलित आणि  प्रभावी  बनवण्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि संसाधन व्यवस्थापन सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.उत्कृष्टतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे  आणि अधिक चांगले, हरित आणि अधिक शाश्वत  भविष्य घडवण्यासाठी अर्थपूर्ण  योगदान देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी या अभियंत्यांना केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

 

 

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016569) Visitor Counter : 67